शंतनू चिंचाळकर
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण हातात तिरंगा घेऊन एक दिवस मिरवत असलेले देशप्रेम किती खोटे आणि बेगडी आहे, याची कधी तरी जाणीव होतेच. देशाच्या सुरक्षिततेच्या, स्वच्छतेच्या आणि वर्तनाच्या बाबतीत करत असलेल्या हलगर्जीपणामुळे आपल्याला याची कुठे तरी जाणीव असतेच, पण कळत असून वळत नाही अशातला प्रकार आहे. ७५ व्या प्रजासत्ताक दिनी ही जाणीव सामान्यजनांचे डोळे उघडेल का? २६ जानेवारी हा तो विशेष दिवस, जेव्हा आपले राष्ट्र हे प्रजासत्ताक सार्वभौमत्व पत्करलेले राष्ट्र झाले. त्या दिवशी देशातल्या प्रत्येक नागरिकांवर काही अधिकारांबरोबर देशाचे रक्षण, देशाची शान, राष्ट्राची ओळख आणि विकास यांना हातभार लावायची खऱ्या अर्थाने जबाबदारी आली. प्रजासत्ताक म्हणून मिळालेल्या अधिकारांच्या बाबतीत प्रत्येकजण जसा तत्पर असतो, तसा तो जबाबदाऱ्यांच्या बाबतीत असतो का, यानिमित्ताने विचारण्याजोगा मोठा प्रश्न आहे. देशातल्या नागरिकांची वागणूक तशी आहे का हाही या अानुषंगाने चर्चेचा विषय होईल. कारण केवळ ‘भारतमाता की जय’ म्हणत एक दिवस मिरवले आणि देशभक्तीपर चार गाणी ऐकली की आपल्याला देशाबद्दल असलेला आदर आणि प्रेम व्यक्त होते, अशी भाबडी समजूत आपल्यापैकी प्रत्येकजण करत आला आहे. प्रजासत्ताक दिनी प्रत्येकाचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत असतो. राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या दिवशी शुभ्र पांढऱ्या रंगाचे गणवेश घातलेली शाळकरी मुले, परीटघडी कपडे घातलेली आपली नेते मंडळी पाहिली आणि शिक्षणसंस्था, शासकीय कार्यालयांचा त्या दिवसापुरता स्वच्छ आणि टापटीप केलेला परिसर पाहिला की, दरवर्षी काही विचार मनात येतात. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेली, माहिती आणि तंत्रज्ञान तसेच इतर विविध संशोधन क्षेत्रामध्ये आपण कौतुकास्पद कामगिरी केली. देशाची कीर्ती जगभर पसरली, देश जगातील सहावी महासत्ता बनला. असे असूनही काही क्षेत्रांमधील छोट्या-छोट्या चुकांमधून आणि बेफिकीर वृत्तीतून सुरक्षा धोक्यात येते, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा डागाळते, ही तमाम भारतवासीयांना लाजिरवाणी वाटावी अशीच बाब आहे.
देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आणि आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अपराधिक घटनांच्या अानुषंगाने नागरिकांची मला काय देणे-घेणे, माझा काय संबंध ही बेजबाबदार वृत्ती दिसून येते. पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये, दिल्ली-मुंबईसारख्या राजधान्यांच्या शहरांमध्ये पाच-सहा अतिरेकी येतात, एके ४७ सारखी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, स्फोटके आणतात, पाच-सहा दिवस एखाद्या लॉजवर किंवा स्वतंत्र घर घेऊन राहतात, भाड्यापोटी विश्वास बसणार नाही अशा रकमांची उधळण करतात, खाण्या-पिण्यावर, मौजमजेवर पैसा उडवतात, शहरात आधीपासूनच पेरून ठेवलेले त्यांचे हस्तक (स्लीपर सेल) त्यांना येऊन भेटतात, तिथे बॉम्बस्फोटांचे कट रचतात पण त्याचा आजूबाजूच्या रहिवाशांना त्याचा पत्ता सुद्धा लागत नाही अथवा संशय येत नाही, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने यासारखी दुसरी बेपर्वाई नसेल. अशा हालचालींवर प्रत्येक सुजाण नागरिकाने बारकाईने लक्ष ठेवल्यास आपल्या भागात आणि पर्यायाने संपूर्ण देशात घडणाऱ्या अपराधी आणि अतिरेकी घटना आपण टाळू शकू आणि तेव्हाच आपण खऱ्या प्रजासत्ताक राष्ट्रातले देशप्रेमी नागरिक होऊ. आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या बेकार असूनही श्रीमंतांचे सगळे शौक असलेल्या तरुणांविषयी, ते करत असलेल्या बेकायदेशीर, अपराधिक गोष्टींकडे तर जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. भविष्यात अशा तरुणांचा देशविरोधी शक्तींकडून देशद्रोही कृत्ये करण्यासाठी वापर होण्याची शक्यता असते.
