पालघर : मुंबईत चोरीच्या प्रयत्नात एका बांगलादेशी नागरिकानं बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केल्याच्या घटनेनंतर, बेकायदेशीर परदेशी नागरिकांचा मुद्दा चर्चेत आला आहे. अशातच आता पालघर जिल्ह्यात अवैध कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सात महिलांचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या सर्व बांगलादेशी नागरिकांचं वय २७ ते ४५ वर्षांच्या दरम्यान आहे. आरोपींकडे प्रवासासाठी किंवा ओळख पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्र आढळली नाहीत. हे लोक बांगलादेशातील त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात राहण्यासाठी मोबाईल ऍपचा वापर करत होते.विरारचे पोलीस उपायुक्त (झोन-III) जयंत बजबळे यांनी सांगितले की, या अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांना शुक्रवारी नालासोपाराच्या धानीवबाग भागातील गंगाडी पाडा येथून पकडण्यात आलं आहे.
चौकशीदरम्यान अटक केलेल्या बांगलादेशींनी पोलिसांना सांगितलं, ते पश्चिम बंगालच्या 24 परगणा जिल्ह्यातील हकीमपूर गावातून भारतात घुसले होते. यानंतर, ते ट्रेनने मुंबईला पोहोचले आणि पालघरमध्ये स्थायिक झाले.
अटक केलेल्या बांगलादेशी आरोपीवर फॉरेनर अॅक्ट, भारतीय पासपोर्ट कायदा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं, या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे आणि हे लोक देशात झालेल्या एखाद्या गुन्ह्यात सहभागी आहेत का याचीही पडताळणी केली जात आहे. पोलिसांनी स्थानिक लोकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी त्यांच्या परिसरातील संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळप पोलिसांना द्यावी. जेणेकरून अशा प्रकरणांवर वेळेवर कारवाई करता येईल.