क्राइम – अॅड. रिया करंजकर
व्यवसायिक क्षेत्रांमध्ये स्पर्धा वाढत चालली आहे आणि प्रत्येक ठिकाणी स्पर्धा चालू असलेली दिसत आहे. काही लोक प्रामाणिकपणे अभ्यास करून आपला व्यवसाय निवडतात, तर काही व्यवसायात कष्टाने प्रगती प्राप्त करतात. पण काही असे लोक असतात की त्यांना कष्ट नको असतात. फक्त प्रगती आणि पैसा हवा असतो.
प्रत्येक कोर्टामध्ये अनेक वकील आपल्याला दिसतात. काही कोर्टामध्ये कोर्टाच्या बाहेर प्रवेश द्वारापासूनच हे वकील उभे असतात. ज्या अशिक्षित लोकांना खरं काय आणि खोटं काय हेदेखील माहीत नसते. ते माहिती नसलेल्या वकिलाच्या हातामध्ये आपली केस देतात.
सपना ही तिच्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत होती. तिथे नावाजलेली अशी वकील होती. गेली दहा वर्षे ती वकिली करत होती. जेवढे नावाजलेले वकील होते तेवढ्या सहकाऱ्यांसोबत ती कुचकट वागत होती. कधी कधी ती आपल्या सहकाऱ्यांच्या केसेसही आपल्याकडे ओढून घेत असे. मी त्यांच्यापेक्षा तुमची केस चांगल्याप्रकारे लढू शकते असा विश्वास ती समोरच्या क्लाइंटला दाखवत असे आणि नेहमी इतर सहकाऱ्यांपेक्षा ती क्लाइंटकडून कमी पैसे घ्यायची. त्याच्यामुळे क्लाइंट लोक तिच्याकडे जात होते. काही सहकारी तिला घाबरूनच असत. कारण ती त्याच पद्धतीने वागायची. पण कधी कधी तिच्या सहकाऱ्यांना असं जाणवायचं की, वकिलीमध्येे जरी दहा वर्षे हिने प्रॅक्टिस केली तरी हिला नॉलेज मात्र कमी आहे. कारण ज्यावेळी वकिलांमध्ये चर्चा व्हायची, त्यावेळी समाधानकारक उत्तर हिच्याकडून मिळत नसत. त्यावेळी सहकाऱ्यांना वाटायचं ही खरोखरंच वकील आहे का तर हिच्याकडे सनद नंबर होता. कारण कोर्टामध्ये केस फाईल करताना तो सनद नंबर ती लिहायची आणि सर्व कोर्टाची कामे ऑनलाईन पद्धतीने झाल्यानंतर प्रत्येक वकिलाला आपला सनद नंबर आणि त्याच्याबरोबर रजिस्टर आयडी आणि फोन नंबर लिहावे लागत होते. म्हणजे त्या ईमेल आयडीवर त्या केस संदर्भात माहिती आणि त्या त्या जिल्ह्यातील युजर आयडी मिळत असे.
ज्यावेळी सपनाने नवीन केस फाईल केली त्यावेळी व्यक्तीला तो सनद नंबर आणि स्वतःचा ईमेल आयडी द्यावा लागला होता. ई-फाइलिंग होताना ती केस फाईल होत नव्हती आणि त्याच दरम्यान अनेक वकिलांनी आपल्या सनद नंबरबरोबर आपला ई-मेल आयडीवर फोन नंबर जॉईन केले होते. त्यामुळे अनेक लोकांचे ई-फायलिंग होत होते आणि त्याचवेळी सपनाच्या ई-मेल आयडीला जॉईंट असलेला सनद नंबर चुकीचा आहे. हे ई-फाइलिंग करणार यांच्या लक्षात आलं आणि त्याच दरम्यान तिथे काही दिवसांनी ई-फायलिंग करायला दुसरा वकील आला असता त्याचाही सनद नंबर तोच होता. पण तो सनद नंबर त्याच्या ई-मेल आयडीला रजिस्टर केलेला होता. त्याच्यामुळे त्याची फायलिंग व्यवस्थित झाली आणि काहीतरी गडबड आहे हे समजल्यावर ही फायलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ज्याचं ई-फायनिंग झालं होतं त्या वकिलाने या नंबरवर झालेला गोंधळ सांगितला, तर त्या वकिलाने आपलं बार कौन्सिल कार्ड आणि हा आपलाच नंबर आहे हे सांगितलं. त्यावेळी सपनाकडे तिचं आयडी कार्ड मागण्यात आलं, तर ते दाखवायला तयार नव्हती. समोरच्या वकिलाने पोलिसात तक्रार केल्यानंतर सनद नंबरची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तो सनद नंबर दुसऱ्याच वकिलाचा होता आणि त्याचा वापर सपना गेली दहा वर्षे करत होती. ई-फाइलिंग नसल्यामुळे हा गोंधळ कोर्टात लक्षात आला नाही. आणि ई-फाइलिंग झाल्यावर तिने केलेला फ्रॉड हा लक्षात आला. मुळात सपना ही वकील नव्हती तरीही बोलण्याचे चातुर्य असल्यामुळे ती वकील असल्याचे मिरवू लागली आणि असंच तिला एक दिवस समोरच्या वकिलाचा सनद नंबर मिळाला. त्या सनद नंबरचा वापर करून वकिली करू लागली. साधासुध्या माणसांना ती फसू लागल्यामुळे कोणी तिचे कधी आयडी कार्ड विचारलेच नाही. कारण तिने इतरांमध्ये आपला धबधबा निर्माण केला होता आणि सहकारी वकील तिला घाबरत होते.
पोलिसांनी तिला आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि तिच्यावर आता केस चालू केलेली होती. परंतु दहा वर्षांमध्ये ज्या केसमध्ये तिने आपला वकालत नामा टाकलेला होता व ज्यांचे निकाल लागले होते त्यांचं भवितव्य नक्कीच धोक्यात आले होते. अनेकांचे तिने नुकसानही केलं होतं आणि तेवढेच नाही तर भारत सरकारची तिने फसवणूक केलेली होती म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(सत्यघटनेवर आधारित)