ध्रुव थंडगार का असतात?

Share

कथा – प्रा. देवबा पाटील

आनंदराव रोज सकाळी त्यांच्या शेताकडे फिरायला जायचे. तसेच ते आजही त्यांच्या नातवाला स्वरूपला घेऊन तिकडेच फिरण्यास निघाले. शेताचा रस्ता म्हणजे एक छोटासा गाडरस्ताच होता तो. रस्त्याच्या दुतर्फा निंबांची, बाभळींची, बोरींची, कदंबांची, आंब्यांची, पिंपळाची आदी वेगवेगळी, मोठमोठी भरपूर झाडे होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शेतक­ऱ्यांनी त्यांच्या शेतांना बोरी व बाभळीच्या काटेरी फांद्यांचे दाटवाट कुंपण केलेले होते. कुंपणात सुद्धा सागरगोटी, काटेथोरांसारखी कुंपणाला आणखी मजबूत करणारी खूप निरनिराळी काटेरी झाडेझुडपे होती. शेतात हिवाळी पिके मोठ्या आनंदाने व दिमाखाने वाऱ्याबरोबर मस्तपणे डोलत होती. जिकडे तिकडे हिरवळ पसरलेली होती. चालता चालता स्वरूप आजोबांना प्रश्न विचारायचा.

“जगात काही ठिकाणे अति थंड, तर काही ठिकाणे अति उष्ण का असतात आजोबा?”
“तुला मी आताच सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवर सूर्याची किरणं काही ठिकाणी सरळ लंबरूप पडतात, तर काही ठिकाणी ती तिरपे पडतात. लंबरूप किरणांचे अंतर कमी असल्याने ते जास्त उष्णता देतात, तर तिरपे किरणांचे अंतर जास्त असल्याने ते कमी उष्णता देतात. त्यामुळे जेथे लंबरूप किरणं पडतात तो भाग जास्त उष्ण राहतो, तर जेथे तिरपी किरणं पडतात ती ठिकाणे थंड राहतात. तसेच एखाद्या ठिकाणच्या तापमानावर त्या ठिकाणच्या उंचीचाही परिणाम होत असतो. म्हणून उंचावरील ठिकाणे ही दरीतील वा समुद्रसपाटीवरील ठिकाणांपेक्षा उष्ण असतात, आजोबा म्हणाले.

“मग दोन्ही ध्रुव कायमचे थंडगार का असतात?” स्वरूपने पुन्हा पुढचा प्रश्न विचारलाच.
“दोन्हीही म्हणजे उत्तर व दक्षिण ध्रुवांवर सूर्याचे किरण नेहमीच तिरपे पडत असतात. त्यामुळे ही दोन्ही ठिकाणे नेहमीच अत्यंत थंडगार असतात. त्यामुळेच तेथे सतत बर्फ पडत असतो व तो तेथील थंडीत आणखी भर घालतो.”
“मग आजोबा हिवाळ्यात आपली स्टीलची भांडी आपल्या हाताला कशी काय थंड लागतात?”
स्वरूपने विचारलेच.

आनंदराव म्हणाले, “खूप बारीक निरीक्षण आहे स्वरूप तुझे. हिवाळ्यात पडलेल्या थंडीमुळे सा­याच वस्तू थंड झालेल्या असतात; परंतु त्यांच्या तुलनेत आपल्या शरीराचे तापमान मात्र थोडे जास्त असते हे मी तुला आधीच सांगितले आहे. स्टीलची भांडी ही उष्णतावाहक असल्याने आपण ज्या वेळी त्यांना हात लावतो त्यावेळी आपल्या हातातील उष्णता त्या थंड वस्तूकडे वाहल्यामुळे आपला हात वा बोटे थंड पडतात नि ती वस्तू आपणांस थंड वाटते.”

“आजोबा, हिवाळ्याच्या दिवसांत आपणांस थंडी कशी वाजते हो?” स्वरूपने चालता चालता प्रश्न केला.
“थंडी वाजलेली तू कधी ऐकली आहेस का?” आनंदरावांनी स्वरूपला मुद्दामहून विचारले.
“ऐकली नाही आजोबा, पण सगळेच तर थंडी वाजते असेच म्हणतात.” स्वरूप म्हणाला.“नाही ऐकली ना?” आजोबा म्हणाले, “थंडीचे वाजणे हे कोणालाही ऐकू येत नाही, तर ती आपल्या शरीराला भासत असते. थंडी वाजणे किंवा गरम होणे ही एक प्रकारची संवेदना असते. त्वचेमध्ये असलेल्या चेतातंतूंना हवेतील उष्णतेची जाणीव होत असते. शरीराचे तापमान जर हवेच्या तापमानापेक्षा कमी असले, तर थंडी वाजते व जास्त असले तर गरम होते. उष्णतेचे वहन कसे होते हे तुला माहीत आहे का?” आनंदरावानंी पुन्हा स्वरूपकडे बघत प्रश्न केला.

“हो आजोबा?” स्वरूप म्हणाला, “उष्णता ही नेहमी उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थाकडे वाहत असते.”
“बरोबर.” आजोबा म्हणाले, “हिवाळ्याच्या दिवसांत हवेतील गारव्यामुळे आपल्या भोवतीचे तापमान खूपच कमी झालेले असते; परंतु आपल्या शरीरातील तापमान त्यामानाने जास्त असते. जेव्हा सभोवतालचे तापमान हे आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा कमी होते, तेव्हा आपल्या शरीरातील उष्णता ही शरीराकडून बाहेर वातावरणात वाहून जाते. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान कमी होते व आपले शरीरही थंड पडते. त्यामुळेच आपणांस थंडी भासते म्हणजेच वाजते.”
अशा ज्ञान-विज्ञानाच्या गप्पा टप्पा करीत ते दोन्हीही आजेनाते आपल्या घरी पोहोचले.

Tags: polesspace

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

46 minutes ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

1 hour ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

1 hour ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

1 hour ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

2 hours ago