Monday, October 20, 2025
Happy Diwali

Mahakumbh 2025 : महाकुंभात ५ कोटींहून अधिक भाविकांचे अमृतस्नान

Mahakumbh 2025 : महाकुंभात ५ कोटींहून अधिक भाविकांचे अमृतस्नान

मौनी अमावस्येला भाविकांवर आकाशातून पुष्पवृष्टी

आतापर्यंत सुमारे २० कोटी भाविकांचे महाकुंभ स्नान

प्रयागराज : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात आज, बुधवारी तिसरे अमृतस्नान (शाही) संपन्न झाले. मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर होणाऱ्या या अमृत स्नानात दुपारपर्यंत सुमारे ५ कोटी ७१ लाख भाविक सहभागी झाले होते. यावेळी भाविकांवर आकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली. रात्री झालेल्या चेंगराचेंगरीची घटना वगळता दिवसभरात शांतता आणि शिस्तीत अमृतस्नान संपन्न झाले.

प्रयागराज येथे १३ जानेवारी २०२५ रोजी प्रारंभ झाला. तेव्हापासून आतापर्यंत १९.९० कोटींहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या आकडेवारीनुसार, २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ५ कोटी ७१ लाख भाविकांनी संगमात स्नान केले होते. यामध्ये सुमारे १० लाख कल्पवासी सहभागी झाले होते. प्रयागराज कुंभमेळ्यात एकूण ६ अमृत स्नाने होतील. महाकुंभमेळ्यातील पहिले अमृत स्नान १३ जानेवारीला, दुसरे अमृत स्नान १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीला, तिसरे स्नान २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला, चौथे शाही स्नान २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला, पाचवे शाही स्नान माघ पौर्णिमेला १२ फेब्रुवारी रोजी होईल आणि शेवटचे शाही स्नान २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होईल.

दरम्यान, मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर आज, बुधवारी अमृत स्नान उत्सवानिमित्त, उत्तरप्रदेश सरकारकडून भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर सकाळी ६.३० वाजता होणारा पुष्प वर्षाव रद्द करण्यात आला. परंतु, अमृतस्नानासाठी येणाऱ्या भाविकांवर आकाशातून पुष्पवर्षाव करण्यात आला. तसेच भाविकांचे स्नान झाल्यानंतर साधू-संतांच्या आखाड्यांनी देखील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले.

Comments
Add Comment