आपण स्वतःला प्रजासत्ताक राष्ट्रातले नागरिक म्हणत असू, पण प्रत्यक्षात इथे मूठभर राजकारण्यांची, त्यांनी पोसलेल्या अपराधिक वृत्तीच्या गुंडांची सत्ता दिसून येते. देशातील लाचखोरीला साथ देऊन, आपराधिक वृत्तीला खतपाणी घालणारे आणि तरीही स्वतःला सुजाण म्हणवणारे हे देशाचे नागरिकच असतात. जबाबदार भावी प्रजा म्हणून ज्यांच्या हाती सत्ता सोपवावी, ती शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले केवळ चैनीसाठी, महागड्या गाड्यांवरून फिरण्यासाठी, मुलींवर पैसा खर्च करण्यासाठी अपराधिक क्षेत्राकडे वळत आहेत. गाड्या चोरणाऱ्या, महिलांची मंगळसूत्रे खेचणाऱ्या अपराध्यांमध्ये अल्पवयीन मुलांची संख्या लक्षणीय आहे. अशा मुलांच्या राहण्या-सवरण्याच्या पद्धतीमध्ये घडून आलेला बदल पोलीस आपल्या हस्तकांमार्फत शोधू शकत असतील, तर ज्यांनी जन्म दिला आणि दिवसातले किमान आठ-दहा तास ज्यांच्या नजरेसमोर अशी मुले असतात, त्या पालकांच्या ध्यानीमनी हे येत नसेल तर त्याला दुर्दैव म्हणावे की अक्षम्य हलगर्जीपणा म्हणावा? अशा मुलांवर काटेकोर लक्ष ठेऊन पालक गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्यापासून नक्कीच रोखू शकतात. आपल्या पाल्याला एक जबाबदार नागरिक बनवू शकतात.
राष्ट्राच्या विकासातला एक मोठा अडसर म्हणजे देशातल्या महानगरपालिका किंवा स्थानिक प्रशासकीय यंत्रणांचा बराचसा निधी आणि मनुष्यबळ हे स्वछतेसारख्या विषयावर खर्च होणे. ही आपल्या देशाची शोकांतिका म्हणावी लागेल. झाडांच्या पालापाचोळ्यांखेरीज रस्त्यांवर अथवा सार्वजनिक रस्त्यांवर पडलेल्या कचऱ्यांमध्ये तरुणांनी फेकलेल्या मद्याच्या बाटल्या, पानमसाला, गुटख्याच्या पुड्यांचा कचरा लक्षणीय असतो. कॉलेजवयीन मुले म्हणजे देशाचे भवितव्य म्हणून ज्यांच्याकडे पाहावे ती तरुण पिढीच व्यसनाधीन होऊन अशी वागत असेल, तर आपले भविष्य अंधारमय आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. शाळांच्या प्रभातफेरीमध्ये सकाळी ‘भारतमाता की जय’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणा देणारी शाळकरी मुले पुढे वर्षभर शाळांमध्ये येता-जाता वह्यांच्या पानांचे चिटोरे, चॉकलेटचे कागद, बिस्कीट पुड्यांची रिकामी वेष्टने रस्त्यावरून चालताना सहज उधळताना दिसतात. अशावेळी घरी पालकांकडून किंवा शाळेत गुरुजनांकडून त्यांना स्वच्छतेविषयी काहीच शिकवण मिळत नसेल का? देशाचे जबाबदार भावी नागरिक म्हणून आशेने पाहावे, त्या विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेविषयीच्या सवयींबद्दल पालक आणि गुरुजनवर्ग इतके उदासीन कसे असू शकतात, असे प्रश्न मनात साहजिकच उभे राहतात. यामुळे प्रजासत्ताक म्हणजे देशाच्या प्रजेला बेफिकिरीने वागण्याची सत्ता मिळाली की काय, असा संभ्रम मनात निर्माण होतो पण, त्या शाळकरी मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये काय फरक आहे?
