Thursday, April 24, 2025
Homeसाप्ताहिककोलाजनेरुरचे प्रसिद्ध कलेश्वर मंदिर

नेरुरचे प्रसिद्ध कलेश्वर मंदिर

सतीश पाटणकर

महाराष्ट्रातील कोकण या प्रांतात असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, कुडाळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच कुडाळ शहर हे कुडाळ तालुक्याचे मुख्यालय असून हा तालुका लोकसंख्येच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे शहर कोकणच्या तळकोकण भागात मालवणच्या सुमारे ३० किलोमीटर पूर्वेस वेंगुर्ल्याच्या सुमारे ३० किलोमीटर उत्तरेस व मुंबईच्या ४७५ किलोमीटर दक्षिणेस वसलेले आहे. पूर्वीच्या काळी कुडाळ येथून कुडाळदेश (रत्नागिरी ते गोवा) या प्रांताचा कारभार चालायचा. या परागण्यावर कुडाळदेशस्थ प्रभू हे देशमूख होते. या सत्ताधीशांनी अनेक संघर्ष बघितले. सुरुवातीच्या काळात या प्रांतावर हिंदू राजांचा प्रभाव होता. पुढे विजापूरच्या आदिलशहाने येथे वर्चस्व मिळवले. त्यांनीही या परागण्यावर देसाई किंवा देशमुख यांची नियुक्ती केली. शहरापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या नेरुर गावात श्री देव कलेश्वर प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. शैव, वैष्णव भेद विरहीत असलेले हे देवस्थान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. कलेश्वर या शब्दाचा अर्थ कलेचा ईश्वर असा आहे.

चहू बाजूंनी डोंगररांगांनी व शेजारीच असलेले कलेश्वर तलाव यामुळे या मंदिराचे सौंदर्य अजूनच खुलते. मंदिर मुख्य रस्त्याशेजारीच असून येथे येणाऱ्या नवागतास हे मंदिर विश्राम स्थान म्हणून उपयुक्त ठरते. शिवलिंगाच्या उजव्या बाजूस गणपती व डाव्या बाजूस नंदीच्या समोर म्हणजेच पिंडी व नंदीच्या मधे शुक्राचार्यांची मूर्ती आहे. अशी अपवादात्मक असलेली शुक्राचार्यांची मूर्ती हेसुद्धा या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. या मंदिरात ब्रह्मा, विष्णू, गायत्री, सावित्री आणि लक्ष्मी अशा देवता आहेत. इतर परिवार देवता मंदिराच्या आसपास स्वतंत्र मंदिरात स्थापित केलेल्या आहेत. पाच दिवस शिवरात्र उत्सव चालतो. धार्मिक परंपरांप्रमाणेच सांस्कृतिक उत्सवही मोठा असतो. पाचव्या म्हणजे शिवरात्री दिवशी श्रींचे दर्शन घेण्यासाठी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांची रांग लागते. लोक विविध ठिकाणांवरून श्रींच्या दर्शनासाठी येतात.

शिवरात्रीच्या मध्यरात्रीनंतर श्रींची नेत्रदीपक विद्युत रोषणाई करून रथातून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी, विविध वाद्यवृंद व भाविकांच्या अलोट गर्दीत उसळणारा ‘पार्वती पते हर हर महादेव’ हा नाद यामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित झालेला पाहावयास मिळतो. श्रींच्या मिरवणुकीची मंदिराभोवती एक परिक्रमा पूर्ण केली जाते. मिरवणुकीसाठी वापरण्यात येणारा रथ पूर्णपणे लाकडी, कोरीव कामयुक्त, पाच मळ्यांचा बनविलेला असतो. रथाला केलेली रंगरंगोटी नेत्रदीपक असते. मिरवणुकीची परिक्रमा पहाटेपर्यंत पूर्ण होते. त्यानंतर दशावतारांकडून मंदिरात दहिकाला व रथासमोर राधाकृष्ण नृत्य केले जाते. त्यानंतर इतर सरजामासहित श्रींची उत्सवमूर्ती मुख्य मंदिरात नेली जाते. येथेच या उत्सवाची सांगता होते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -