पुणे : कोरोनानंतर आता राज्यात GBS व्हायरसची दहशत निर्माण झाली आहे. GBS ने पुण्यात थैमान घातले आहे. आज पुण्यातील GBS बाधित रुग्णांची संख्या १२७ पर्यंत पोहचली आहे. जीबीएस आजारामुळे राज्यात दुसरा बळी गेलाय. पहिला मृत्यू सोलापूरमध्ये झाला होता, तर दुसरा मृत्यू पुण्यात झाला आहे.
पुण्यात बुधवारी GBS बाधित असलेल्या एका ५६ वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. राज्यात जीबीएसची रुग्णसंख्या आता १२७ झाली असून, त्यातील २० जण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यातील रुग्णांमध्ये २३ रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रातील असून, ७३ रुग्ण हे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील आहेत.
‘हा’ आजार होण्यामागचे कारण ??
हा आजार स्पर्शाने किंवा एकमेकांचं उष्ट खाल्ल्याने होत नसून हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची व्यवस्थित चौकशी केल्यानंतर कूपनलिका तसेच विहिरीतून मिळणाऱ्या दूषित पाण्यामुळे हा आजार संभवतो असल्याचे समजते आहे. या पार्श्वभूमीवर गुलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून २५ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच नागरिकांना पाणी उकळून व गाळून घेणे, बाहेरील अन्नपदार्थ टाळणे याबाबत आवाहनही करण्यात येत आहे.