मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ठीक आधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत(Virat Kohli) मोठी बातमी समोर आली आहे. कोहली लवकरच रणजी ट्रॉफी सामन्यात खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे रोहित शर्माही या स्पर्धेत खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रणजी ट्रॉफीसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे.
यातच आणखी एक बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. सूत्रांच्या मते कोहलीने डीडीसीएला सांगितले की तो रेल्वेविरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. दिल्लीचा संघ रेल्वेविरुद्ध ३० जानेवारीपासून सामना खेळणार आहे. कोहली या सामन्यात खेळताना दिसेल.
कोहली रेल्वेविरुद्ध सामना खेळण्यासाठी उतरल्यानंतर त्याचा १३ वर्षांनी पहिला रणजी सामना असेल. कोहली शेवटचा २०१२मध्ये रणजी सामन्यात खेळला होता. त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध गाझियाबाद येथे शेवटचा रणजी सामना खेळला होता. दिल्लीचा संघ रणजीमध्ये आपला पुढील सामना २३-२५ जानेवारीदरम्यान सौराष्ट्रविरुद्ध राजकोटमध्ये खेळणार आहे. कोहली हा सामना खेळणार नाही.
विराट कोहलीचा फॉर्म बिघडला
कोहली रेड बॉल फॉरमॅटमध्ये खराब फॉर्मशी झगडत आहे. त्यामुळे त्याला टीकाकारांचाही सामना करावा लागला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५मध्ये त्याने पर्थमध्ये कसोटी शतक ठोकले. तर ९ डावांमध्ये २३.७५च्या सरासरीने १९० धावा केल्या. तसेच ८ वेळा कॅच आऊट झाला.