सद्गुरू वामनराव पै
निसर्गाचे नियम पाळले की जीवनांत आनंदीआनंद आहे. निसर्गाचे नियम पाळण्याकडे आपली प्रवृत्ती असली पाहिजे पण निसर्गाचे नियमच माहीत नाहीत तर ते पाळण्याचा प्रश्नच कुठे येतो? निसर्ग नियमांबद्दल आतापर्यंत कुणीही सांगितलेले नाही. धर्माचा इतिहास. संस्कृतीचा इतिहास पाहिला तर हे कुणीही सांगितलेले नाही. हे जर सांगितले गेले असते तर जगाचा इतिहास वेगळाच झाला असता. “शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ कर्म करावे “ यात उपासना, भक्ती तर आलीच पण यात कर्मचांग आले व पुण्यही आले. यातून निष्पन्न काय होते? सुख, शांती, समाधान, यश, समृद्धी, आनंद सर्व काही तुम्हाला यातून प्राप्त होते. मी सुरुवातीलाच सांगितले, परमेश्वराचा संबंध आपल्या जीवनाशी हा असा येतो. जग सुखी व्हायला पाहिजे असेल तर निसर्गनियमाने चाला. रामायण म्हणजे काय? क्रिया आणि प्रतिक्रिया. महाभारत म्हणजे काय? क्रिया आणि प्रतिक्रिया. तुमचे जीवन काय, क्रिया आणि प्रतिक्रिया. तुम्ही अरे म्हटलेत की का रे समोरचा म्हणणार. तुम्ही हसलात तर तो हसणार. रागावलात तर तोही रागावणार. तुम्ही हात उगारलात तर तो हात उगारणार. क्रिया तशी प्रतिक्रिया होत असते म्हणून शुभ चिंतन करा. ती कंपने जगांत जाऊन पोहोचतात.
तुम्ही जरी बोलला नाहीतरी तुमच्या कंपने त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतात. शुभ इच्छा केल्या की तुमची कंपने त्याच्यापर्यंत जावून पोहोचतात. शुभ बोललात तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतात. शुभ केले तर काय बघायलाच नको. असे असून माणसे हे का करत नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही मालिका बघा. त्यात जे दाखवितात ते जगांत घडलेले असते. थोडेफार अतिशयोक्ती करून दाखवितात हा भाग वेगळा पण माणूस हा तसाच वागत असतो. अनिष्ट चिंतन करणे हा माणसाचा स्वभाव झालेला आहे. अनिष्ट इच्छा करणे, अनिष्ट बोलणे, आणि अनिष्ट करणे हाच माणसाचा स्वभाव झालेला आहे म्हणून ‘‘सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे’’पण सांगितले काय गेले? “संसार दुःखमूळ चोहीकडे इंगळ”. संसाराने काही वाईट केलेले नाही. बायका-मुलांनी काहीही केलेले नाही. जे केले ते तू केले. जे करशील ते शुभ कर. “शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ कर्म करावे’’ ह्यात उपासना, भक्ती, आराधना, आरती सगळेच आले. हे करायचे की नाही हे तू ठरव. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.