Friday, February 14, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यबोर्डाच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख कशासाठी?

बोर्डाच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख कशासाठी?

हॉल तिकिटांवर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्यानंतर राज्यात वाद झाला होता, तर हॉल तिकीटवर केल्या गेलेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखानंतर शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या या निर्णयावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. परिणामी, या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय मागे घेतला. आता इयत्ता १० आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी नव्याने प्रवेशपत्र जारी करण्यात आले. पण प्रश्न मात्र उपस्थित होतो की, बोर्डाच्या हॉरू तिकिटावर जातीचा उल्लेख कशासाठी?

रवींद्र तांबे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचा विचार करता बारावीच्या हॉल तिकिटावर जात व प्रवर्गाचा उल्लेख केलेला होता. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निराशाजनक वातावरण दिसून आले. तेव्हा बोर्डाची परीक्षा अगदी तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविणे गरजेचे असते. आज आपण विज्ञान युगात वावरत आहोत याची जाणीव परीक्षा मंडळाला असायला हवी होती. तसे झालेले दिसत नाही. त्यापेक्षा बोर्डाने परीक्षेच्या निकालाच्या वेळी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल असे जर मुलांना संकेत दिले असते तर विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळाले असते. कारण परीक्षा बोर्डाने गेली अनेक वर्षे गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली नाही. ती गुणवत्ता यादी या निकालापासून सुरू करीत असल्याचे घोषित केले असते तर विद्यार्थी अधिक जोमाने अभ्यासाला लागले असते.

फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जातीच्या श्रेणीचा कॉलम छापण्यात आल्याने शिक्षण प्रेमींनी विरोध केला. त्यामुळे परीक्षा बोर्डाला विद्यार्थ्यांना नवीन हॉल तिकीट २३ जानेवारीपासून बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध झाले आहे. त्याआधी १० जानेवारीपासून बोर्डाच्या संकेतस्थळावर हॉल तिकीट उपलब्ध झाल्याने त्यावर जातीच्या श्रेणीचा उल्लेख असल्याने विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक आणि शिक्षण प्रेमींच्या लक्षात आल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तसेच या कॉलममुळे दलित वर्गातील विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला असला तरी असे प्रकार पुढे होऊ नये म्हणून बोर्डाने योग्य ती खबरदारी घ्यावी. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे अभ्यासक परीक्षा बोर्डावर असणे आवश्यक आहे. तेव्हा असे प्रकार होतातच कसे याचा विचार व्हायला हवा. कारण परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही याची काळजी परीक्षा बोर्डाला घ्यावी लागते. त्यामुळे शिक्षण मंडळाने १८ जानेवारीला हॉल तिकिटावर असलेला जात कॉलम मागे घेत असल्याची घोषणा केली. कारण ११ फेब्रुवारी इयत्ता बारावी व २१ फेब्रुवारी इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होत आहे. यापेक्षा अलीकडच्या काळात गुणवत्ता यादी बंद केली तरी ज्या शाळांचे निकाल १०० टक्के लागतील तसेच ज्या विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळतील त्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब व दिव्यांग असेल तर अशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचा खर्च बोर्ड करेल अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणाऱ्या योजना सुरू करायला हव्यात.
विभागीय बोर्डाचे नाव, शाखा, विद्यार्थ्याचे नाव, विद्यार्थ्यांच्या आईचे नाव, जन्मतारीख, परीक्षा क्रमांक, केंद्राचे नाव, दिव्यांग, विषयाचा कोड नंबर, विषयांची नावे, उत्तरे लिहिण्याची भाषा, दिनांक आणि वेळ असे हॉल तिकिटावर ठळक अक्षरात लिहिलेले असते. त्यामुळे कोणता पेपर कोणत्या तारखेला व वेळेला आहे याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्याप्रमाणे विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत असतात. मात्र यावेळच्या हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली गेली, तर विविध सामाजिक संघटनांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जाहीर निषेध केला आहे. यासाठी परीक्षा बोर्डाने दक्ष राहणे गरजेचे आहे. कोणतेही निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घेताना विद्यार्थ्यांचा ताण वाढणार नाही याची काळजी परीक्षा बोर्डाला घ्यावी लागेल. म्हणजे घेतलेला निर्णय रद्द करण्याची वेळ येणार नाही. असे बदल केल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप होतोच; परंतु पुन्हा खर्च सुद्धा वाढत असतो. त्या वाढणाऱ्या खर्चाला जबाबदार कोण? याचा विचार होणे आवश्यक आहे.

विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सर्वात प्रमुख कार्य म्हणजे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आयोजित करणे व त्यांचा निकाल वेळीच लावणे होय. अर्थात परीक्षा संपल्यावर ४५ दिवसांच्या आत निकाल लावण्यात यावा. यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर होईल असे आपल्या राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी १७ जानेवारी रोजी पुणे दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले. दहावी आणि बारावीच्या परीक्षा राज्यात विविध नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित केल्या जातात. यामध्ये पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नाशिक, अमरावती, लातूर, नागपूर कोल्हापूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचा समावेश आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील बोर्डाने बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटांमधून जात व प्रवर्गाचा उल्लेख मागे घेतला आहे. तेव्हा परीक्षेच्या काही दिवस अगोदर विद्यार्थ्यांचे मन दुखावले जाणार नाही? असा बदल परीक्षा मंडळाने घेऊ नये. तेव्हा फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील जात प्रवर्गाचा केलेला उल्लेख परीक्षा मंडळाने रद्द केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा ताणतणाव निर्माण न करता बिनधास्तपणे बोर्डाची परीक्षा द्यावी. तेव्हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेच्या पूर्वी विद्यार्थ्यांना मनस्ताप होणार नाही असा कोणताही निर्णय घेऊ नये अशी राज्यातील शिक्षण प्रेमींची मागणी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -