मुंबई : विक्रोळी येथील कन्नमवारनगरमधील इमारत क्रमांक १० अ, ब, क, शिवमुद्रा हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांनी एकत्र येऊन ब्रिदिंगरूट्स प्रा. लि. या कंपनीच्या सहकार्याने विक्रोळीत पहिल्यांदाच फुलपाखरू उद्यानाची निर्मिती केली आहे.
येथील इमारतींच्या कोपऱ्यात दुर्लक्षित असलेल्या एका जागेत अनेक समाजविघातक गोष्टी घडत होत्या. त्याला आळा घालण्यासाठी या इमारतींमधील रहिवाशांनी एकत्र येऊन सदर जागेत समाजोपयोगी प्रकल्प राबविण्याचे ठरवले. यातूनच फुलपाखरू उद्यानाची संकल्पना समोर आली व रहिवाशांतर्फे ती दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी प्रत्यक्षात अमलात आणली गेली. या फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन पर्यावरणप्रेमी शिवसेना कार्यकारिणी सदस्य राजोल संजय पाटील यांच्या हस्ते होऊन या कार्यक्रमास समाजसेवक प्रकाश सोनमळे, ब्रिदिंगरूट्स प्रा. लि.चे जयेश लांबोर आणि परेश चुरी हे उपस्थित होते.
पर्यावरणप्रेमी राजोल संजय पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात “हा फुलपाखरू उद्यान प्रकल्प केवळ सौंदर्य निर्माण करणारा नाही, तर जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणारा एक उत्कृष्ट उपक्रम आहे”, हे उद्यान केवळ सौंदर्यासाठीच नव्हे तर सोसायटीच्या सदस्यांना निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी, मनःशांती मिळवण्यासाठी आणि मुलांना पर्यावरण शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी उपयोगी ठरणार आहे असे नमूद केले तसेच विक्रोळीतील इतर संस्थांनीदेखील या प्रकल्पाचे अनुकरण करावे असे मत व्यक्त केले.
या उद्यानात विविध प्रजातींच्या फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड करण्यात आलेली असून तेथे विविध प्रजातींच्या अगदी नुकत्याच जन्मलेल्या फुलपाखरांपासून ते उडणाऱ्या फुलपाखरांपर्यंतच्या अवस्था अनुभवायला मिळत आहेत. या उद्यानाचे उद्घाटन झाल्यानंतर विशेषतः मुलांनी फुलपाखरांचा आनंद लुटला आणि उद्यानातील विविध प्रकारच्या झाडांबद्दल कुतूहल व्यक्त केले.
पुणे म्हाडाची लॉटरी जाहीर, ५ फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी काढणार
हे फुलपाखरू उद्यान स्थानिक पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचा टप्पा ठरत असून, या परिसरात जैवविविधतेला चालना देण्यासाठी आणि निसर्गाशी नाते दृढ करण्यासाठी हा एक अनोखा प्रयत्न आहे. ब्रिदिंगरूट्स प्रा. लि.ने हा प्रकल्प यशस्वीपणे साकारत परिसरातील नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात एक अद्वितीय अनुभव प्रदान केला आहे.
हे फुलपाखरू उद्यान सर्व फुलपाखरूप्रेमींसाठी खुले असून स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींना येथे भेट देऊन फुलपाखरांचे सौंदर्य अनुभवण्याची आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची संधी प्राप्त झालेली आहे.
या फुलपाखरू उद्यानाची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या स्थानिक रहिवाशी दिव्या सिक्वेरा (सचिव), अनिल सिक्वेरा, जयेश लांबोर, यतीन परब, सतीश शेट्टी व इतरांचे या परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.