नाशिक : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली असली, तरी आगामी मनपा निवडणुकीत मनसेला टाळी दिली जाईल, अशी चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील विधानसभेला झालेला पराभव विसरून कामला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. मुंबईनंतर मनसेसाठी नाशिक महत्त्वाची महापालिका आहे.
मनसेने पहिल्यांदाच राज्यात सत्ता नाशिक मनपात बघितली मात्र त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उतरती कळा लागली आणि अंतर्गत गटबाजीने डोके वर काढले आहे. ते पाहता राज ठाकरे यांचा दौरा पक्षासाठी महत्त्वाचा आहे. पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना सूचनादेखील करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये पक्षाचा वर्धापन दिन व अधिवेशन नाशिकला घेतले होते. परंतु लोकसभा निवडणुका न लढवण्याच्या निर्णयामुळे पक्षात नाराजी पाहायला मिळाली होती.