प्रयागराज: उत्तर प्रदेश स्थित प्रयागराज महाकुंभमध्ये दुसऱे अमृतस्नान म्हणजेच मौनी अमावस्येआधी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री १ वाजण्याच्या सुमारास ही चेंगराचेंगरी झाली.
उपस्थित लोकांनी सांगितले की जे लोक येथे झोपले होते त्यांच्यावर पाठीमागून लोक आले. यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. ज्यावेळेस ही चेंगराचेंगरी झाली तेव्हा लाखो लोक संगम तटावर स्नान करत होते. घटनास्थळी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात अॅम्ब्युलन्स तेथे पोहोचल्या आणि सातत्याने जखमींना बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहिसीनुसार १११ ते १२२ पोल नंबरदरम्यान ही चेंगराचेंगरी झाली. अपघातात जखमी झालेल्यांना स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. यात काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
अमृतस्नान रद्द
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर आखाडा परिषदेने मौनी अमावस्येचे अमृतस्नान रद्द केले आहे. ही माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली. ते म्हणाले की प्रयागराज महाकुंभमध्ये आज चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर मौनी अमावस्येला अमृत स्नानाचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. आता कोणताही आखाडा अमृतस्नान करणार नाही.