अमरावती : फ्लिपकार्टच्या (Flipkart) माध्यमातून ऑनलाईन अॅपल कंपनीचे डिजिटल घड्याळ बोलाविले. परंतु डिजिटल घड्याळच्या नावावर बनावटी घड्याळ आल्याचे स्पष्ट होताच करण उदय देशमुख (रा. मोर्शी रोड, कलीम पेट्रोल पंपाच्या मागे) यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दिली. करण देशमुख यांनी २४ जानेवारीला फ्लिपकार्ट या ऑनलाईन खरेदी मंचावरून अॅपल महागडी डिजिटल घड्याळ ८९ हजार ९९८ रुपयांची ऑनलाईन बोलावली होती. २७ जानेवारीला सकाळी सदर घड्याळ दिलेल्या पत्यावर फ्लिकार्टच्या डिलिव्हरी एजंटमार्फत आली. त्यानंतर करण देशमुख यांनी पार्सल उघडून बघितले असता डिजिटल घड्याळ बनावट (Online Fraud) असल्याचे वाटले.
दरम्यान डिलिव्हरी एजंटने पार्सल माझ्या परवानगीशिवाय उघडले व काही फोटोज घाईत काढून पार्सल पुन्हा पॅक केले. तसेच तपासणी करण्यासाठी वेळ न देता इतर ऑर्डरसह पार्सल दिले. त्यानंतर त्यांनी पार्सल उघडून पाहिले असता त्यामध्ये डिजिटल घड्याळचे वजन खूपच कमी होते. ब्लॅक टायटॅनियम रंगाची ऑर्डर केली होती. परंतु सिल्व्हर रंगाचे घड्याळ मिळाले, डिजिटल घड्याळ पूर्णपणे डमी युनिट होते व चालू होत नव्हते आणि घड्याळसोबत दिलेला स्ट्रॅपही नकली होता. त्यामुळे घड्याळ खरेदीत आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षत येताच संबंधित व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची तक्रार करण देशमुख यांनी गाडगेनगर ठाण्यात दिली आहे.