मुंबई : मुंबईतील टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी आता युक्रेनियन अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. या अभिनेत्याला मंगळवारी अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता त्याला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी अटक केलेला अभिनेत्याचं नाव आर्मेन अटाइन असं आहे. मूळचा युक्रेनियन नागरिक असलेल्या आर्मेन अटाइनला आर्थिक गुन्हे शाखेने मढमधून अटक केली. आर्मेन हा अनेक बॉलिवूड चित्रपटांसह जाहिरातींमध्ये सहायक अभिनेता म्हणून झळकला आहे. हजारो लोकांची फसवणूक करणारा टोरेस ब्रँड उभारण्यात आर्मेनने मदत केल्याचा आरोप आहे.आर्मेनच्या अटकेमुळे या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सहावर गेली आहे.
आर्मेनने आरोपींना मुंबईमध्ये टोरेस बँड उभारण्यात मदत केली. आर्मेन हा पॅनकार्ड काढण्यासाठी कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या तौसिफ रियाजला भेटला होता. आर्मेनने युक्रेनियन आरोपींशी तौसिफची भेट घालून दिल्याचे समोर आले आहे. तौसिफ रियाज हा स्वत: मागील अनेक आठवड्यांपासून फरार होता. त्याला काही दिवसांपूर्वीच लोणावळ्यामधील हॉटेलमध्ये अटक केल्यानंतर पुढील तपासामध्ये पोलीस आर्मेन अटाइनपर्यंत पोहोचले. तौसिफला कोर्टाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या कंपनीने ३७०० हून अधिक गुंतवणुकदारांची फसवणूक केली आहे. अगदी काही हजारांपासून ते काही कोटींपर्यंतची गुंतवणूक या गुंतवणुकदारांनी केली होती.
Mahakumbh 2025 : एकीकडे चेंगराचेंगरी तर दुसरीकडे लागली रुग्णवाहिकेला आग; व्हिडिओ व्हायरल
आर्मेन हा पहिल्या दोन बैठका आणि टोरेस ब्रँडच्या दादरमधील शोरूमच्या उदघाटनाला हजर होता. कंपनी सुरू झाल्यानंतर आर्मेन बाजूला झाला. त्यानंतर आर्मेन अटाइन हा या गुन्ह्यातील फरार तसेच अटक असलेल्या आरोपींच्या संपर्कात होता का? यासंदर्भातील चौकशी सध्या पोलिस करत आहेत. जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे जात आहे तसतसं आता फसवणुकीचा आकडा ७ ते ८ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आर्मेनने मुंबई महापालिकेचा बनावट जन्म दाखला मिळवला होता. त्याआधारेच त्याने आधार कार्ड, पॅनकार्ड तयार केले आहे. याच कागदपत्रांच्या आधारे आर्मेनने मुंबईमध्ये जन्म झाल्याचं दाखवत आपलं शहरामध्ये १० वर्षे वास्तव्यास असल्याचा दावा केला आहे. आर्मेनजवळ सापडलेल्या कागदपत्रांची पोलिस पडताळणी करत असून, तो तपासात सहकार्य करत नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.