मुंबई : मुंबई पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २२ ते २४ जानेवारी दरम्यान मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर तीन दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुलाचे गर्डर उभारण्यासाठी घेण्यात येणार आहे.
मुंबई लेनवर लोणावळा येथे डोंगरगाव – कुसगांव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. हे काम २२ ते २४ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ३ या कालावधीत होणार असून दरम्यान वाहतुकीला पर्यायी मार्गाने जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून देहूरोड मार्गे वळविण्यात येणार आहे.
Nashik Update : पतंग उडवणं ८ वर्षीय चिमुकल्याच्या जीवावर बेतलं!
वाहतुकीसाठी तुम्हाला उपलब्ध असलेले पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे
दुपारी १२ ते ३ दरम्यान होणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसवण्याच्या कामानिमित्त वळवण ते वरसोली टोल नाका येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ४८ येथून देहूरोड मार्गे वाहतूक पुण्याकडे वळवण्यात येणार आहे. दुपारी ३ नंतर ही वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ब्लॉक कालावधीनुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण आल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र 9822498224 किंवा महामार्ग पोलिस विभागाच्या 9833498334 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आले आहे.