सरत्या आठवड्यामध्ये अर्थनगरीत अनेक दखलपात्र घडामोडी अनुभवायला मिळाल्या असल्या तरी काही महत्त्वाची निरीक्षणे लक्षवेधी ठरली. म्हणूनच त्यांचा प्रमुख बातम्या म्हणून उल्लेख करता येतो. यापैकी या वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगारात आठ ते दहा टक्के वाढीची शक्यता असल्याची बातमी दिलासा देऊन गेली. लग्नाच्या हंगामात सोने आणि चांदीची झळाली वाढणे अनेकांसाठी त्रासदायक ठरले. दरम्यान, सामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असलेली तूरडाळ स्वस्त होण्याची शक्यता नोंद घेण्याजोगी वार्ता ठरली.
महेश देशपांडे
नवीन वर्ष भारतीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची भेट घेऊन आले आहे. एका नवीन अहवालानुसार, २०२५ मध्ये देशातील अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामगारांची मोठी वाढ होईल. ‘मर्सर’ या ‘एचआर कन्सल्टिंग फर्मने एकूण मोबदल्याच्या सर्वेक्षणावर आधारित एक अहवाल तयार केला. गेल्या ५ वर्षांमध्ये भारतातील कर्मचाऱ्यांच्या पगारात सातत्याने वाढ झाल्याचे आढळून आले. २०२० मध्ये ८ टक्के असलेली पगारवाढ २०२५ मध्ये ९.४ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अहवालानुसार, सर्व क्षेत्रांमध्ये ९.४ टक्क्यांपर्यंत होऊ घातलेली पगारवाढ देशाच्या मजबूत आर्थिक वाढीचे आणि कुशल प्रतिभेच्या वाढत्या मागणीचे प्रतिबिंब आहे. या यादीमध्ये ऑटोमोटिव्ह क्षेत्राला आघाडीवर ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रात, पगारवाढ ८.८ ते १० टक्क्यांदरम्यान असण्याचा अंदाज आहे. याचे श्रेय देशातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी आणि भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला जाते. उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षेत्र या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनामध्ये ८ ते ९.७ टक्क्यांनी वाढ होऊ शकते, जी उत्पादन परिसंस्थेच्या वाढीचे प्रतिबिंब आहे. सर्वेक्षणामध्ये १,५५० कंपन्यांनी भाग घेतला. ‘मर्सर’च्या या सर्वेक्षणात देशातील विविध क्षेत्रांतील १,५५० हून अधिक कंपन्यांनी भाग घेतला. त्यात तंत्रज्ञान, जीवन विज्ञान, वित्तीय सेवा, ग्राहकोपयोगी वस्तू, उत्पादन आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रांचा समावेश आहे.
अहवालात असेही दिसून आले आहे की, ३७ टक्के संस्था २०२५ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची योजना आखत आहेत, जे देशभरातील प्रतिभेच्या वाढत्या मागणीचे प्रतिबिंब आहे. या कालावधीत, कंपन्यांमधील टाळेबंदीदेखील ११.९ टक्क्यांवर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. ‘मर्सर इंडिया’च्या करिअर लीडर मानसी सिंघल म्हणाल्या की, देशातील प्रतिभा क्षेत्र बदलाच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यातून जात आहे. ७५ टक्के संस्थांमध्ये चांगल्या कामावर आधारित वेतन योजना स्वीकारली जात आहे. यामुळे या स्पर्धात्मक बाजारपेठेत, कंपन्या प्रतिभा आकर्षित करण्याच्या आणि टिकवून ठेवण्याच्या ट्रेंडला प्राधान्य देत आहेत. आता एक दखलपात्र बातमी. सोन्याच्या बाजारपेठेत पुन्हा तेजी येऊ लागली आहे. नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी अशुभ मानल्या जाणाऱ्या खरमासाच्या समाप्तीनंतर, मकर संक्रांतीपासून सुरू झालेला शुभमुहूर्त परत येताच, सोने खरेदीदार आणि गुंतवणूकदारांनी पुन्हा सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे लग्नाचा हंगाम जवळ येत आहे. सोन्याची खरेदी वाढल्याने किमतीही वाढू लागल्या आहेत. सराफा बाजारात सोन्याचा भाव ५०० रुपयांनी वाढून ८१,३०० रुपये प्रतितोळा झाला. तो दोन महिन्यांमधील उच्चांक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव वाढत असून २,७३७.५० डॉलर प्रति औंस दरावर पोहोचले आहे. १२ डिसेंबर २०२४ नंतरची ती सर्वोच्च पातळी आहे. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्यातील गुंतवणूक वाढू शकते. चांदीच्या किमतीही वाढत आहेत. चांदीचा दरही २,३०० रुपयांनी वाढून ९४,००० रुपये प्रति किलो झाला आहे. ‘एलकेपी सिक्युरिटीज’चे उपाध्यक्ष जतीन त्रिवेदी म्हणाले की, अपेक्षेपेक्षा कमी महागाई दरामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळाला आहे. चलनवाढीचा दर कमी झाल्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची दरकपात करत राहील, अशी अपेक्षा बळावली आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोने खरेदी वाढण्याचे कारण म्हणजे १ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सरकार सोन्यावरील आयात शुल्क वाढवू शकते. व्यापार तूट कमी करण्यासाठी २३ जुलै २०२४ रोजी अर्थसंकल्पात १५ टक्क्यांवरून सहा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेले आयात शुल्क वाढवले जाण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात सोने आणि चांदीचा झोका उंच आकाशी पोहोचला. २०२५ च्या बजेटपूर्वीच दोन्ही धातूंचा आलेख उंचावला आहे. सोन्यासोबत या वेळी चांदीने गरूडभरारी घेतली आहे. गेल्या पंधरवड्यात किमती धातूंनी खरेदीदारांची झोप उडवली. अनेकांच्या खिशावर संक्रांत आली, तर या आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातूंनी जोरदार मुसंडी मारली. या आठवड्यात सोन्याने जोरदार मुसंडी मारली. एका आठवड्यात सोने १७३० रुपयांनी महागले. ‘गुड रिटर्न्स’नुसार, आता २२ कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम ७४,६५० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ८१,४२० रुपये आहे. या महिन्यात चांदीने मोठी भरारी घेतली. ‘गुड रिटर्न्स’नुसार, एक किलो चांदीचा भाव ९६ हजार ५०० रुपये इतका आहे.
गेल्या तीन-चार वर्षांमध्ये कडधान्यापासून अन्नधान्यापर्यंत सर्वच घटकांचे दर महागले आहेत. तुरीचे भाव गडगडल्याने आता तूरडाळ स्वस्त होण्याची शक्यता आहे. इतर डाळींच्या किमतीही कमी होण्याची शक्यता आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे दर घसरले आहेत. ते साडेतेरा हजार रुपये प्रति क्विंटल इतके झाले आहेत. त्यामुळे आता तूरडाळीचे दरदेखील कमी होत आहेत. ते सुमारे ४० रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे तूरडाळीचे गगनाला भिडलेले दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत. मोठ्या प्रमाणात उत्पादनाच्या शक्यतेने सांगलीतील ठोक बाजारात तूरडाळीचे दर किलोमागे ४० रुपयांनी उतरले आहेत. तूरडाळीचे दर कमी होऊ लागताच मूग, मसूर आणि हरभरा डाळीचे दरही उतरले आहेत. नवीन हंगामातील तुरीची आवक अद्याप सुरू झालेली नाही. सांगलीच्या बाजारात तूरडाळीचा दर क्विंटलला १३ हजार ५०० रुपये होता. पंधरा दिवसांपूर्वी याच तूरडाळीचा दर क्विंटलला १७ हजार ५०० रुपये होता. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर किलोला १९० रुपयांपर्यंत पोहोचले होते. ते आता १५० रुपयांपर्यंत उतरले आहेत. ऐन दसरा-दिवाळीमध्ये हरभरा डाळीचे दर ११० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. तेही खाली आले आहेत. नवीन हंगामातील हरभरा बाजारात येण्यापूर्वीच हरभरा डाळीचे दर २० रुपयांनी खाली आले आहेत. मसूरडाळीचे दर किलोला ९० रुपयांवर स्थिर असले तरी मूगडाळीचे दर मात्र किलोला १० ते १५ रुपये उतरले आहेत. नवीन हंगामातील तुरीची अद्याप बाजारात आवक झालेली नाही. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या प्रांतात तुरीचे विक्रमी पीक आले आहे. देशांतर्गत तुरीची मागणी ४२ लाख टनांची आहे. यंदा देशांतर्गतच तेवढे उत्पादन होण्याची शक्यता आहे. शिवाय बाहेरील देशांमधून सुमारे १० लाख टन तूर आयातीचे करार झालेले आहेत. यामुळे तुरीचा साठा हा मागणीपेक्षा जास्तीचा होणार आहे.