शहरातून फिरणाऱ्या गाड्यांमधून, सहलीला जाणाऱ्या पर्यटकांकडून, खासकरून तरुण वर्गाकडून, आलिशान कारमधून कागदाचे कपटे, मिनरल वॉटरच्या बाटल्या गाडीच्या खिडकीतून रस्त्यावर फेकल्या जातात. मोठमोठ्या शॉपिंग मॉल्समधून खरेदीला जाणारे, महागड्या गाड्यातून फिरणारे आणि स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणवणारे नागरिक झोपडपट्ट्यांकडे बोटे दाखवतात, तेव्हा कीव येते, कारण हे लोक राहत असलेली अपार्टमेंट्स, सोसायट्या यांचे बकाल होत चाललेले परिसर पाहिले की, आपण झोपडपट्टीत आल्याचीच भावना होते. रेल्वे, एसटीसारखी सार्वजनिक वाहतुकीची साधने, आपल्या मनोरंजनासाठी फुलवलेल्या आणि जोपासलेल्या बागा, सिनेमागृहे यांची अवस्था तर करुणास्पद आहे. हल्ली ठिकठिकाणी केरकचरा टाकण्यासाठी सोयी उपलब्ध करून दिलेल्या असतानाही दोन-तीन तास आपण मनोरंजनासाठी जातो, तो परिसर आपण स्वच्छ ठेऊ शकत नाही, हे खरोखर लज्जास्पद आहे. शहरातील मोठ्या रस्त्यांवर असलेल्या प्रसिद्ध चौकांमधून सुशोभीकरणासाठी लावलेली झाडे, रस्त्यांच्या दुतर्फा शोभिवंत झाडे लावण्यासाठी केलेली आळी यांची अवस्थाही बिकट दिसते. १५-१५ दिवस त्यांची साफसफाई कोणी केली आहे की नाही, हा प्रश्न पडावा. दोन-चार मिनिटांसाठी वापरली जाणारी सार्वजनिक स्वच्छतागृहे जागोजागी पानांच्या पिचकाऱ्या मारून खराब केलेली आढळतात.
या पार्श्वभूमीवर मातृभूमी म्हणतो त्या देशाबाबतीत मोठ्यांमध्ये जी देशप्रेमाची भावना रुजली नाही, ती लहानग्यांकडून ठेवली जाईल याची काय अपेक्षा ठेवायची? स्वतःला जसे स्वच्छ आणि नीटनेटके राहायला आवडते, स्वतःचे घर जसे टापटीप ठेवण्याचा प्रत्येकजण आटोकाट प्रयत्न करतो, स्वतःची, कुटुंबाची जशी जपणूक करतो तशी प्रत्येक सार्वजनिक मालमत्ता मी स्वच्छ ठेवेन, आत्मीयतेने जपेन ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात का रुजू नये? एकूणच देशाच्या प्रगतीसाठी, दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी, देश सुंदर, सुजलाम, सुफलाम होण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक नागरिकाने प्रतिज्ञा केली आणि त्या अानुषंगाने वागून दाखवले तरच या प्रजासत्ताक राष्ट्राचा जबाबदार नागरिक म्हणून ‘भारतमाता की जय’ म्हणण्याचा अधिकार असेल.