Sunday, August 24, 2025

Weather Update : थंडी पळाली, उकाडा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज!

Weather Update : थंडी पळाली, उकाडा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज!

मुंबई : राज्यातील हवामानात (Weather Update) सध्या चढ-उतार होत आहे. राज्यातील विविध भागांमध्ये तापमानात लक्षणीय बदल होत असून, याचा परिणाम विविध जिल्ह्यांवर होताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये दुपारच्या वेळी तापमानात वाढ होत असतानाच दुसरीकडे रात्री आणि पहाटेच्या वेळी मात्र गारठा वाढत असल्याने राज्यातून अद्यापही थंडीने काढता पाय घेतलेला नाही हे दिसून येत आहे.

सातत्यानं सक्रिय असणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा एकदा थंडी काहीशी सक्रिय होताना दिसत आहे. असं असलं तरीही तापमानातील चढ- उतार मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रामध्येही धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. तर, विदर्भात काही अंशी पहाटेच्या वेळी बोचरी थंडी जाणवत असून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात शुक्रवारनंतर (२४ जानेवारी) तापमानवाढीस सुरुवात होणार आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा उष्मा वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर, उपनगर, औरंगाबाद, पुणे इथं किमान तापमान १४ ते १७ अंशांदरम्यान असलं तरीही कमाल तापमानाचा आकडा सरासरी ३४ अंशांदरम्यान असल्याचं म्हटलं जात आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होत असली तरीही पुढील २४ तासांमध्ये त्यात आणखी घट अपेक्षित असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढील २४ तासांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून, किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट अपेक्षित आहे. असं असलं तरीही २४ तासांचं चक्र ओलांडल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदलांचा इशारा देण्यात आला आहे.

पंजाब आणि नजीकच्या भागांमध्ये चक्राकार वारे सक्रिय असल्यामुळे राजस्थानासह मध्य भारतापर्यंत याचे परिणाम दिसून येत आहेत. वायव्य भारतातून १५० नॉट्स इतक्या वेगानं वाऱ्याचे जोरदार झोत वाहत असल्यामुळे राज्यातील तापमानात यामुळं चढ- उतार पाहायला मिळत आहेत.उत्तराखंड, जम्मू काश्मीर, काश्मीरचं खोरं, हिमाचल प्रदेश, येथील पर्वतीय भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट कायम राहणार असून, बर्फवृष्टीमुळं मैदानी भागांमध्ये थंडीचा मारा कायम असेल. (Weather Update)

Comments
Add Comment