Saturday, February 8, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमालमत्ता नामांकनाचा नवा घोळ

मालमत्ता नामांकनाचा नवा घोळ

उदय पिंगळे

भांडवल बाजारात व्यवहार करणाऱ्याच्या व्यक्तींनी दावा न केलेल्या मालमत्तांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याची अनेक कारणे आहेत. पूर्वी या मालमत्ता कागदी स्वरूपात होत्या, त्यांचे नामांकन करायची सोय नव्हती. या मालमत्तेवर दावा करण्याची प्रक्रिया क्लिष्ट, कंटाळवाणी आणि खर्चिक असल्याने अनेक किरकोळ बाजारमूल्य असलेले दावे गुंतवणूकदारांचे वारस करत नसत. काही बाबतीत त्यांच्या वारसांना माहिती नाही, काही बाबतीत वारसांना माहिती आहे पण त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने अशी प्रकरणे पडून राहत, काही दावे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने न्यायप्रकियेतील दिरंगाईमुळे वर्षानुवर्षे रेंगाळत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण व्हावे या हेतूने सेबीने मालमत्ता हस्तांतरण सुलभ रीतीने व्हावे या हेतूने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. गेले वर्षभर भांडवल बाजारातील विविध मध्यस्थांशी चर्चा करून मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून ती नवे नियम म्हणून १ मार्च २०२५ पासून लागू होतील.

नव्या नियमावलीची वैशिष्ट्ये –
* सध्या म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना नामनिर्देशीत करून त्यांची टक्केवारी ठरवता येते. आता तीनऐवजी जास्तीत जास्त १० व्यक्तींना नामनिर्देशित करता येईल.
* एकल होल्डिंगसाठी आता नामांकन अनिवार्य असेल.
* संयुक्त होल्डिंगसाठी ऐच्छिक : संयुक्त होल्डिंगमध्ये नामनिर्देशन करणे गरजेचे नाही. एका धारकाचा मृत्यू झाल्यास ती आधी दिलेल्या नामांकनावर परिणाम न करता दुसऱ्या धारकाच्या नावावर वर्ग केली जाईल.
* वाचलेल्या संयुक्त धारकांना आधीचे नामनिर्देशन बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार आहे.
* गंभीर आजारग्रस्त गुंतवणूकदारांसाठी, वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी करून फोलिओ ऑपरेट करण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीला अधिकार मिळू शकतो.
* नामांकनाची पडताळणी करण्यासाठी एकच प्रमाणित पद्धती सुचवली आहे.
* गुंतवणूकदार अथवा नामनिर्देशीत व्यक्तीपैकी एखाद्याचा मृत्यू झाल्यास उर्वरित नामनिर्देशीत व्यक्तींना त्यांचा वाटा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
* नामांकित केलेली व्यक्ती कायदेशीर वारस असेलच असे नाही त्यामुळे त्याच्या ताब्यात येणारी मालमत्तेची सदरहू व्यक्ती विश्वस्त असेल.
* नामांकन नोंद करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धती उपलब्ध केल्या आहेत –
* ऑनलाइन पद्धतीत नामांकन आधार सत्यापित करून, डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून अथवा द्विस्तरीय ओळख पटवून करता येईल. तर
*ऑफलाईन पद्धतीत प्रत्यक्ष फॉर्म भरून, सही करून तो दोन साक्षीदारांकडून सत्यापित करता येईल.
* सध्या नामांकित व्यक्तीच्या नावे मालमत्ता हस्तांतरित करण्यापूर्वी त्यांच्याकडून शपथपत्र आणि हमीपत्र भरून घेतले जाते, यापुढे ते द्यावे लागणार नाही. केवळ गुंतवणूकदाराच्या मृत्यूचा दाखला आणि नामांकित व्यक्तीची ओळख पटवणारा पुरावा (KYC) आवश्यक असेल.
* मालमत्ता हस्तांतर झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे जी भौतिक स्वरूपात अथवा डिजिटल स्वरूपात असतील ती पुढील आठ वर्षे जतन करावी लागतील. नामांकन नोंदी त्यातील बदल अद्ययावत ठेवण्यात येतील.
* विद्यमान धारकांना ऑनलाइन यंत्रणा वापरून नामांकन रद्द करता किंवा सुधारता येईल यासाठी ओटीपी पडताळणी किंवा व्हीडिओ रेकॉर्डिंगचा पर्याय उपलब्ध असेल.
* अस्वस्थ गुंतवणूकदारांसाठी, वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी करून फोलिओ ऑपरेट करण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीला अधिकार देऊ शकते.

