Thursday, August 28, 2025

Toll : १ एप्रिलपासून टोल ५ ते १० रुपयांनी महागणार!

Toll : १ एप्रिलपासून टोल ५ ते १० रुपयांनी महागणार!

देखभाल-दुरुस्तीवरील खर्च वाढल्याचे सांगितले जाते कारण

सोलापूर : सध्या राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणा-या वाहनांसाठी वेगवेगळ्या वर्गवारीनुसार टोल दर (Toll) आकारले जातात. महामार्गांचा विस्तार, वाहनांची वाढती संख्या, आणि देखभाल-दुरुस्तीवरील वाढता खर्च लक्षात घेता, १ एप्रिलपासून टोल टॅक्स ५ ते १० रुपयांनी वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील टोल नाक्यांची स्थिती

सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर-पुणे, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-धाराशिव, सोलापूर-विजयपूर, आणि नागपूर-रत्नागिरी असे मुख्य महामार्ग जातात. या मार्गांवर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सात टोल नाके आहेत. दररोज या मार्गांवरून सुमारे २ ते २.५ लाख वाहने प्रवास करतात.

महामार्गांचे काम सुधारत असले तरी टोल दर दरवर्षी वाढत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे. विशेषतः सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील वडवळ ते चंद्रमौळी आणि अनगर पाटी ते शेटफळ या भागांत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवास करणा-या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ये-जा टोल नियम आणि नवे दर

सध्याच्या नियमांनुसार, २४ तासांत त्याच मार्गावरून परत प्रवास करणा-या वाहनांना ये-जा टोल रकमेचा अर्धा दर भरावा लागतो. यामध्ये कारसाठी (एकेरी प्रवास) ७५ रुपये, टेम्पोसाठी ११५ रुपये, सहा टायर ट्रकसाठी २४५ रुपये, तर १० किंवा त्यापेक्षा जास्त टायरच्या वाहनांसाठी ३९५ रुपये टोल भरावा लागतो.

सध्या हे दर पुढीलप्रमाणे आहेत:

  • कारसाठी: ₹११०
  • टेम्पोसाठी: ₹१७५-१८०
  • सहा टायर ट्रकसाठी: ₹३७०
  • १० किंवा अधिक टायरच्या वाहनांसाठी: ₹५९०

१ एप्रिलपासून या दरात ५ ते १० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, असे समजते.

दरम्यान, महामार्गाच्या देखभालीसाठी टोल वाढीचे कारण दिले जात असले तरी, खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांचा विरोध होत आहे. प्रशासनाने या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

‘डब्ल्यूपीआय’नुसार वाढतो टोल टॅक्स

दरवर्षी टोल टॅक्समध्ये वाढ केली जाते आणि १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होते. यंदा टोल टॅक्स वाढीसाठी नेहमीप्रमाणे व्होलसेल प्राइस इंडेक्सचा (डब्ल्यूपीआय) आधार घेतला जाईल. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारितील (एनएचएआय) सात टोल नाके आहेत. - राकेश जावडे, प्रकल्प संचालक, एनएचएआय, सोलापूर

‘डब्ल्यूपीआय’च्या आधारे वाढतो टोल

केंद्र सरकारच्या वाहतूक विभागाकडून कोणत्या महामार्गांवरुन किती वाहने दररोज ये-जा करतात, त्या महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी किती खर्च करावा लागतो, आणखी काय उपाययोजना अपेक्षित आहेत, अशा विविध बाबींचा विचार करून व्होलसेल प्राइस इंडेक्स निश्चित केला जातो. त्यावरुन कोणत्या महामार्गांवर किती टोल टॅक्स वाढवायचा हे निश्चित होते. त्यानुसार १ एप्रिलपासून नवे दर लागू होतात, असेही अधिका-यांनी यावेळी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील टोल नाके

  • इचगाव (ता. मंगळवेढा)
  • पाटकूल, सावळेश्वर (ता. मोहोळ)
  • वरवडे (ता. माढा)
  • नांदणी (ता. अक्कलकोट)
  • वळसंग (ता. दक्षिण सोलापूर)
  • अनकढाळ (ता. सांगोला)
Comments
Add Comment