मुंबई: इंग्लंडला भारताविरुद्ध टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. भाराने त्यांना कोलकातामध्ये ७ विकेटनी हरवले होते. आता मालिकेतील दुसरा सामना चेन्नईत शनिवारी खेळवला जाईल. इंग्लंडने या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. इंग्लंडने गस एटकिन्सनला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याच्या जागी एक ऑलराऊंडर खेळाडूला प्लेईंग ११मध्ये संधी देण्यात आली आहे.
इंग्लंडला पहिल्या टी-२०मध्ये अतिशय लाजिरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले होते. संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना १३२ धावाच केल्या होत्या. यानंतर भारताने हे आव्हान १२.५ षटकांत पूर्ण करत सामना जिंकला होता. इंग्लंडचा गस एटकिन्सन या सामन्यात महागडा ठरला होता. त्याने २ षटकांत ३८ धावा दिल्या होत्या.
इंग्लंडने ऑलराऊंडर खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये दिले स्थान
इंग्लंडने एटकिन्सनच्या जागी ब्रायडन कार्सला संधी दिली आहे. त्याचा आतापर्यंत चांगला रेकॉर्ड राहिला आहे. कार्सने इंग्लंडसाठी ४ टी-२० सामने खेळलेत. यादरम्यान ६ विकेट मिळवलेत. मात्र त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्याने १९ वनडे सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. यात २३विकेट मिळवलेत.