मुंबई या क्रिकेटच्या पंढरीमध्ये ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम आहे. जगप्रसिद्ध वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. वानखेडे यांनी फक्त १३ महिन्यांत नवे स्टेडियम बांधले. या मैदानावर अनेक क्रिकेटपटूंनी देशाचे नाव उज्ज्वल केले. वानखेडे स्टेडियमसारखी आणखी मोठी स्टेडियम बांधणे आवश्यक आहे. तरच युवा आणि प्रतिभावंत खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळेल.
मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. या क्रिकेटच्या पंढरीमध्ये ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम आहे. याच वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झालीत. जगप्रसिद्ध वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) विशेष सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्याची सांगता रविवारी (१९ जानेवारी) होत आहे. भारतात सध्या क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. त्याचे सर्वाधिक श्रेय मुंबईला जाते. मुंबईने पॉली उम्रीगर, विजय मर्चंट, पद्माकर शिवलकर, विजय मांजरेकर, अजित वाडेकर, विक्रमादित्य सुनील गावस्कर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, विक्रमवीर सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा असे अनेक महान क्रिकेटपटू दिले. या आणि अशा हजारो क्रिकेटपटूंमध्ये समान धागा म्हणजे वानखेडे स्टेडियम. याच मैदानावरून कारकिर्दीची सुरुवात करताना मुंबईच्या अनेक क्रिकेटपटूंनी मुंबई संघासह देशाचे नाव उज्ज्वल केले. वानखेडे स्टेडियम १९७४ मध्ये बांधण्यात आले. त्यापूर्वी, मुंबईतील क्रिकेट सामने हे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळवले जायचे. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशन-बीसीए (आताचे मुंबई क्रिकेट असोसिएशन-एमसीए) यांच्यातील वादातून वानखेडे स्टेडियमचा जन्म झाला, हे तुम्हाला ठाऊक आहे का? सीसीआय आणि बीसीएमध्ये बिलकुल सामंजस्य नव्हते. ‘इंग्रज गेले पण आता आम्ही नवे इंग्रज’ असा थाट सीसीएचा होता. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांच्या वेळी सीसीआय आणि बीसीए यांनी स्टेडियममधील जागा कशा वाटून घ्याव्यात, याच्यावर नेहमी वाद व्हायचे. खटके वाढू लागल्यानंतर बीसीएने नवं स्टेडियम बांधायचे ठरवले अन् ते फक्त ब्रेबॉर्न स्टेडियमपासून ५०० मीटर अंतरावर.
१९७२ मध्ये बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. विदर्भामध्ये जन्मलेले वानखेडे हे क्रिकेटप्रेमी होतेच पण बीसीएचे अध्यक्षही होते. त्यांच्याकडे काही तरुण आमदार बेलिफेट मॅचचा प्रस्ताव घेऊन आले. शेषराव वानखेडे यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्याचं ठरवलं. त्यावेळेस सीसीएचे अध्यक्ष होते ख्यातनाम क्रिकेटपटू विजय मर्चंट. वानखेडेंसह आमदारांंचे शिष्टमंडळ मर्चंट यांची भेट घेण्यासाठी गेले. पण मर्चंट यांनी ही मागणी फेटाळून लावली. शब्दाला शब्द लागला आणि वातावरणही गरम झाले. विजय मर्चंट यांचा नकार ऐकून वानखेडे म्हणाले, तुम्ही जर अशीच अरेरावी केली तर आम्हाला बीसीएकरिता दुसरे स्टेडिमय उभारावे लागेल. ते बोलून थांबले नाहीत. आता चर्चगेट आणि मरिन लाईन्स स्टेशनदरम्यान रेल्वे लाईनच्या पश्चिमेला एक भूखंड खेळण्याकरिता राखीव ठेवला होता. जिथे हॉकी मैदान आहे. उरलेल्या भूखंडावर आधीच बीसीएने एक क्लब हाऊस उभारण्यासाठी सुरुवात केली होती. त्याच जागेवर वानखेडे स्टेडियम उभारले. त्यासाठी मराठमोळे आर्किटेक्ट शशी प्रभू यांना पाचारण केले. मुंबईत नवे स्टेडियम बांधण्याच्या विषयावरून वानखेडे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या भेटीला गेले. नवे स्टेडियम बांधण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याचे मुख्यमंत्री नाईक यांनी सांगितले. यावर वानखेडे म्हणाले, तुम्ही फक्त स्टेडियम बांधणीसाठी होकार द्या, बाकी सर्व मी पार पाडतो. वानखेडे यांनी देणग्या मिळवायला सुरुवात केली आणि फक्त १३ महिन्यांत बीसीए सीसीआयच्या नाकावर टिच्चून नवे स्टेडियम बांधले. वानखेडेंनी घेतलेल्या परिश्रमामुळे स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले.
