Sunday, June 15, 2025

Rajul Patel : उबाठा सेनेच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांचा शिंदे गटात प्रवेश

Rajul Patel : उबाठा सेनेच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : जोगेश्वरीच्या माजी नगरसेविका राजुल पटेल (Rajul Patel) यांनी शिवसेना उबाठा पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षाला 'जय महाराष्ट्र' करीत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. राजुल पटेल यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटात आतापर्यंत ८० पेक्षा जास्त सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त माजी नगरसेवक हे उबाठा गटाचे आहेत. यासंदर्भातील माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दिली.


विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांनाच वेध लागले ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिका निवडणुकांचे. त्यात आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या, विधानसभा महिला संघटक आणि माजी नगरसेवक राजुल पटेल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून यावेळी उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांच्याऐवजी हारून खान यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. राजुल पटेल ह्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यरत होत्या, त्याशिवाय त्यांनी २०१९ साली विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. त्यामुळे, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, वर्सोवा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असून या मतदारसंघात राजूल पटेल यांचं राजकीय वजन आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांपासून त्या नाराज असल्याने महापालिका निवडणुकांचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं बोललं जात आहे.



दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेला अनेक राजकीय धक्के बसत आहेत. त्यामध्ये, काही दिवसांपूर्वीच सावंतवाडी येथील तालुका प्रमुखाने ठाकरेंची साथ सोडली असून माजी आमदार राजन साळवी हेही ठाकरेंच साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे जालना व संभाजीनगर जिल्ह्यातही ठाकरेंना धक्का देत काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंना मोठं आव्हान असणार आहे.

Comments
Add Comment