जळगाव : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी खो खो विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवल्याबद्दल भारतीय खो खो संघाच्या पुरुष आणि महिला खेळाडूंशी संवाद साधून त्यांचा सन्मान केला. या संघांनी नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. या कार्यक्रमात राज्यमंत्री खडसे यांनी खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले आणि त्यांच्या समर्पण व चिकाटीची प्रशंसा केली.
खेळाडूंना संबोधित करताना मंत्री खडसे म्हणाल्या, “तुमच्या मेहनतीचे, शिस्तीचे आणि क्रीडाप्रेमाचे हे यश आहे. तुम्ही केवळ विजेतेपद मिळवले नाही तर खो-खो खेळाला जागतिक स्तरावर स्थान मिळवून दिले आहे. सरकार म्हणून स्थानिक क्रीडांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय यशासाठी नवोदित प्रतिभांना घडवण्यासाठी मी सरकार म्हणून कटिबद्ध आहे.”
MoS for Youth Affairs and Sports Raksha Khadse felicitates Indian men’s and women’s Kho Kho teams for their historic victories in the inaugural #KhoKhoWorldCup in New Delhi. pic.twitter.com/gNluJ0Kugw
— All India Radio News (@airnewsalerts) January 24, 2025
या संवादादरम्यान राज्यमंत्री यांनी खो खो खेळाचे प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया (KKFI) यांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले, ज्यांनी या ऐतिहासिक यशासाठी तयारी केली आहे. मंत्री खडसे यांनी यावेळी खो-खो या महाराष्ट्रात उगम पावलेल्या खेळाला पाठिंबा देण्यासाठी आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा विकास व सन्मान सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाच्या वचनबद्धतेवर भर दिला. खेळाडूंनी या स्पर्धेतील अनुभवांचे कथन केले आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
भारतीय संघाच्या खो-खो वर्ल्ड कपमधील विजयाने क्रीडाप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे आणि देशभरातील असंख्य तरुण खेळाडूंना आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रेरणा दिली आहे. हे यश केवळ भारताच्या क्रीडा कौशल्याचा उत्सव नाही, तर पारंपरिक खेळांचे जतन आणि जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित करते.