लोकसभा मतदारसंघनिहाय होणार पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती
२८ ते ३१ जानेवारी दरम्यान पार पडणार मुलाखतींचा कार्यक्रम
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून (Shiv Sena) पक्ष संघटनेत फेरबदल केले जाणार आहेत. पक्षाच्या मुंबई कार्याकरिणीसाठी २८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान लोकसभा मतदार संघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्याचे शिवसेनेने निवेदनाद्वारे म्हटले आहे. शिवसेने कोअर कमिटीचे सदस्य इच्छुकांच्या मुलाखती घेणार असून यानंतर पक्षाचे नवीन पदाधिकारी घोषीत केले जाणार आहेत.
शिवसेनेचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार २८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान शिवसेना पक्षाच्या कोअर कमिटी सदस्यांच्या माध्यमातून लोकसभा निहाय मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेनंतर पक्षाचे नवीन पदाधिकारी जाहीर केले जातील, असे शिवसेना सचिव किरण पावसकर यांनी सांगितले.
Fishing : गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करावे
शिवसेना हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेनेच्या शाखांना विशेष महत्व आहे. महापालिका निवडणुकीसाठी पक्षातील कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी वांद्रे कुर्ला संकुल येथे पार पडलेल्या पक्षाच्या विजयोत्सवात दिले होते. त्यापूर्वी रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणूक आढावा बैठकीत नवीन पदाधिकारी नियुक्त करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार मुंबईत सर्व लोकसभा मतदार संघामध्ये विभाग प्रमुख, महिला विभाग संघटक, विधानसभा प्रमुख (महिला व पुरुष), विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, उपविभाग प्रमुख, उपविभाग समन्वयक, शाखा प्रमुख, पु. शाखा समन्वयक, महिला शाखा संघटक, मा. शाखा समन्वयक, युवा सेना अशा विविध पदांसाठी शिवसैनिकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत, असे पावसकर यांनी म्हटले आहे.
शिवसेना पक्षामध्ये यापूर्वी आणि आताही इच्छुकांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक शिवसैनिकाला काम करत असताना पदाची अपेक्षा असते. त्यामुळे ही जबाबदारी पार पाडण्याची कार्यकर्त्याची क्षमता तपासली जाते आणि सर्वानुमते निवड केली जाते, असे पावसकर म्हणाले.