Saturday, February 8, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखआगीच्या अफवेने घेतले रेल्वे प्रवाशांचे बळी

आगीच्या अफवेने घेतले रेल्वे प्रवाशांचे बळी

पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे अनेकांनी धावत्या एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या. त्यात समोरून येणाऱ्या बंगळूरु एक्स्प्रेसच्या चाकाखाली येऊन १५ प्रवाशांचा थरारक मृत्यू झाला. जळगाव रेल्वे स्थानकाच्या परधाडे गावानजीक हा अपघात घडला. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. आग लागल्याची अफवा पसरली आणि भयभीत झालेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून ट्रॅकवर उड्या मारल्या. त्यात समोरून येणारी बंगळूरु एक्स्प्रेस दिसली नाही आणि त्या गाडीने उडवल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यातून १५ प्रवाशांचा नाहक बळी गेला. यात कुणीही खातरजमा करण्याची दक्षता घेतली नाही आणि जो तो आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात जीव गमावून बसला.

ही घटना जितकी हृदयद्रावक आहे तितकीच ती आपल्या लोकांच्या अफवांवर विश्वास ठेवण्याच्या प्रवृत्तीबद्दल प्रकाश टाकून जाणारी आहे. या अपघाताची दृष्ये पिळवटून टाकणारी होती आणि अनेक प्रवाशांचा झोपेतच मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. गिरीश महाजनही घटनास्थळी पोहोचले आहेत आणि मदतकार्यावर देखरेख ठेवत आहेत. पण त्यामुळे गेलेले जीव परत येणार नाहीत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जळगाव रेल्वे दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि हे सारे रीतीप्रमाणे झाले. पण अशा अपघातांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची हमी कुणीही घेत नाही हे दुर्दैव आहे. पुष्पक एक्स्प्रेसच्या घाबरलेल्या प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या आणि त्यांना दुसरीकडून येणाऱ्या बंगळूरु एक्स्प्रेसने धडक दिली असा हा प्रकार आहे. नंतरचे सोपस्कार रेल्वेच्या रीतीप्रमाणे होतील आणि मृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई वगैरे दिली जाईल. पण गेलेले जीव परत येणार नाहीत तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून रेल्वे विभागातर्फे काही ठोस उपाय केले जातील का, याची शंकाच आहे. जेथे हा अपघात घडला तेथपासून जवळच परधाडे रेल्वे स्थानकाच्या नजीकच रेल्वे ट्रॅकचे काम सुरू होते. अचानक गाडीत कुणीतरी आपत्कालीन चेन खेचली आणि गाडी थांबली. रेल्वे ट्रॅकमध्ये ठिणग्या उडाल्या आणि धूर पसरला. यामुळे आगीची अफवा पसरली आणि परिणामी गाडीतील प्रवाशांनी धडाधड बाहेर उड्या मारल्या. पण समोरून येणाऱ्या बंगळूरु एक्स्प्रेस त्यांच्या अंगावरून गेली आणि त्यात १५ प्रवाशांचा नाहक बळी गेला. दरवाजात बसलेल्या प्रवाशांनी आग लागल्याचा आरडाओरडा केला आणि पुष्पक एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी घाबरून जाऊन उड्या मारल्या. पण प्रश्न हा उरतो की, अफवांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याकडे काहीही यंत्रणा नाही आणि अफवांची खातरजमा केल्याशिवाय प्रवाशांनी उड्या टाकण्याचा आततायी निर्णय घेतला.

ही दोन कारणे या अपघातामागे दिसतात. आता चौकशी होणार आहे आणि मृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई जाहीर झाली आहे. पण रेल्वेने एक उपचार म्हणून ही बाब सोडून देता कामा नये. या प्रकारचा हा पहिलाच अपघात नाही. यापूर्वीही असे अपघात घडले आहेत, अगदी आपल्या मुंबईत २०१७ मध्ये घडलेल्या परळ रेल्वे स्थानकात घडलेल्या अपघातात २९ प्रवाशांचा बळी गेला होता. कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात तर कुणाच्या विस्मृतीतून जाणारा नाही. कारण त्यात तीन गाड्या सहभागी होत्या. सांगायचा मुद्दा हा की, अपघात जरी एकामागून एक होत असले तरीही आपले रेल्वे प्रशासन त्यापासून काहीही धडा घेत नाही. लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वे अपघाताबद्दल राजीनामा दिला होता. त्यानंतर असे अपघात घडले नाहीत. आता तसे रेल्वे प्रशासन आणि एकूणच राजकीय व्यवस्था उरली नाही. लोकांचे जीव जातात आणि प्रशासकीय अधिकारी मात्र आपले पगार आणि भत्ते मिळवण्यात व्यस्त असतात असे कित्येकदा पाहिले आहे, हे रेल्वे कारभाराबद्दलच नाही तर कित्येक विभागांच्या कारभाराबद्दल असेच सांगता येईल. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यावरून हा अपघात किती गंभीर स्वरूपाचा आहे हे लक्षात येते. आता या अपघाताबद्दल जबाबदार कोण यावर चर्चा सुरू झाली आहे.

पुष्पक एक्स्प्रेस ही नियामानुसार थांबली नव्हती, तर ती अन्यत्र कुठे तरी थांबली होती. त्यामुळे प्रवासी अन्यत्र ट्रॅकवर गेले. एकूण काय तर रेल्वे अपघात दुर्दैवी आहे. या एकूणच अपघातावरून असे लक्षात येते की, भारताला रेल्वे सुरक्षेसंबंधी अजून खूप काही करायचे आहे. रेल्वे सुरक्षा संदर्भात अनेक पावले उचलावी लागतील. रेल्वे अपघात हा दुर्दैवी तर आहेच. पण तो मानवी चुकीमुळेच घडतो असेही लक्षात आले आहे. यात मानवी चूक कारण आहे. कारण यंत्रणेची काहीही चूक नव्हती. प्रवाशांची उडालेली घबराट आणि इतरांच्या जीवाची पर्वा न करता रेल्वेतून उड्या मारण्यासाठी केलेली घाई ही यासाठी कारण ठरली आहे, असे सकृतदर्शनी दिसते. रेल्वे नुकसानभरपाई देईल, राज्य सरकारही देत आहे. पण यामुळे विरोधकांना कोलित मिळाले आहे. त्यांच्या सुपीक मेंदूतून कोणती कल्पना येईल ते सांगता येत नाही. पण सर्वांकडे दुर्लक्ष करून रेल्वेने भविष्यात असे अपघात घडणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. रेल्वे अपघातामागे कारणे वेगवेगळी दिली गेली आहेत, कुणी म्हणतो की आग लागल्यामुळे प्रवाशांनी उड्या मारल्या, तर कुणी सांगतो की प्रवाशाना धूर दिसत होता. पण परिणाम काय तर १५ प्रवाशांचा नाहक जीव गेला. हे जीव आता कधीही परत येणार नाहीत. असे प्रकार भविष्यात घडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -