मुंबई : २.५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गॅंगस्टर डी. के. राव आणि त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे.
तक्रारदाराने १ जानेवारी रोजी सहार विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, प्रकरणात डी. के. राव यांचा सहभाग असल्यामुळे केस अँटी-एक्सटॉर्शन सेलकडे वर्ग करण्यात आली.
मुंबई गुन्हे शाखेने कुप्रसिद्ध गॅंगस्टर रवींद्र मल्लेश बोरा उर्फ डी. के. राव (वय ५३) आणि त्याच्या सहा साथीदारांना ७४ वर्षीय अंधेरीतील हॉटेल व्यावसायिकाच्या खंडणी प्रकरणात अटक केली आहे. डी. के. राव, जो मुंबई अंडरवर्ल्डमधील महत्त्वाचा गुन्हेगार आणि छोटा राजनचा जवळचा साथीदार आहे, त्याने तक्रारदाराला मालमत्ता वादासंदर्भात धमकावत ₹२.५ कोटींची खंडणी मागितली होती.
अँटी-एक्सटॉर्शन सेलच्या माहितीनुसार, डी. के. रावने तक्रारदाराला धमकावले होते की, “हॉटेल एम्पायरच्या प्रकरणात मी आहे. जसं सांगतोय, तसं करावं लागेल. सेटलमेंट करा आणि मला ₹२.५ कोटी द्या, नाहीतर तुम्हाला आणि हॉटेल विश्वकर्माचे मालकाला ठार मारीन. गोळी कुठून लागेल, हेही समजणार नाही!” ही धमकी २७ सप्टेंबर २०२४ रोजी हॉटेल सहारा स्टारमध्ये झालेल्या बैठकीत देण्यात आली होती.
प्रकरण अंधेरी पूर्व येथील एका हॉटेल मालमत्तेभोवती फिरते. तक्रारदाराने आरोप केला की, अब्दुल्ला अबू आणि त्याच्या साथीदारांनी त्यांची मालमत्ता बळकावण्यासाठी फसवणूक आणि दडपशाही केली. २०१६ साली अब्दुल्लाने तक्रारदाराच्या मालमत्तेवर हॉटेल बांधकामाचा प्रस्ताव दिला होता. २०१९ मध्ये हॉटेलचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अब्दुल्ला आणि त्याचा मुलगा अबुबकर यांनी तक्रारदारासोबत भाडेकरार केला.
करारानुसार, ₹५० लाख डिपॉझिट आणि दरमहा ₹१ लाख भाडे दिले जाणार होते. मात्र, कोणतेही पैसे न भरता, अब्दुल्ला आणि त्याच्या साथीदारांनी हॉटेल एम्पायरच्या नावाने हॉटेल चालवण्यास सुरुवात केली.
मालमत्ता वाद वाढल्यावर डी. के. रावने अब्दुल्ला आणि त्याच्या साथीदारांना पाठिंबा दिला. ४१ गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या रावने तक्रारदाराला ₹२.५ कोटींची खंडणी देण्याची धमकी दिली.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रावचा सहभाग स्पष्ट झाला. बुधवारी रात्री वांद्रे परिसरात सापळा रचून जवळपास दोन तासांच्या कार चेसनंतर डी. के. रावला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत अबुबकर सिद्दीकी, इम्रान कलीम शेख, रियाज शेख, आसिफ खान उर्फ दरबार, जावेद खान आणि हनीफ नाईक उर्फ अण्णुभाई यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींवर फसवणूक, बनावटगीरी, विश्वासघात, धमकी आणि खंडणी संबंधित विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना ३७व्या मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले असून, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत.