पुणे : राजकारणापेक्षा शहराबद्दलची दृष्टी महत्त्वाची आहे. शहराचा वारसा दर्शवणाऱ्या वास्तू जपल्या पाहिजे. शहरातील इमारतींमध्ये नैसर्गिक वायुवीजन असणे गरजेचे असून पुण्यासारख्या शहरात हिवाळा व पावसाळा वगळता फक्त उन्हाळ्यातच एअर कंडिशनरची गरज असते हे लक्षात घेऊन वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांनी शहराच्या सौंदर्यात कायमस्वरूपी भर पडेल अशा वास्तूरचना कराव्यात, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज म्हंटले. पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे ‘अॅकॅडेमिक एक्स्प्लोरेशन्स’ या वास्तुकला प्रदर्शनास त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या सोबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.
विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पुण्यातील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे आयोजित ४ दिवसांच्या या प्रदर्शनाचा गौरव करून अजित पवार म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांनी फार मोठ्या प्रमाणात पॉलिटेक्निक व इंजिनीरिंग सारख्या उच्च शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. त्यांचे शिक्षण जरी कमी झालेले असले तरी शिक्षणाबाबतची त्यांची दृष्टी फार मोठी होती, असे सांगून अजित पवार म्हणाले की, पुण्यात शासकीय पातळीवर शालेय शिक्षण, कृषी, कामगार, सहकार, सामाजिक न्याय अशी विविध विभागांची भवने उभारली जात आहेत. या सर्व वास्तू अधिक आकर्षक कलात्मक दृष्ट्या बांधल्या जातील. पुण्याचा प्राचीन वारसा सांगणाऱ्या वास्तूंची मॉडल्स विविध मेट्रो स्टेशन्समध्ये उभारून पुणेकरांना याची माहिती व्हावी, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
आपल्या ज्येष्ठांनी निर्माण केलेल्या वास्तूरचना त्यांचा कित्ता न गिरवता वास्तूकलेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या कल्पक बुद्धिमत्तेच्या आधारे अधिकाधिक सुंदर व पर्यावरणपूरक वास्तूंची रचना करावी, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, उपाध्यक्ष – इंद्रकुमार छाजेड व जेष्ठ सल्लागार आर्की. विकास भंडारी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या “कीस्टोन” या वार्षिक अंकाचे प्रकाशन पाहुण्यांचे हस्ते झाले. संचालक प्रसन्न देसाई यांनी ‘पुणे – द क़्विन ऑफ डेक्कन’ हे पुस्तक पाहुण्यांना भेट दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैक्षणिक समन्वयक शेखर गरुड यांनी केले. प्रसन्न देसाई यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी विजयकांत कोठारी, युवराज शहा यांसह अनेक आर्किटेक्ट, प्राध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.