बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तसेच या हत्येशी संबंधित एका खंडणीच्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची बीड जिल्हा रुग्णालयातून बीड जिल्हा कारागृहात रवानगी झाली. तब्येत बिघडल्याचे कारण दिल्यानंतर वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण वाल्मिक कराडच्या तब्येतीबाबत भाजपा आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी प्रश्न उपस्थित केले. यानंतर तब्येत बरी झाल्याचे सांगत वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज्ड देण्यात आला. रुग्णालयाने सोडताच वाल्मिक कराडची लगेच बीड जिल्हा कारागृहात रवानगी झाली. सध्या वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. तो बीड जिल्हा कारागृहाचा कच्चा कैदी आहे.
बुधवारी पोटात दुखत असल्याचे कारण सांगितल्यानंतर वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. आता पुन्हा एकदा वाल्मिक कराडची बीड जिल्हा कारागृहात रवानगी झाली आहे. मुंबईमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी बोलताना वाल्मिक कराडसह सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात ठेवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. पोटदुखी आणि स्लिप अॅप्नियासाठी आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज काय ? असाही प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला होता. वाल्मिक कराडवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती सार्वजनिक करावी, अशीही मागणी अंजली दमानिया यांनी केली. आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांनी वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्यांचीही चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली. यानंतर वाल्मिक कराडची पुन्हा बीड जिल्हा कारागृहात रवानगी झाली.