७६ वा प्रजासत्ताक दिन काल संपूर्ण देशभरात हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. यावेळी भारताचे लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक वैविध्य आणि विकासाचा देखावा सादर करण्यात आला. जगाला भारताच्या या वाढत्या सामर्थ्याची धास्ती वाटणारा असा हा कार्यक्रम होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील विविध ठिकाणी कार्यक्रम साजरे करण्यात आले आणि यावेळी भारताच्या वैशिष्ट्यांचा गौरव करण्यात आला. दिल्लीतील कर्तव्य पथ येथे शानदार सरकारी कार्यक्रम पार पडला आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. तसेच पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांटो उपस्थित होते. विशेष म्हणजे पहिल्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे १८५० साली इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावळी भारताचे सांस्कृतिक वैविध्य दाखवणारे अनेक देखावे सादर करण्यात आले. यंदा कार्यक्रमाला दहा हजार विशेष पाहुणे हजर होते. राष्ट्रपती यावेळी उपस्थित होत्या आणि त्यांनी भारताच्या सामर्थ्याचे कौतुक केले, तर यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या निमित्ताने संविधानाच्या आदर्शाचे जतन करण्याचे प्रयत्न बळकट होवोत अशी प्रार्थना केली.
यंदाच्या वर्षी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला विशेष महत्त्व आहे. देशभरात सर्वत्र उत्साह आणि उल्हासाचे वातावरण असताना पंजाबमध्ये आणि परदेशातही खलिस्तानी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लावले. खलिस्तानी समर्थकांनी काही ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अडथळे आणले आणि नारेबाजी केली. तसेच लंडन येथेही भारतीय उच्चायुक्तालयाच्या समोर खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी केली आणि त्यात भारतविरोधी घोषणा होत्या. भारतीय समर्थकांनी खलिस्तानी समर्थकांच्या घोषणांना तसेच उत्तर दिले आणि त्यांची घोषणाबाजी बंद पाडली. पण या घटना वगळल्या तर देशभरात प्रजासत्ताक दिनाचे उत्साहपूर्ण आणि जल्लोषाने भरलेले वातावरण होते. ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम झाले तसेच संचलन पार पडले. पण सर्वात लक्षवेधी संचलन दिल्लीतील कर्तव्यपथ येथे पार पडले आणि त्या ठिकाणी भारताचे संपूर्ण लष्करी सामर्थ्याची संपूर्ण ताकद दिसली. त्यामुळे जगाने हेवा करावा असे देखणे संचलन कर्तव्यपथ येथे पार पडले. प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारकडून पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील वन लेखक मारुती चितनमपल्ली यांचा गौरवपूर्ण उल्लेख करावा लागेल. समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या अनेक नायकांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी कुनो येथील चिते आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी महाकुंभ यांनी कर्तव्यपथ सजवला होता. हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्य होते. प्रजासत्ताक दिनाचे संचलन जसे शानदार होते तसेच याचा समारोपही तसाच झाला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणात संविधानातील तत्त्वांचे पालन करण्यासाठी या संधीचा लाभ मिळो असे प्रतिपादन केले. महान महिला आणि पुरुष ज्यांनी ही घटना प्रदान केली आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोदी यांनी मान झुकवून अभिवादन केले. हे संपूर्ण राष्ट्राने पाहिले आणि मोदी घटनाकारांपुढे नतमस्तक होतानाही पाहिले.
आज भारताची घटना ही संपूर्ण जगासमोर आदर्श आहे आणि तिच्यात बदल करण्याचा या सरकारचा विचार आहे असे काही नतद्रष्ट मंडळी विचार करत आहेत आणि तसे फेक नरेटिव्ह तयार करत आहेत. पण मोदी यांनी आपल्या भाषणातून या लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, घटनेचा आपल्या प्रवासाने देशाचे एक्य आणि अखंडता अबाधित राहिली आहे आणि घटनेचा आपण कधीही विसर पडू देता कामा नये. मजबूत आणि भरभराटीचा भारत होण्यासाठी काम करण्याच्या दिशेने या प्रयत्नांचा उपयोग करून घेऊ या असे मोदी यांनी म्हणताच कर्तव्य पथ येथे टाळ्यांचा कडकडाट झाला. याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सीएपीएफ जवानांना दोन कीर्तीचक्र आणि १४ शौर्यपदके बहाल करण्यात आली. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर म्हणून ९३ शौर्यपदकांना वितरित केले. यावेळी टाळ्यांचा कडकडाट होत होता. अत्यंत देखणा असा कार्यक्रम कर्तव्यपथ येथे पार पडला. या पुरस्कारांपैकी १३ पुरस्कार मरणोत्तर आहेत. पण यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्य हे होते की, यंदा ३५ वर्षांत प्रथमच जम्मू काश्मीरातील त्राल येथे तिरंगा फडकला, काश्मीरचे मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा असे आव्हान तेव्हाच्या भारत सरकारला दिले होते. पण त्यानंतर मोदी सत्तेवर आल्यावर गणतंत्र दिन आणि स्वातंत्र्य दिनी लाल चौकात तिरंगा फडकवला जात आहे.
काल तर प्रथमच ३५ वर्षांत त्राल येथे तिरंगा फडकवण्यात आला. ही निश्चितच भारतासाठी गौरवाची बाब तर आहेच पण देश बदल रहा है याची चुणूक दाखवणारी आहे. राष्ट्रीय रायफल्स, जम्मू काश्मीर पोलीस दल आणि सीआरपीएफ यांच्या कडक बंदोबस्त हा सोहळा पार पडला. पुलवामा जिल्ह्यात हा भाग येतो जेथे दहशतावादाबद्दल कुप्रसिद्ध आहे. येथे तिरंगा फडकवण्यात आला ही देशातील बदलत्या चित्राची झलक आहे. एकेकाळी दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांचा बालेकिल्ला असलेले त्राल हे शहर यावेळी प्रथमच भारत माता की जय अशा घोषणांनी दुमदुमून गेले होते. हे यंदाचे सुखद चित्र मोदी असल्यामुळेच दिसू शकले अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम देशात एकूणच शानदारपणे आणि हर्षोल्लासात पार पडले आणि कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, हे विशेष होते. सारा देश देशभक्तीच्या वातावरणाने झपाटून गेला होता. त्यामुळे अत्यंत देखणा असा हा दिवस तशाच देखण्या कार्यक्रमांनी देशभर पार पडला यामुळे सर्व देशवासियांना अभिमान वाटला असेल यात काही शंका नाही.