केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
अमरावती : उत्तरप्रदेशात प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा सुरू असून या कुंभमेळाव्यासाठी अमरावतीहून प्रयागराजसाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात यावी, अशी मागणी माजी खासदास नवनीत राणा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभमेळावा सुरू झाले आहे. हा मेळावा २६ फेब्रुवारीपर्यंत महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी देशविदेशातून नागरिक येत आहेत. अमरावती आणि लगतच्या जिल्ह्यातील लाखो नागरिक प्रयागराज येथे जाण्यास इच्छूक आहेत. परंतु त्यांना प्रयागराजला जाण्यासाठी सोयीस्कर प्रवासाची सुविधा नाही.
परिणामी नागरिक महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्यापासून वंचित राहत आहेत. प्रवाशांची मागणी लक्षात घेता, त्यांना कुंभमेळाव्यात सहभागी होता यावे, यासाठी अमरावती रेल्वे स्थानकाहून प्रयागराजपर्यंत दररोज कुंभमेळावा विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना ही गाडी सुरू करण्यासाठी आवश्यक आदेश देण्यात यावेत, असे नवनीत राणा यांनी या पत्रात म्हटले आहे.