एकंदरीत पूर्वीपेक्षा ही पद्धती अधिक गुंतवणूकस्नेही आहे असे सकृतदर्शनी वाटते. यामुळे सकृतदर्शनी गुंतवणूकदारांना त्याचा नक्की उपयोग होऊ शकेल. वरील विवेचनात नामांकन आणि वारसा असे दोन शब्दप्रयोग आले आहेत. आपल्याला हे दोन्ही शब्द सारखेच वाटत असले तरी त्यात भरपूर फरक आहे. कायद्याच्या दृष्टीने नामांकन केलेली व्यक्ती ही त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांची विश्वस्त असते, मालमत्ताधारकाच्या मृत्यूनंतर नामांकन केलेल्या व्यक्तीकडे मालमत्ता सहज हसत्तांतरीत होते. मृत व्यक्तीने मृत्यूपत्र केले असल्यास त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे वाटप करणे हे त्याच्याकडून अपेक्षित आहे. मृत्यूपत्र केले नसल्यास व्यक्तिगत कायद्यानुसार त्याच्या मालमत्तेचे वाटप करावे लागते. नामांकित व्यक्ती ही मृत व्यक्तीची एकमेव वारसदार, काही प्रमाणात वारसदार असू शकते.

वारसांच्या नावाने नामांकन असेल तर मालमत्तेचे हसत्तांतरण करण्याची प्रक्रिया सुलभ होते. गुंतवणूकदारांच्या वारसांना त्यांची हक्काची रक्कम मिळवण्यासाठी फार अडचणी येत नाहीत. दोन्ही गोष्टी सोईच्या किंवा गैरसोयीच्या वाटत असतील. अलीकडील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार वेगवेगळ्या मालमत्तांचे नामांकित व्यक्ती किंवा वारसदार लाभार्थी असू शकतात. शेअर्स म्युच्युअल फंड याच्या बाबतीत सहधारक असल्यास ती व्यक्ती आणि नसल्यास नामांकित व्यक्ती हीच कायदेशीर वारस समजण्यात येते. नामांकन म्हणून तुम्ही जोडीदार, जिथे जोडीदार नसेल तिथे नातेवाईक तेही नसल्यास विश्वासू मित्र यास ठेऊ शकता. अज्ञान व्यक्तीच्या नावे नामांकन केल्यास ती सज्ञान होईपर्यंत त्याचा पालक कोण ते जाहीर करावे लागते. जोपर्यंत काही वाद उपस्थित होत नाही तोपर्यंत प्रक्रियेत सहसा काही अडथळा येत नाही. वाद उपस्थित झाल्यास वारसा प्रमाणपत्र सादर केल्यावरच प्रकरण मार्गी लागेल. हे टाळण्यासाठी जिथे जिथे शक्य तिथे जोडीदारास सहधारक, शक्य नसेल तेथे नॉमिनी म्हणून आणि मृत्यूपत्राद्वारे एकमेव वारस नेमल्यास कायदेशीर वादविवाद निर्माण होण्याची शक्यता कमी वाटते.

प्रत्येक मालमत्ता वेगवेगळ्या असून त्यांचे स्वतःचे असे नियम असल्याने त्याचे धारक एक की अनेक, नॉमिनी किती, लाभार्थी कोण यात असलेले साम्य अथवा वेगळेपणा सर्वांनीच माहिती करून घ्यावी. याशिवाय सध्याचा डिजिटल युगात काही अभिनव मालमत्ता निर्माण होत आहेत, यासंदर्भात सध्या निश्चित असे कायदे नसले तरी या वेगळ्या प्रकारच्या मालमत्तांचे लाभार्थी कोण असतील याबाबत सध्या त्या प्लॅटफॉर्मच्या स्वतःच्या काय तरतुदी आहेत त्याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. सध्या तीन व्यक्ती नामांकित करता येत असताना जास्तीत जास्त १० व्यक्तींमध्ये नामांकन करण्यामागे नेमके आणि खास तथ्य काय असावे ते समजण्यास मार्ग नाही. खरं तर सर्वच वारस लाभार्थीच्या दृष्टीने सेबी, आरबीआय, आयआरडीए, पीएफआरडीए या सर्वच नियामकांनी अधिक घोळ न घालता सर्वच मालमत्तेसाठी एकसमान पद्धतीने सुलभ नामांकन नियमावली ठरवायला हवी.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -