पुणे : HMPV नंतर गुलेन बॅरी सिंड्रोम ( GBS ) या आजाराने थैमान घातले आहे. पुण्यात या आजाराच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्यात रविवारी या आजराचे १०० रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. या आजाराने एकाचा बळी घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे तर १६ जण व्हेंटिलेटरवर आहेत. मृत व्यक्तीची तपासणी करुन डॉक्टर लवकरच त्यांना या बाबतचा सविस्तर अहवाल सादर करणार आहेत. आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला असून हा आजार मेंदूविषयक असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराचे १०० रुग्ण झाले असून त्यात ६८ पुरुष तर ३३ महिलांचा समावेश आहे. यापैकी ६२ रुग्ण पुणे ग्रामीण, १९ रुग्ण पुणे महापालिका, १४ रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका आणि ६ रुग्ण इतर जिल्हयातील आहेत.या रुग्णांमध्ये तीव्र लक्षण दिसून येत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आजाराचा खर्च लाखोंच्या दारात जात असल्याचं नागरिकांच मतं आहे. दरम्यान याबाबत शासनाकडून काय उपाययोजना केल्या जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
GBS नेमका आहे तरी काय ?
हा आजार एक ऑटोइम्यून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. या आजारात आपली रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या नसांवर हल्ला करते. त्यामुळे रुग्णांना उठणे, बसणे, चालणे, श्वास घेणे देखील कठीण होते आहे. एकूणच अर्धांगवायूची समस्या हे देखील या आजाराचे लक्षण आहे.
GBS आजाराची लक्षण काय ?
– हात, पाय, घोट्या किंवा मनगटात मुंग्या येणे.
– पायात अशक्तपणा.
– चालण्यात अशक्तपणा, पायऱ्या चढण्यात अडचण.
– बोलणे, चघळणे किंवा अन्न गिळण्यास त्रास होणे.
– दुहेरी दृष्टी किंवा डोळे हलवण्यात अडचण.
– तीव्र वेदना, विशेषतः स्नायूंमध्ये तीव्र वेदना.
– लघवी आणि शौचास त्रास होतो .
– श्वास घेण्यास त्रास होणे.
या आजाराला गुलेन बॅरी सिंड्रोम असे नाव का पडले ?
फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट जॉर्जेस गुइलेन आणि जीन-अलेक्झांड्रे बॅरी यांनी फ्रेंच डॉक्टर आंद्रे स्ट्रोहल यांच्यासमवेत १९१६ मध्ये या आजारावर बरेच संशोधन केले. म्हणून या आजाराला गुलेन बॅरी सिंड्रोम असे नाव देण्यात आले. या आजाराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांचा बळी घेतला होता. डी रुझवेल्ट यांचा मृत्यू पोलिओने झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होत मात्र अधिकच्या संशोधनात गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराचे कारण समोर आले.