भारताच्या वानखेडे स्टेडियमवरील कामगिरीवरही नजर टाकायला हवी. १९७५ पासून आजवर एकूण २७ कसोटी सामने खेळताना १२ सामन्यात विजय मिळवला आहे. ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ७ कसोटी सामने अनिर्णित राहिले. या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा मान सुनील गावस्कर यांना (११२२) जातो. सर्वाधिक विकेट्स रविचंद्रन अश्विनने घेतल्या आहेत. आतापर्यंत २१ एकदिवसीय (वनडे) सामने खेळताना १२ जिंकले आणि ९ गमावले आहेत. या मैदानावर भारताने पहिला सामना १७ जानेवारी १९८७ मध्ये खेळला. सर्वाधिक वनडे धावा विराट कोहलीच्या (४७४) नावावर आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक विकेट्स मोहम्मद शमीने (१५) घेतल्या आहेत. ५ टी-२० सामने खेळताना तीन सामन्यांत भारताने विजय मिळवला. उर्वरित दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. गेली ५० वर्षे वानखेडे स्टेडियम हे अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले आहे. रवी शास्त्रीचे सहा चेंडूंत सहा षटकार, २०११ वनडे आणि २०२४ टी-२० विश्वचषक विजय, सचिन तेंडुलकरची अखेरची कसोटी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भावुक करणारी निवृत्ती, हे आणि असे अनेक क्षण या वानखेडे स्टेडिमयने अनुभवले आहेत.
वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासह माजी कसोटीपटू विनोद कांबळी, संजय मांजरेकर, वसीम जाफर, राजू कुलकर्णी, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, शोभा पंडित आणि अरुंधती घोष यांच्यासह इतर क्रिकेटमधील दिग्गजांचाही सत्कार करण्यात आला. आणखी एका कार्यक्रमात १९७४ मध्ये वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या-पहिल्या प्रथमश्रेणी सामन्यात खेळलेल्या अजित पै, मिलिंद रेगे, पद्माकर शिवलकर आणि अब्दुल इस्माईल यांना एमसीएतर्फे सन्मानपत्र आणि त्यांच्यासह सर्व हयात असलेल्या खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. एमसीएच्या सत्काराने उपस्थित माजी क्रिकेटपटू भारावले. वानखेडे स्टेडियमवर पुन्हा आल्याने आमच्या आठवणी दाटून आल्या आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे (एमसीए) करण्यात आलेल्या सत्काराने भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, वानखेडेसह मुंबईतील विविध क्रिकेट मैदानांवर कार्यरत सर्व ग्राऊंड स्टाफ, क्युरेटर्स, सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी पॉली उम्रीगर आरोग्य शिबीर आयोजित करताना त्यांचा सन्मानही करण्यात आला. रविवारी (१९ जानेवारी) होणाऱ्या सांगता सोहळा कार्यक्रमात कॉफी टेबल बुकचे अनावरण केले जाणार आहे. तसेच वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पोस्टल स्टॅम्प देखील जारी केला जाणार आहे.
एखाद्या क्रिकेट स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण होणे, ही गौरवशाली बाब आहे. मात्र, वानखेडे स्टेडियमसारखी आणखी मोठी स्टेडियम बांधणे आवश्यक आहे. सध्या मुंबई शहरात तेवढी जागा शिल्लक नसली तरी पूर्व आणि पश्चिम उपनगरे तसेच आजूबाजूच्या शहरांमध्ये अद्ययावत स्टेडियम बांधल्यास युवा आणि प्रतिभावंत खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळेल.