Sunday, October 26, 2025
Happy Diwali

'मिशन अयोध्या' २४ जानेवारीपासून चित्रपटगृहात !

'मिशन अयोध्या' २४ जानेवारीपासून चित्रपटगृहात !
मुंबई : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण वर्षपूर्तीचे औचित्य साधत, शुक्रवार २४ जानेवारी २०२५ पासून 'मिशन अयोध्या' हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्रातील १०० पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रभू श्रीरामाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे दोन्ही हेतू या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, योगिता कृष्णा शिंदे त्यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.' निर्मित ‘मिशन अयोध्या’ हा केवळ एक मनोरंजनात्मक चित्रपट नसून, रामभक्तांच्या हृदयातील प्रभू श्रीरामांशी जोडणारा आणि त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत नेणारा एक प्रेरणादाई प्रवास आहे. रामराज्याच्या संकल्पनेला नव्या दृष्टीने उलगडणाऱ्या या कलाकृतीतून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो: पुढच्या पिढ्यांना आपण कोणते प्रभू श्रीराम शिकवणार आहोत ? रावणावर विजय मिळवणारे योध्दा राम, की रामराज्याच्या आदर्शाची स्थापना करणारे राजा राम ?
"प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील जन्मभूमीमुळे या मंदिराला जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या राष्ट्रमंदिराने देशभरातील प्रत्येक रामभक्ताला एका धाग्यात जोडले आहे. आपण रामायण ऐकले, पाहिले; मात्र रामराज्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. प्रभू श्रीराम हे कोणत्याही जाती-धर्मापुरते सीमित नाहीत; ते प्रत्येक भारतीयाचे आहेत. म्हणूनच, 'मिशन अयोध्या' हा केवळ एक चित्रपट नाही, तर राष्ट्रमंदिराच्या संरक्षणाची आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव जागवणारी प्रेरणादायी कलाकृती आहे," असे लेखक-दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी सांगितले.
'मिशन अयोध्या' हा चित्रपट पहिल्या चार दिवसात पाहणाऱ्या २५ भाग्यवान प्रेक्षकांना 'शीतल ट्रॅव्हल सोल्युशन्स'द्वारे अयोध्यावारीची संधी मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील हा चित्रपट पाहणारे प्रेक्षक या संधीचा फायदा घेऊ शकतात. पहिल्या ३ दिवसांत चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांनी त्यांचा तिकीटासोबतचा सेल्फी फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करून @rkyoginiproductions ला टॅग करून #MissionAyodhyaContest हा हॅशटॅग वापरायचा आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >