Monday, February 10, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखMahakumbh Mela : महाकुंभमेळ्याचेे धार्मिक आणि आर्थिक महत्त्वही अगणित

Mahakumbh Mela : महाकुंभमेळ्याचेे धार्मिक आणि आर्थिक महत्त्वही अगणित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ मेळाव्याचा गौरव केला असून त्यांनी हा मेळावा म्हणजे देशाची एकता, समानता आणि सलोखा यांचा उत्सव असल्याचे म्हटले आहे. मोदी यांच्याकडून महाकुंभ मेळाव्याची स्तुती केली जात असतानाच मेळाव्यात जमलेल्या कोट्यवधी हिंदू जनांना आपलाच गौरव झाल्यासारखे वाटत असल्यास नवल नाही. कारण या पूर्ण महाकुंभ मेळ्यास देशभरातून कोट्यवधी हिंदू जन जमले आहेत. मेळावा प्रयागराज येथे होत आहे. याच मेळाव्याच्या बरोबरीने देशात इतरत्र होत असलेल्या हिंदू मेळाव्यांचे उदाहरण देऊन मोदी यांनी धार्मिक उत्सवांची उदाहरणे दिली आहेत आणि त्यातही एकता आणि समानता यांचा गौरव केला जातो हे सांगितले. महाकुंभ हा गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमस्थळी म्हणजे प्रयागराज येथे होत असून हजारो वर्षांची ही परंपरा आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात महाकुंभ मेळाव्याची प्रशंसा केली असून त्यांनी उत्तरेकडून ते दक्षिणेकडे सर्वत्र आपला धार्मिक विश्वास कसा एकच आहे हे पटवून दिले. आपले सर्व सण, उत्सव हे नद्यांच्या किनारीच साजरे केले जातात हे सांगून मोदी म्हणाले की, हिंदुस्थानच्या दक्षिण आणि उत्तरेतही समान धागा आहे तो या उत्सवांचा. यंदाही या महाकुंभ मेळाव्यास हिंदू बांधवांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे आणि त्यांच्यासाठी प्रयागराज येथे चोख व्यवस्था केली आहे. अर्थात एवढा मोठा उत्सव म्हटले की, एखादी दुर्घटना ही घडतेच. पण यंदा ती दुर्घटना घडली तरीही तिने फार नुकसान झाले नाही. महाकुंभ मेळ्यात आगीची एक दुर्घटना घडली आणि त्यात फारसे नुकसान झाले नाही. गीता प्रेसच्या तंबूला आग लागली आणि ती वेळीच आटोक्यात आणण्यात आली, पण विरोधकांना एवढेही कारण पुरेसे होते आणि त्यांनी लगेच बोंब सुरू केली की, सरकारने अधिक काळजी घ्यायला हवी होती. काँग्रेसने यात अधिकच बोंब मारली आणि उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी काँग्रेसला साथ दिली. झाली ती घटना वाईटच आहे आणि कुणीच तिचे समर्थन करणार नाही. पण हे निमित्त करून काँग्रेसने आणि सपाने भाजपावर म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करणे म्हणजे त्यांच्या ढोंगीपणाची परिसीमा झाली. कारण काँग्रेसच्या काळात हिंदू धर्माला सोडून अन्य धर्माला महत्त्व दिले जात होते. काँग्रेसच्या काळात हज यात्रेला महत्त्व दिले जात होते आणि त्यांच्यासाठी सरकारी पैसा आणि वाहतूक व्यवस्था सज्ज होती. त्या काँग्रेसने कुंभमेळ्यात आग लागली म्हणून भाजपा सरकारवर टीका करणे म्हणजे क्षुद्रपणाचे वर्तन करण्यासारखे आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी जगभरातून भाविक येतात. त्यात गरीब आणि श्रीमंत एक भावनेने येत असतात. याचे कौतुक मोदी यांनी केले. योगी आदित्यनाथ महाकुंभ मेळाव्यातील व्यवस्थेवर जातीने देखरेख करत असून त्यांनी आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला सहाय्य केले. मुख्यमंत्री राज्यकारभारात दक्ष असले की काय होते आणि प्रशासनही त्याच्यापुढे काम करू लागते हे आदित्यनाथ यांनी दाखवून दिले आहे.

महाकुंभ मेळाव्यात प्रशासनात अग्निशामक दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ दले समाविष्ट आहेत आणि त्यांनी त्यांचे काम करताना कालची आग झटकन आटोक्यात आणली. यात समाधानाची बाब ही आहे की, महाकुंभ मेळाव्यात आग लागली असली तरीही नुकसान झालेले नाही. त्यामुळे विरोधकांची एक संधी हुकली आहे. महाकुंभ २०२५ चा मेळावा हा अत्यंत प्रतिष्ठेचा मेळावा असून त्यात लाखो, करोडो भाविक सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या मेळाव्याचेच कव्हरेज केले असून भारतासाठी ही प्रतिष्ठेची बाब आहे. महाकुंभ मेळाव्यामुळे भारताची अर्थव्यवस्थाही सुधारण्यास मदत होणार असून त्यामुळे कित्येक कोटी लोकांना रोजगार मिळणार आहे तसेच कित्येक लोकांचे जीवनमान त्यावर उंचावणार आहे. हा लाभ नजरेआड करून चालणार नाही. महाकुंभ मेळाव्याने आंतरराष्ट्रीय लक्ष खेचून घेतले असून बीबीसी आणि न्यूयॉर्क टाइम्स यांनीही या मेळाव्याचे वार्तांकन केले आहे आणि त्यांचे प्रतिनिधी तेथेच अद्यापही तळ ठोकून आहेत. एकूण महाकुंभ मेळाव्याकडे फक्त धार्मिक मेळावा म्हणून पाहाता येणार नाही, तर भारताला एकसंध ठेवणारा आणि देशातील लोकांत धार्मिक सलोखा आणि राष्ट्रीय एक्याची भावना मजबूत करणारा उत्सव म्हणून त्याकडे पाहिले जाते. या महाकुंभ मेळाव्याने त्याचीच प्रचिती परत एकदा आणून दिली आहे. महाकुंभ मेळावा हा मानवजातीचा सर्वात विशाल मेळावा मानला जातोच. पण तो सर्वाधिक व्यापारी करार करण्यात अग्रेसर आहे असे अनुमान आहे. यंदाच्या महाकुंभ मेळाव्यात चार लाख कोटी रुपयांहून अधिक व्यापार होण्याची शक्यता असून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यातही महाकुंभ मेळाव्याची मोठी भूमिका असेल.

यंदाचा महाकुंभ मेळावा देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक प्रमाणावर चालना देण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याच्या आयोजनातून देशाची जीडीपीत एक टक्के वाढ नोंदवली जाईल असे सांगितले जाते. सरकारी महसुलातही या मेळाव्यामुळे चांगली वाढ होईल आणि महसुलाला नव्या उंचीवर घेऊन जाईल असे बोलले जाते. यंदाच्या मेळाव्यात चार कोटी भक्त आले आहेत आणि भारतासाठी ही एक गौरवास्पद बाब आहे. प्रत्येक व्यक्ती साधारण सरासरी पाच ते दहा हजार रुपये खर्च करत असतो आणि चार ते पाच लाख कोटी रुपये खर्च होतात. महाकुंभ मेळाव्याचे धार्मिक महत्त्व तर आहेच पण आर्थिक महत्त्व ही अगणित आहे. त्या दृष्टीने या महाकुंभ मेळाव्यातून भारताची चांदी तर होणारच आहे पण एकूणच समाज व्यवस्थचीही भरभराट होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -