Friday, February 7, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यRahul Gandhi : राहुल गांधी यांचे नेतृत्व, काँग्रेसचे दुर्दैव...

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचे नेतृत्व, काँग्रेसचे दुर्दैव…

काँग्रेसने १६ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या त्यांच्या मुख्यालयाचे नुकतेच उद्घाटन झाले. ज्या पक्षाला स्वतःचे कार्यालय बांधायला १६ वर्षे लागली त्याने ७० वर्षे देशात विकासाची गती काय ठेवली असेल याची कल्पना येऊ शकते. असो. या मुख्यालयाचे नाव ‘इंदिरा भवन’ दिले गेले आणि एक प्रकारे ज्या स्वातंत्र्य पूर्व काँग्रेसची परंपरा आजची काँग्रेस सांगते त्याचा या काँग्रेसचा काही संबंध नाही याचा कबुलीनामा दिला गेला.

रवींद्र मुळे

७७ मधील निवडणुकीनंतर काँग्रेस फुटली आणि इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे दोन काँग्रेस पक्ष झाले. त्यात मूळ काँग्रेस ही रेड्डी काँग्रेस होती. पुढे रेड्डी काँग्रेस इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन झाली. त्यामुळे आज राहुल आणि सोनिया यांची काँग्रेस ही इंदिरा काँग्रेस आहे, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. हा पक्ष नाही ही ह्यांची खासगी प्रॉपर्टी आहे. तेथे फक्त गुलाम मंडळींना संधी आहे. सरदार वल्लभभाई, राजेंद्र प्रसाद, लालबहाद्दूर शास्त्री, मोरारजी, नरसिंह राव, प्रणव दा यांना या ठिकाणी कुठलेही स्थान नाही. चापलुसी करणारे सवंग लोक हेच आजच्या काँग्रेसचे वास्तव आहे. त्यामुळे या नव्या भवनात स्थान एकमेव मिळाले ते मनमोहन सिंग यांना, तेही एका कोपऱ्यात. दुसऱ्या बाजूने ह्या काँग्रेस नावाच्या खासगी मालमत्तेचा एकमेव विश्वस्त राहुल बाबा ह्याने भारत विरोधी ज्या कुणी शक्ती आहेत त्यांचा अजेंडा चालवायला घेतला आहे आणि त्यामुळे अराजक निर्माण करून बांगलादेशाच्या धर्तीवर सत्तांतर झाल्यावर स्वतःला पंतप्रधान पद मिळवण्याचे आश्वासन त्याने मिळवले आहे. ह्या दिवास्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तो डीप स्टेटचा प्रवक्ता बनला आहे.

ह्या अजेंड्यात क्रमांक एक आहे तो म्हणजे येथील विविध जातीत फूट पाडणे म्हणजेच हिंदूंमध्ये फूट पाडून मुस्लीम, ख्रिश्चन ह्यांचे लागुनचालन करणे. क्रमांक दोन आहे भारताच्या विकासाला विरोध करणे. तिसरे आहे देशविघातक शक्तींना प्रोत्साहन देणे मग त्या खलिस्तान नावाने असतील, नक्षलवाद म्हणून असतील किंवा शहरी माओवादी असतील. चवथे आहे देशातील न्यायालय, पोलीस, सैन्य ह्या सर्वांचे नैतिक खच्चीकरण करणे आणि जनतेत त्यांच्याबद्दल अविश्वास निर्माण करणे. हा अजेंडा चालवत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यासारखे नेतृत्व हे देशातील अराजकतेचे प्रतीक बनले आहे ह्यासारखे दुर्दैव दुसरे नाही. ह्या इंदिरा भवनातील भाषणात त्यांनी जे तारे तोडले आहेत ते एखाद्या माओवादी किंवा हल्ली प्रचलित डीप स्टेटच्या प्रवक्त्याला शोभेल असे आहेत. संघ, भाजपाबरोबर इंडियन स्टेटबरोबर लढाई करण्याची भाषा हा जेव्हा करतो तेव्हा हा पप्पू नाही हे प्रथम लक्षात घ्यावे लागेल. जॉर्ज सोरास आणि माओवादी ह्यांचे योजना पूर्वक प्रशिक्षित हे अत्यंत विषारी वैचारिक अपत्य आहे हे जाणकारांनी लक्षात घेतले पाहिजे.

