स्टेटलाइन- डॉ. सुकृत खांडेकर
अमेरिकेबरोबर व्यापारात भारत हा सर्वात मोठा भागीदार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची आता दुसरी इनिंग सुरू झाली आहे. राष्ट्राध्यपदाची शपथ घेतल्यापासून ते सतत धडाकेबाज निर्णय घेत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयाने जगातील अनेक देश हादरले आहेत. त्यांच्या धाडसी निर्णयांमुळे भारतापुढेही नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव मुळातच धाडसी आणि आक्रमक आहे. अमेरिका फर्स्ट हे त्यांच्या कारभाराचे सूत्र आहे. अमेरिका आणि अमेरिकेन नागरिकांचे हित सर्वोच्च असल्याचे त्यांनी जगाला ठणकावून सांगितले आहे. साडेपाच वर्षांपूर्वी दि. २३ सप्टेंबर २०१९ रोजी अमेरिकेतील ह्युस्टन शहरात हाऊडी मोदी नावाचा एक भव्य कार्यक्रम योजला होता. शहरातील एनआरजी स्टेडियमवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकाच मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात मोदींनी ट्रम्प यांच्या नेतृत्व गुणांचे व त्यांच्या कारभाराचे मनसोक्त कौतुक केले. जगातील अब्जावधी लोक ट्रम्प यांच्या शब्दाचे अनुकरण करतात, जागतिक राजकारणात ट्रम्प यांच्या भूमिकेला मोठे महत्त्व आहे, ट्रम्प यांच्यामध्ये नेहमीच आपलेपणाची भावना दिसून येते… याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार ट्रम्प सरकार, अशी घोषणा दिली होती. त्याला हसतमुखाने प्रतिसाद देत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे हात हातात घेऊन, हाऊडी माय फ्रेंड्रस, असे म्हणाले होते… आज आपण नव्या इतिहासाबरोबरच नवे रसायनही पाहत आहोत, माझे विश्वासू मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी धन्यवाद देतो…
एक वर्षानंतर सन २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे त्यांची पत्नी मेलानिया व कन्या इवांका यांना बरोबर घेऊन भारताच्या भेटीवर आले होते. त्यावेळी, फेब्रुवारी २०२० मध्ये मोटेरा स्टेडियम नमस्ते ट्रम्प म्हणून शानदार सजवले होते. या कार्यक्रमात ट्रम्प यांनी २७ मिनिटे तर मोदींनी २१ मिनिटे भाषण केले. मोदींनी आपल्या भाषणात ट्रम्प यांचे नाव २१ वेळा घेतले तर ट्रम्प यांनी मोदींचे नाव १५ वेळा घेतले. अहमदाबादमधील तीन तासांच्या भेटीवर असताना ट्रम्प व मोदींनी तब्बल ७ वेळा एकमेकांची गळाभेट घेतली, तर दोन्ही नेत्यांनी तब्बल ९ वेळा एकमेकांचे हातात हात घेऊन उंचावले होते. हाऊडी मोदी व नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाला आता साडेपाच-सहा वर्षे उलटून गेली. नायगराच्या धबधब्यातून आणि साबरमती नदीतून बरेच पाणी वाहून गेले. दि.२० जानेवारी २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि गेल्याच वर्षी नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून हॅटट्रीक संपादन केली. आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी एकापाठोपाठ असे धडाकेबाज निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. अमेरिकेत आता सुवर्ण युगाला सुरुवात झाली आहे असे त्यांनीच पहिल्या भाषणाची सुरुवात करताना म्हटले.
राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी २० जानेवारीला शपथ घेतली आणि मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घेतलेले ७८ निर्णय एका फटक्यात रद्द केले. ट्रम्प सरकार सर्व कारभार ताब्यात घेईपर्यंत फेडरल (केंद्रीय) पातळीवरील अधिकाऱ्यांनी नवे आदेश काढू नयेत असेही निर्देश दिले. फेडरल पातळीवरील नव्या प्रशासकीय नेमणुकाही त्यांनी एका आदेशाद्वारे गोठवल्या आहेत. अमेरिकेत जन्मल्यावर स्थलांतरीच्या बाळांना आपोआप मिळणारं नागरिकत्व रद्द करण्यापासून ते बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यापर्यंतच्या निर्णयांवर ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्याच दिवशी स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेने पॅरिस करारातून माघार घेतली असल्याचे त्यांनी घेतलेल्या निर्णयातून स्पष्ट झाले. जगभरातून २०० देशांनी एकत्र येऊन हवामान बदल व पृथ्वीचे तापमान नियंत्रित राहावं यासाठी केलेला करार म्हणजे पॅरिस करार. त्यातून अमेरिकेसारखा बलाढ्य देशच बाहेर पडला आहे. सन २०१७ मध्ये ट्रम्प निवडून आल्यावर पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हाही त्यांनी पॅरिस करारातून माघार घेतली होती. सन २०२१ मध्ये जो बायडन राष्ट्राध्यक्ष झाले व त्यांनी पॅरिस करारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा तोच निर्णय ट्रम्प यांनी फिरवला असून पर्यावरणपूरक उद्योगांना चालना, प्रदूषणाला आळा व पायाभूत सुविधांना पुरेसा निधी देण्याचे जाहीर केले आहे. बायडन यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनांवर भर दिला होता. आता मात्र ट्रम्प यांनी देशाच्या सर्वोच्च पदाची नव्याने सूत्रे हाती घेताच राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे. अमेरिकेत ऊर्जा उत्पादन वाढवणे व ऊर्जेबाबत अमेरिकेला स्वावलंबी बनविणे यावर ट्रम्प यांचा भर असणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकेला बाहेर काढण्याचा आणखी एक धाडसी निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत जगातील अनेक देशांना कोविडने वेढले होते. त्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने बजावलेल्या भूमिकेबद्दल ट्रम्प खूप नाराज होते. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर तेव्हा जाहीरपणे टीका केली होती. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आपल्या देशाचे सरकार जगातील दुसरे देश श्रीमंत व्हावेत यासाठी आपल्याच लोकांवर कर लादत होते. आता मात्र आम्ही बदलणार आहोत. अमेरिकेचे लोक श्रीमंत व्हावेत यासाठी आम्ही अन्य देशांवर टेरिफ व टॅक्स लावणार आहोत. अमेरिकन लोक व त्यांच्या परिवारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी आम्हाला पावले उचलावी लागतील… असे झाले तर त्याचा भारतावर निश्चितच परिणाम होऊ शकतो. दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार २०२४ या वर्षात १२० बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचला. अमेरिकेबरोबर व्यापार वाढविण्याचा भारत प्रयत्न करीत असताना अमेरिकेने टेरिफ लावल्यास भारतापुढे काही अडचणी उभ्या राहू शकतात. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत व अन्य देशांतून अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टीलवर २५ टक्के व अल्युमिनियमवर १० टक्के टेरिफ लावले होतेच. ब्रिक्स देशांनी डॉलरला समांतर नवे चलन जारी करण्याच्या प्रस्तावावर ट्रम्प यांनी कठोर शब्दांत सुनावले आहे. भारत, ब्राझील, रशिया, चीन व दक्षिण ऑफ्रिका (ब्रिक्स देश) यांनी अमेरिकन डॉलर ऐवजी दुसऱ्या कोणत्याही चलनाला समर्थ दिले त्यावर १०० टक्के टेरिफ लावले जाईल असे ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वीच सूतोवाच केले आहे.
दि. ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटॉल हिल इमारतीवर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. अगोदर निदर्शने झाली मग हिंसाचार झाला. चार जणांचा मृत्यूही झाला. या प्रकरणात पंधराशेहून अधिक लोकांना पोलिसांनी अटक केली. हे सर्व लोक ट्रम्प समर्थक होते. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांचा झालेला पराभव त्यांना सहन झाला नव्हता. अटकेतील लोकांना ओलिस ठेवले, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी तेव्हा दिली होती. या सर्वांना ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतल्यावर लगेचच माफी दिली. या लोकांनी चुकीचे काहीही केले नव्हते, असे ट्रम्प म्हणाले. बेकायदेशीर स्थलांतरिताच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी ट्रम्प यांनी पहिल्या दिवसापासूनच सुरू केली. त्याचा परिणाम २० हजार भारतीयांची अमेरिकेतून घरवापसी होऊ शकते. या मुद्द्यावर भारताने अमेरिकेला सहकार्य करण्याचे ठरवले आहे. एका अहवालानुसार अमेरिकेत एक कोटीपेक्षा जास्त लोक बेकायदा राहत आहेत.
बेकायदा घुसखोरी हा निवडूक प्रचारात महत्त्वाचा मुद्दाही होता. अमेरिकेत ७.३० लाख भारतीय बेकायदा राहत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आजवर अमेरिकन भूमीवर जन्मलेल्या बाळाला अमेरिकेचे नागरिकत्व आपोआप मिळत होते. यासाठी त्याच्या मातापित्यांपैकी एक जण अमेरिकन नागरिक असावा लागतो किंवा त्यांच्यापैकी एक अमेरिकन सैन्यात असणे आवश्यक होते. सन २०२४ मध्ये अमेरिकेतील भारतीयांची संख्या ५४ लाखांवर पोहोचली आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या भारतीयांची संख्या १.४७ टक्के आहे. यातले ३४ टक्के लोक हे अमेरिकेत जन्मलेले आहेत. ट्रम्प सरकारच्या नव्या धोरणानुसार हंगामी म्हणजे एच १ बी व्हीसा मिळवून अमेरिकेत राहणारे किंवा ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी जे प्रतीक्षेत आहेत, त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळवणे कठीण होणार आहे. जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. अनेकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. अमेरिकेची घसरण आता थांबणार, अमेरिकी जनता खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार, परमेश्वराने मला अमेरिका महान करण्यासाठी वाचवले आहे, ही सर्व स्वत: ट्रम्प यांची मुक्ताफळे आहेत. म्हणूनच पुढील चार वर्षांत ते काय कठोर निर्णय घेतात, हे सर्व चमत्कारिक व अकल्पनीय असेल.
[email protected]
[email protected]