श्री गुरुगाथा – अरविन्द दोडे
ना तरी जाणिवेच्या आयणी
करिता दधिकडसणी
मग नवनीत निर्वाणी
दिसे जैसे ॥२.१२९॥
एकदा काशी तीर्थक्षेत्री राहणारा एक पंडित संत कबिरांची कीर्ती ऐकून भलताच भडकला होता. एक सामान्य विणकर अन् लोकांना ज्ञान देतो म्हणजे काय? तो आपल्या घोड्यावर काही शास्त्रग्रंथ लादून निघाला. कबिरांचं घर शोधत शोधत आला. त्यानं पुकारा केला,
“कबीर आहे का?”
कबिरांची मुलगी कमाली बाहेर आली. अनोळखी पंडिताला पाहून तिनं प्रणाम केला. ती नम्रपणे म्हणाली,
“महाराज, बाबा बाजारात गेलेत. या, बसा.”
“मी बसायला नाही, परीक्षा घ्यायला आलोय. हे घर त्याचंच आहे का?”
सुकन्या कमाली कमालच होती! ती उत्तरली,
“नाही! त्यांचं घर तर ब्रह्मा, विष्णू अन् महेशांनाही ठाऊक नाहीये. तुम्ही तर कबीरबाबांना केवळ देह समजत आहात. ते म्हणजे देह नाहीयेत. तुम्ही जाणलंय का कधी? साधुसंतांचं आयुष्य देहरूप नसतं तर शब्दस्वरूप असतं! ते या नश्वर जगात नामाचा उपदेश करण्यासाठी येतात. आपलं भक्तिकार्य पूर्ण करतात आणि परत शब्दब्रह्मात लीन होतात.”
साधुसंत हे गुरुदेव असतात. त्यांच्या घराण्यात ज्ञानाचं भांडार असतं. त्या घरात भक्तिसंस्कार होतात. कमाली अशीच ज्ञानी होती. आपल्या बुद्धीचा अहंकार कुठल्याही विद्वानाला असतो. अमृताचा अनुभव मात्र अजिबात नसतो. परमार्थमार्गावर शास्त्री-पंडित कधी जातात का? कमालीचं गूढ गहन बोलणं ऐकून पंडित नरमला. तिला काय म्हणायचंय कळलं त्याला. त्यानं तिचा निरोप घेतला. भावार्थ समजला. शरमून परत गेला. तिचे आभार मानून ग्रंथांसह गेला.
कबीर संध्याकाळी घरी आले. मुलीनं पंडितप्रसंग सांगितला. तो ऐकून ते मनोमन हसले. मुलीचं ज्ञान बघून सुखावले.
कबीर का घर शिखर पर
जहाँ सिलदली गैल |
पाँव न टिके पपील का
पंडित लादे बैल ॥
कबिरांचं घर तर अनंत ब्रह्मांडांच्या शिखरावर आहे, जिथं जाण्याचा मार्ग अत्यंत निसरडा आहे. इतका की, मुंगीचा इवलासा पायही त्यावर टिकू शकत नाही. पंडित तर ग्रंथ लादलेल्या घोड्यासह तिथं पोहोचू शकत नाही. तरीही तो पोहोचू इच्छितो आहे, कमालच आहे! (काही दोह्यात बैलाचा उल्लेख आहे.)
मित्रहो, भगवंताच्या भक्तिमंदिरात असे साक्षात्कारी संत असतात. ते बोधांची रोपं लावतात. ‘जाणिवेचा आरसा’ दाखवतात. पाठीशी उभे राहतात.
अशीच एक बोधकथा –
फार फार वर्षांपूर्वी गुरुकुलाचे आचार्य एका शिष्याचा सेवाभाव बघून प्रसन्न झाले. शिक्षण पूर्ण झालं. निरोपाची वेळ आली. गुरूनं आशीर्वाद म्हणून त्याला एक आरसा दिला. त्या आरशाचं वैशिष्ट्य असं होतं की, त्यात व्यक्तीच्या मनातील भावना स्पष्टपणे कळत असत. तो आरसा बघून शिष्य फार आनंदित झाला. त्या आरशाचं वैशिष्ट्य गुरूंनी त्याला सांगितलं. बऱ्याच वेळानं त्याला वाटलं, गुरूंच्या मनात कोणता भाव आहे, हे बघावं. त्यानं आरसा गुरुजींकडे फिरवला. तो भलताच चक्रावला! त्याला त्यांचे विकार दिसले. क्रोध, लोभ, मोह… ‘बाप रे! तो स्वत:शीच म्हणाला. घाबरला. नंतर दु:खी झाला. वाटलं होतं, आपले गुरुदेव सर्व विषय-विकारांपासून दूर आहेत… पण तसं नाहीये… तो प्रणाम करून सहशिष्यांचा, आश्रममित्रांचा निरोप घेऊन साश्रुनयनांनी गेला. सोबत तो जादूई आरसा घेऊन गेला. पायी प्रवासात त्यानं झोळीतून आरसा काढून अनेकांची परीक्षा घेतली. एकही लायक माणूस भेटला नाही. घरी आला. मातापित्यांना आरशात पाहिलं. त्यांचेही दुर्गुण त्याला दिसले. भयंकर अवस्थेत काही महिन्यांनी तो परत आश्रमात आला. फुलं-फळं अर्पण करून गुरुदेवांना प्रणाम केला. म्हणाला,
“एकाही माणसाची सद्भावना दिसली नाही, असं का?” गुरुजी म्हणाले, “तू स्वत:ला कधी आरशात पाहिलंस का? नाही ना? पाहा आता!”
त्यानं आरशात पाहिलं तर काय? असंख्य दुर्गुण! तो चरणांशी बसला. गुरुजी म्हणाले,
“हा आरसा मी तुझ्यासाठी दिलाय. तू जगाचे दुर्गुण पाहिलेस. तुझे पाहिले नाहीस. पाहिले असतेस तर तू केव्हाच निर्दोष, सद्गुणी, आत्मज्ञानी झाला असतास!”
गुरुचरणसेवेनं अंत:करण शुद्ध होतं, ते असं!
‘म्हणोनी जाणतेनी गुरू भजिजे | असं माउली सांगतात.
‘देहधारी जो जो त्यासी विहित नित्यकर्म| सदाचार नीतीहूनी आगळा न धर्म ; हेच खरं. गुरुचरण म्हणजे परमेश्वरी शक्तीचं अधिष्ठान!
त्यातूनच कल्याणकारी अदृश्य गंगा वाहात असते. गुरुपूजनानं त्याचं नित्य स्मरण राहतं. त्याला वेळोवेळी वंदन केल्यानं आत्महिताचं बळ साधकास लाभतं. मनाच्या पातळीवर विचार आणि देहाच्या पातळीवर कृती, बुद्धीच्या पातळीवर इच्छा तरंगत राहतात. गुरुचरणांच्या सेवेनं सकल पापशुद्धी होते. भक्त निष्पाप, निर्मळ होतो. निरागस होतो. वासनाक्षय होतो. वृत्ती निरिच्छ होते. मन निरोगी होतं. गुरुचरणांचा आधार मिळाल्यावर ताणतणाव नाश पावतो. सकारात्मक ऊर्जा वाढते. जीवभाव नाहीसा होतो. भक्त खऱ्या अर्थानं नवा जन्म घेतो. याच अनुभूतीला तुकोबाराया म्हणतात, ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा ॥
संत कबीर होते वंचितांचे प्रतिनिधी. त्यांना गुरू हवा होता. स्वामी रामानंद हे त्या काळात श्रेष्ठ गुरू होते. कबीर होते इसवी सन १३९८ मध्ये जन्मलेले. ते जग सोडून गेले १५१४ मध्ये. त्यांनी काय केलं की, पहाटेच्या काळोखात, गंगाघाटावर गेले. रामानंदस्वामी नित्याप्रमाणे स्नानास आले. पायऱ्या उतरू लागले. त्यांचा पाय कुणावर तरी पडला. ‘राम राम राम…; करत ते मागे सरले. कबीर पायरीवर पडले होते. ते उठले. प्रणाम केला. म्हणाले, “गुरुदेव, क्षमा करा. मला तुमच्या पदस्पर्शानं पावन व्हायचं होतं. झालो. गुरुमंत्र हवा होता, तोही मिळालाय…” आणि ते ‘रामराम; करत निघून गेले.
जय गुरुदेव!
पुढील लेखांकात हाच विषय!
([email protected])