या तारे तोडण्याचे निमित्त होते पूजनीय मोहनजी भागवत यांचे इंदूर येथील एक वक्तव्य. वास्तविक पूजनीय सरसंघचालक जे बोलले ते एक निर्विवाद सत्य आहे. त्यांच्या बोलण्यात कुठेही स्वातंत्र्य वा स्वातंत्र्यसैनिक यांच्या अपमानाचा मुद्दाच नव्हता. देशाला स्वातंत्र्य मिळाले ते कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाची विरासत नाही. लाखो क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक यांनी रक्त सांडले तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्य मिळाल्यावर सत्तेवर बसलेले प्रमुख आणि प्रशासकीय व्यवस्थेतील काळे इंग्रज हे मानसिक गुलामगिरीचे शिकार होते. त्यामुळे देशाला रक्त, घाम, अश्रू गाळून मिळालेल्या स्वतंत्र देशात अनेक परकीय गुलामगिरीची प्रतीके दिमाखाने उभी होती. त्यातील एक महत्त्वाचे राम मंदिर उद्ध्वस्त करून उभे केलेले बाबरी मशीद होते. त्या ठिकाणी मंदिर होऊन प्रभू रामचंद्र स्थापित होणे हा मानसिक स्वातंत्र्याचा आविष्कार होता हे सत्य प्रतिपादन करण्यात काहीच चूक नाही. किंबहुना पूजनीय सरसंघचालक जे सत्य बोलले, त्यासाठी मोठे नैतिक अधिष्ठान लागते. नि:स्वार्थी होऊन जीवन जगावे लागते आणि मांडणी करताना दुर्दम्य धाडस लागते.

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आणि दर दोन महिन्यांनी परदेशी वाऱ्या करत भोगवादी संस्कृतीत वावरणाऱ्या राहुल गांधींना संघ आणि संघ नेतृत्व समजून घेण्यासाठी अजून काही जन्म घ्यावे लागतील. हिंडेनबर्ग यांचा खोटा अहवाल वापरून अदानी निमित्त करत भारतीय अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणे हा राजद्रोह आहे. पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्यासारखे राष्ट्रभक्त हे या देशाचे भाग्यविधाते आहेत. संघाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक हे संयमी आहेत, संविधानानुसार वागणारे आहेत म्हणून तुम्ही पूजनीय सरसंघचालक यांच्याबद्दल बोलू शकले. पण असेच बोलत राहिलात तर राजकारण सोडून कोर्टाच्या खेट्या घालाव्या लागतील. राहुल गांधींना पूजनीय मोहनजी यांच्या वक्तव्यात राजद्रोह दिसला. सरसंघचालक यांच्या अटकेच्या वल्गना ते करू लागले. आपल्या पणज्याने, आजीने आख्या खानदानाने संघाला, संघ नेतृत्वाला अटक करण्याची खाज भागवून घेतली आहे. संघाला संपवण्याच्या शपथा घेऊन झाल्या आहेत. पण त्याच्या दुर्दैवाने संघ संपला नाही, वाढला आहे, वाढतो आहे आणि आज सर्वत्र संघाच्या विचाराचा प्रभाव दिसत आहे, संघ समाजव्यापी होतो आहे.

जबाबदार विरोधी पक्ष म्हणून की सत्तेसाठी हपापलेला, त्यासाठी विदेशी शक्तींचा हस्तक होऊ घातलेला एक राजकीय गट म्हणून नेमके काँग्रेस नेत्यांना स्वतःचे काय झालेले बघायचे आहे? त्यांनी हे ठरवावे. पण देशाने, देशातील जनतेने पक्का निश्चय केला आहे. आत्मनिर्भर भारताला विश्वगुरुपदावर नेण्याचे येथील तरुण पिढीने ठरवले आहे. आपल्या परकीय गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचे आत्मभान या समाजाला आले आहे. त्यासाठी तो त्याच्या या आकांक्षा पूर्ण करणारे नेतृत्व शोधेल किंवा निर्माण करेल. तूर्त त्याचा हा शोध थांबलेला आहे आणि नरेंद्र मोदी हे समाजाच्या आशा-आकांक्षेचे प्रतीक बनले आहेत. राहुल गांधींना आणि त्याच्या डाव्या सल्लागार मंडळींना हा बोध लवकर झाला तर देशाला एक जबाबदार विरोधी पक्ष आणि नेता मिळेल अन्यथा पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता निवडण्याची क्षमता समाजात आलेली आहे. राहुल गांधींनी परकीय शक्तींचा प्रवक्ता होणे थांबवावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -