भालचंद्र कुबल – पाचवा वेद
अगदी लेखाच्या सुरुवातीलाच सांगून टाकतो की,“उर्मिलायन” हे नाटक मला आवडलं, भावलं, पटलं, रुचलं आणि कळलं, म्हणूनच त्याबद्दल आवर्जून हे नाट्यनिरीक्षण (समीक्षण नव्हे…!) नोंदवत आहे. नाटकाचा प्लॉट आवडला, कलाकारांचा अभिनय भावला, सिनेमॅटीक सादरीकरण पटलं, व्यक्तिरेखा रुचल्या आणि म्हणूनच स्त्री शक्तीबाबत लेखकाने अधोरेखित केलेले तर्क कळले. सुनील हरीश्चंद्र, निहारीका राजदत्त, अजय पाटील, पूजा साधना, कल्पिता राणे, सुजय पवार, ऋचा पाटील, चेतन ढवळे, उदयराज तांगडी आणि निनाद म्हैसाळकर यांनी प्रयोगाला दृष्ट लागण्याजोगी उंची गाठून दिली. (यात डान्सर्स ग्रुप वगळता ज्यांची नावं नाहीत त्यांनी आपल्या कामाबाबत आत्मचिंतन करावं..!) तर अशा पद्धतीची निर्मिती करणाऱ्या निखिल जाधवचं खरंच कौतुक करायला हवं. दोन आणि तीन पात्रांच्या नाटकांचा ट्रेंड असताना उर्मिलायनची निर्मिती करण्यास धजावणं या धाडसाबद्दल त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत, वेगवेगळ्या राष्ट्रीय नाट्यमहोत्सवातून, नाट्य महाविद्यालयातून या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत असं मनोमन वाटतं. असो..! शेवटी प्रत्येक कलाकृती स्वतःचे प्राक्तन आणि आयुष्य घेऊनच जन्माला येत असते.
मी आज लिहिणार आहे ते एकंदर नाट्यलेखनाच्या आनुषंगाने. आजवर भारतीय साहित्यात ३०० पेक्षाही जास्त लेखकांनी रामायण लिहिले आहे. त्यात गदिमांपासून, रामानंद सागर ते आनंद निळकंठन अशी गेल्या २०-२५ वर्षांपर्यंतची सूची आढळते. आजही भारतीय साहित्यावर आणि विशेषतः नाटककारांवर या महाकाव्याचा प्रचंड पगडा आहे. स्वतंत्रपणे कथाबीजांची निर्मिती रामायणातील सूत्रांशिवाय अनेकांना कठीण जाते. परंपरावादी लेखन शैलीचा कल तर रामायणाकडेच झुकलेला आढळतो. आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटत राहते की पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा लेखन पगडा झुगारून आपण (म्हणजे आजची लेखक पिढी) स्वतंत्र विचार करणार आहोत की नाही? सुनील हरिश्चंद्र जेंव्हा अप्रत्यक्ष वनवास भोगलेल्या लक्ष्मण पत्नी उर्मिलेचा जीवनपट मांडतो, त्यावेळी तोही रामायणाचा एक लेखक होतो. त्याच्याशी बोलताना आणि नाटक पाहताना त्याने अनेक संदर्भ विविध साहित्यकृतींतून घेतल्याचे जाणवते. त्यापैकी स्मिता दातार यांची उर्मिला या बहूचर्चित कादंबरीतील संदर्भ त्याने नाट्यलेखनात जागोजागी वापरले आहेत. यावर माझे मत असे की उर्मिला हे काही ऐतिहासिक पात्र नाही, ज्याचा उल्लेख बखरींसारख्या कागदोपत्रात पुरावा म्हणून सापडू शकतो. ज्याने त्याने आपापल्या कल्पनाशक्तीनुसार जर रामायण चितारलेय, तर तो त्याचा कॅनव्हास समाजाने मान्य केलाच आहे की…! किंबहूना उर्मिलायन बाबत लिहायचे झाल्यास दुसऱ्या अंकातील १४ वर्षांचा विरह सोसलेली आणि केवळ पत्नी म्हणून उरलेली उर्मिला पूर्णतः लेखकाच्या सृजनशीलतेचा आविष्कार आहे. हे लेखन स्वातंत्र्य त्याची जशी क्रिएटीव्हिटी दाखवून देते तशीच ते अभिनेत्यांसमोर आव्हान उभे करते. या लेखनापासून सुरू होऊन सादरीकरणापर्यंतच्या प्रक्रियेबाबत व्यक्तिरेखेचा विकास विविध अंगानी अपेक्षित असतो. उर्मिला या व्यक्तिरेखेचा विकास लेखकास अगदी पहिल्या प्रसंगापासून अपेक्षित आहे. कारण उर्मिला शस्त्रसराव करताना जेंव्हा लक्ष्मणास भेटते तेंव्हा तिचे दोन गुण प्रेक्षक जाणतात. पहिला अर्थातच युद्धशास्त्रातील तिचे नैपुण्य व दुसरा राज्यशास्त्रातील तिचे पारंगत्व…! दुसरा गुण भरत ज्यावेळी अयोध्येचा राज्यकर्ता होणे नाकारतो, त्यावेळी त्यास समजावण्याच्या प्रसंगात दिसून येतो. मात्र तो तिचा गुण म्हणून अधोरेखित होत नाही.
मध्यंतराअगोदर काही काळ व नंतर अखंड दुसरा अंक उर्मिला आपल्याला वनवासापासून का दूर ठेवले गेले याचे तार्किक कारण शोधत राहते, आणि तिचा हा शोध स्त्री स्वातंत्र्याचा एक अनोखा पैलू उलगडून दाखवतो, या बाबत दुमत नाहीच; परंतु आपण नाटक या दृष्यरुपी माध्यमासाठी जेंव्हा लेखन करतो तेंव्हा चर्चेपेक्षा प्रसंगरोपण नाट्य अधोरेखित करण्यास प्रभावी अथवा परिणामकारक ठरण्यासाठी लेखन करण्यास काय हरकत आहे ?. अचानक राज्याची जबाबदारी पडलेला राजा जेंव्हा भावनिक हतबलता व्यक्त करतो तेंव्हा वर उल्लेखिलेल्या दोन गुणांमुळे ती भरताला राज्यकारभारात मदत करून एखाद्या युद्धप्रसंगाचे प्रसंग रोपण केले गेले असते तर त्यास अजूनही एक डायमेंशन प्राप्त नसती का झाली ? आणि मग या वैविध्यातून तावून सुलाखून निघाल्यावर एका राज्याची राजनीती सांभाळता सांभाळता तिच्यातील लक्ष्मणाची सखी होण्याच्या नात्याचा अंत का झाला याचे लॉजिक नसते का सापडू शकले? असे दुसरा अंक बघताना वाटून जाते. उर्मिलेच्या वाट्यास आलेला अपमान, पश्चाताप, अंतर्कलह, उद्वेग व वियोग हा सातत्याने रिपिट होत राहतो. त्यामुळे पहिल्या अंकात प्रभावी ठरलेल्या सिनेमॅटीक परीभाषेचा वापर दुसऱ्या अंकात भाषिक, वाचिक आणि तात्विक परीभाषेच्या आहारी जाणे गरजेचे होते का ? हा मला पडलेला प्रश्न आहे. कदाचित सुनील हरिश्चंद्रचा विचार उर्मिलेच्या भावनांपर्यंतच सिमीत शब्दचित्रण करण्याचा असू शकतो आणि त्यातही परिणाम साधता येतो हे दिसून येतेच; परंतु या प्रवासात निहारिका राजदत्तला आपले अभिनय सामर्थ्यपणाला लावावे लागते. अभिनयामुळे होणारी दमछाक काय व कशी असते, हे निदान अनुभवण्यासाठी तरी उर्मिलायन पाहावे. ( सॉरी विषयांतर झाले, आपण लेखनाच्या अानुषंगाने चर्चा करत होतो.)… तर, उर्मिलेची नायिका प्रधान व्यक्तिरेखा रेखाटताना सीता, लक्ष्मण, भरत आणि तिच्या दासीच्या भूमिकांची जोड देऊनच सादरीकरणाच्या कथेचा डोलारा उभा केला गेला आहे.
आता या पात्रनिर्मितीत प्रत्येकाचे उर्मिलेचा जीवनपट पुढे नेण्यामागचे योगदान या आधीच्या ३०० रामायणकारांनी सांगून ठेवलेच आहे की…! जर उर्मिलायनचा लेखक याआधी कधीही समोर न आलेला पट उलगडू पहातोय तर एखाद्या वैचारीक तत्वनिष्ठ प्रसंगास अंतर्भूत करण्यास हरकत नव्हती. यातून सुनील हरीश्चंद्र हा नव्या पिढीचा रामायणकार ठरला असता. त्याच्या लिखाणात भाषिक सौंदर्य आहेच व ते वेळोवेळी जाणवतेच; परंतु ते संदर्भांच्या आहारी गेलेले आहे. उदा. नाटकातील काही टाळ्यांची वाक्ये ही उर्मिला कादंबरीतून प्रेरीत होऊन घेतलेली जाणवतात. माझे एकच म्हणणे असते, उर्मिलेचा जीवनपट नाट्यरूपाने लिहिण्याचा घातलेला घाट, हा स्वतंत्र अभिव्यक्तीचा अभ्यास असावा. अन्यथा तो “आधारीत”, “संकलित”, “प्रेरीत” किंवा “अनुवादीत” कॅटेगरीत मोडतो व लेखकाची क्रिएटीव्हिटी हिरावून नेतो. उर्मिलायनमुळे सुनील हरीश्चंद्र रामायणाकार होता होता राहून गेलाय याचे शल्य त्याला नसेल मात्र नाट्यइतिहासातल्या नोंदीला नक्कीच असेल…!