जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
आपण आपला वेळ, पैसा, श्रम, मेहनत कित्येक वेळा नको त्या गोष्टीत वाया घालवत असतो. उदाहरणार्थ तथाकथित उपासनेच्या नावाखाली ज्या गोष्टी केल्या जातात व जीवनविद्या जी उपासना सांगते यात जमीन आस्मानाइतके अंतर आहे. मी या आधीही उपासना कशाला म्हणतात ते सांगितले आहे. शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ करावे, हीच उपासना, हीच आराधना, हीच भक्ती. हे करण्याऐवजी आपण केवळ उपास, तीर्थ, यात्रा, यज्ञयाग करत बसलो तर यातून शहाणपण येणार कसे? कुठून येणार? निर्जळ उपास केल्याने प्रकृतीवर परिणाम होणार, ते त्याला व इतरांनाही भोगावे लागणार, मात्र शहाणपण कसे येणार? शहाणपण नाही तर सर्व व्यर्थ असे जीवनविद्या सांगते.
परमेश्वराचे रूप व स्वरूप समजून घेण्यातच खरे शहाणपण आहे. यात निसर्ग नियमांचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच हे निसर्ग नियम परमेश्वराचे अवयव आहेत असे जीवनविद्या सांगते. जसे आपण व आपले अवयव हे वेगळे करता येत नाहीत तसे निसर्गाचे नियम हे परमेश्वरापासून वेगळे करता येत नाहीत. ते एकरूप आहेत. हे निसर्गाचे नियम परमेश्वर मोडत नाहीत. प्रत्यक्षात परमेश्वर काही करतच नाही तर तो ते मोडणार कसे? तो केवळ आहे व त्याच्या असण्यामुळेच सर्व निर्मिती होत आहे. निसर्गाचे नियम हे परमेश्वराच्या अंगी आहेत. “आहेस तू अंगा, अंगी डोळे उघडा” असे एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे. हे अंगी असलेले निसर्गाचे नियम परमेश्वर कधीच मोडत नाही. माणसे नियम करतात व माणसेच नियम मोडतात. सध्या क्रिकेटचे सामने जोरदार चालू आहेत. या खेळाचे नियम कोणी केले? माणसानेच.
खरोखर लेग बिफोर विकेट असून सुद्धा पंच बाद करत नाही, मात्र कित्येकदा लेग बिफोर विकेट नसून सुद्धा पंच बाद असा निर्णय देतात. पूर्वी असे म्हणत देखील असत की, जेव्हा सामने पाकिस्तानात खेळवले जात तेव्हा पाकिस्तानचा संघ १३ लोकांचा असे. ११ खेळाडू व २ पंच. हे आम्ही पाहिले, वाचले आहे म्हणून आम्ही सांगतो. मग त्या संस्था चालवणारे लोक शहाणे झाले आणि दुसऱ्या देशाचे पंच ठेवण्याचा नियम आणला. परमेश्वर मात्र कोणाच्याही बाबतीत स्पेशल केस करत नाही. कारण तो प्रत्यक्षात काही करतच नाही. त्याच्याकडून सगळे होते ही गोष्ट लक्षात घेतली तर मानवी जीवनात निसर्गाचे नियम अत्यंत महत्त्वाचे का आहेत हे उमजते.