Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीKashedi Ghat : कशेडी घाट पर्यायी भुयारी मार्गाच्या उद्घाटनाला ब्रेक!

Kashedi Ghat : कशेडी घाट पर्यायी भुयारी मार्गाच्या उद्घाटनाला ब्रेक!

कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्णच

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गापैकी दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी होण्याच्या चर्चांना आता ब्रेक लागला असून कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्ण आहे, म्हणजेच पिलर्स आणि गर्डर्स एकसंध मिळून येण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी आवश्यक असल्याने या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू होण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त टळला आहे.

केंद्र सरकारकडून शौर्य, सेवा पदकांसाठी ९४२ नावांची घोषणा; महाराष्ट्र पोलीस दलाला ४८ राष्ट्रपती पदके जाहीर

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ व सध्याचा रा.मा.क्र.६६ वरील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी दोन भुयारी मार्गांचे काम सुरू बूमर या यंत्राद्वारे सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. १२ सप्टेंबर २०२३ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भुयारी मार्गाचा शुभारंभ दुहेरी रस्ता स्वरूपात करण्यात आला. पहिला भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतरही आतील काम सवडीनुसार सुरू ठेवण्यात आले असून अलिकडेच पहिल्या भुयारी मार्गातील काम पूर्णत्वास गेले असल्याने या मार्गातून दुहेरी वाहतूक सुरू झाली. या भुयारी मार्गात वाहतुकीचा खोळंबा व वाहनांचा समोरासमोर आल्याने अपघातदेखील झाले आहेत. मात्र, साधारणपणे ४५ मिनीटांचा कशेडी घाटातून वाहतूकीसाठी लागणारा वेळ आता अवघ्या ८-१० मिनिटांवर आला असल्याने तसेच कशेडी घाटातील अपघाताचे प्रमाणही घटले असल्याने वाहनचालकांना भुयारी मार्गातील वाहतुकीस प्रथम पसंती दर्शविली आहे. मध्यंतरी, कातळी भोगावपर्यंतच्या रस्त्यावरील पुलांवर गर्डर बसविण्याच्या कामानिमित्त भुयारी मार्गातून वाहतूक बंद करण्यात येऊन कशेडी घाटातील वाहतूक सुरू करण्यात आली होती.

वाहनांची एकेरी वाहतूक सुरू

आता पुलावर गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी दुसऱ्या भुयारी मार्गातील वाहतुकीचा शुभारंभ करण्याच्या चर्चा सुरू झाल्या. यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी भेट दिली असता आतील भागातील भुयाराच्या दुतर्फा संरक्षक कठडे बांधण्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे, विद्युत प्रकाश झोताचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून दोन्ही भुयारांना जोडणारे चार भुयारी मार्ग अपूर्णावस्थेत आहेत, व्हेंटीलेशनसाठी तसेच भुयारामध्ये हवा खेळती राहण्यासाठी १० मोठया आकाराचे एक्झॉस्ट फॅन बसविण्यासाठी आणून भुयारामध्येच ठेवण्यात आले आहेत, दुसऱ्या भुयारी मार्गातही वरील बाजूच्या कातळामधून चारपाच ठिकाणी पाण्याची संततधार सुरू आहे. मात्र, भुयारी मार्गातील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास उपयुक्त असल्याचे दिसून आले. हा भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतर या भुयारी मार्गातून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होऊन पहिल्या भुयारी मार्गातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -