पूर्णिमा शिंदे
सामाजिक गाठीभेटी, भावभावना, नातेसंबंधांवर आधारित मानवी जीवन आहे. परस्परावलंबी परस्परपूरक त्याचं वागणं, चालणं, बोलणं हे सर्व माणसांवर अवलंबून असतं. समाजातील माणसं ही नेहमीच एकमेकांशी नात्याने गुंफली जातात. समाजाला शोभेसे साजेसे असेच माणसाने वागावे. कधीकधी हा माणूस विक्षिप्त विचित्र वागू लागतो. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या छटा वैविध्यपूर्ण गोष्टींतून प्रत्ययास येतात. घडलेल्या घटना व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा प्रवृत्ती आहेत. ही माणसाची मनोभूमी उदात्तता संकुचितता सदोष अशी असते. मानसिक, शारीरिक बदल, चेहरे, भूमिका, पात्र, मुखवटे कसे असतात? या लेखात त्याचा संचय केला आहे. बस स्टॉपला दोन मैत्रिणी आपापसात बोलत असतात. आमचं एकमेकांवर मनापासून प्रेम होतं. पण केवळ घरच्यांचे ऐकून त्याने लग्न केलं. मला खूप वाईट वाटते! आता मी या प्रेमभंगातून बाहेर येऊ शकत नाही. त्याने तर दुसऱ्या मुलीशी लग्न केलं, संसार थाटला आणि मला मात्र मनाने पंगू केलं. येथे भ्रमनिरास, प्रेमभंगाचं दुःख तिच्या पदरी आलं. तिचा जगण्यावरचा, माणसांवरचा आणि प्रेमावरचा विश्वासच उडाला. दोन वकील आपापसात चर्चा करत असतात. माझ्या अशिलाला तर मी फसवलेलं आहे. कारण मी फुटलोय कुठे तिला माहिती आहे? आता ज्यांना न्याय द्यायचा असतो तेही सत्याच्या बाजूने देऊ शकले नाहीत, तर समोरच्या व्यक्तीवर साहजिकच अन्याय आहे आणि हा अन्याय होताना सर्रास दिसत आहे. कारण काय फक्त पैसा! कितीतरी ठिकाणी पैशाने विकली जातात माणसं! काम करत असलेल्या अनेक क्षेत्रालाही बदनाम करून टाकतात. एखाद्या बदफैली पतीला आपल्या निरपराध सुशिक्षित बेरोजगार पत्नीला पोटगीसाठी द्यायला पैसे नसतात. पण बाकीचे उद्योग, अनैतिक संबंध, व्यसनाधिनता, मनमौजी करायला त्याच्याकडे रगड पैसा असतो. आता ही प्रत्येकाची नीतिमत्ता असते, इथेही पदरी दुःखच. मोठ्या विश्वासाने आई-वडिलांच्या पसंतीने केलेल्या विवाहाची वाताहत ती अशी. भरडली जाते ती. भूतकाळात दुखावलेली अपमानित, भावनात गुंतलेली, न्यायाच्या प्रतीक्षेत हतबल ती.
माझ्या मैत्रिणीची मुलगी पैसे भरून डॉ. झाली. असेही शैक्षणिक क्षेत्रात चालतं यावर तुमचा विश्वास बसणार नाही! म्हणून तेथे भरडला जातो सर्वसामान्य गरीब, निर्दोष, गुणवत्तापूर्ण असलेला माणूस. इथे अहंकार, बडीजाव आलाच! कोणाला फसवताय समाजाला पण आणि स्वतःच्या मनाला… विचारा आरशात बघून आपण किती पात्र आहोत? परवा म्हणे भजनी मंडळामध्ये कुसुमताई आल्या नाहीत! त्यांची मुलगी स्नेहा हिला जाळून मारण्यात आलं! तेही हुंड्यासाठी तसे दारू पिऊन मारहाण होत होतीच. आई-वडिलांनी वेळीच लक्ष दिलं नाही आणि शेवटी काय? आपल्या पोटचं लेकरू जेव्हा आपण मोठ्या विश्वासाने दुसऱ्याच्या घरात पाठवतो तेव्हा तो झालेला विश्वासघात, मानहानी आणि जीवितहानी! ही कधीही भरून न येणारं नुकसान आहे. कुसुमताई आता भजनाला येतच नाहीत. पुरत्या खचल्या मनातून. उतरत्या वयात आपल्या पोटच्या लेकरांची अशी वाताहत झालेली कोणाला बरं चालेल? वेळीच मुलीकडे लक्ष दिलं असतं वारंवार ती सांगत असताना देखील तिला आपण परत सासरी पाठवलं या पश्चातापात होरपळत आहेत कुसुमताई.
घटस्फोटित मोहिनीच्या डॉ. मुलीचं लग्न झालं. तिच्याच मित्राच्या वडिलांबरोबर मोहिनीने लग्न केलं. सात-आठ महिने संसार सुखाने चालला. नंतर खरे रंग, खरे रूप बाहेर आलं, तर रमेश अत्यंत कर्जबाजारी होता. केवळ आणि केवळ घटस्फोटित मोहिनीला पैशासाठीच त्यांनी ही लग्नगाठ बांधलेली. हे भांडणात रागात बोलून दाखवलं. शेवटी काय टिकलेच नाही लग्न. मोठ्या चैन सिस्टीम कंपनीची लीडरशिप करण्यामध्ये रमेशला अटक होऊन दोन वर्षे तुरुंगवास झाला. लोकांचे पैसे गोळा करून बुडवल्याबद्दल दीड वर्षांत डॉ. लेकीचा घटस्फोट झाला. मोहिनी पुन्हा एकदा घटस्फोटित झाली. इथे अधीरता उतावळेपणा, अति श्रीमंत होण्याची हाव आणि कोणतेही धरबंधन नाही. नैतिकतेचा अभाव! आयुष्य वेळी सावरता आलं नाही आणि हे दुष्परिणाम भोगावे लागले. अति लोभापाई तेलही गेले अन् तूपही गेले हाती आले धुपाटणे. सासुबाई सुनेला घेऊन डॉक्टरकडे आल्या होत्या. आता मला मुलगाच हवा! पहिल्या दोन मुली आहेत. वंशाला दिवा पाहिजे ना ! जर मुलगी असेल अजिबात चालणार नाही. अवाक् होऊन डॉक्टरांनी म्हटलं ‘‘तुम्ही मुलगी, स्त्रीच आहात तरी पण…’’ “मुलगा-मुलगी एक समान” शेवटी ती तुमच्या मुलाच्या म्हणजे पित्याच्या गुणसूत्रांवर अवलंबून आहेत. यामध्ये सुनेचा दोष नाही. सायन्स आज कुठे पोहोचले आहे. जर तुमच्यासारख्या महिलाच महिलेला मुलगी जन्माला येण्यापासून रोखणार असतील तर काय उपयोग? मागील चार-पाच दशकांमध्ये मुलींच्या जन्मावर बंदी जन्माआधी झाल्याने आता लग्न व्यवस्थेवर परिणाम दिसून येतो. मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचे अल्पप्रमाण म्हणून मुलींच्या जन्माचे स्वागत करा. ती दोन्ही घराचा, कुळाचा उद्धार करते. मुलापेक्षा मुलगी बरी. प्रकाश देते दोन्ही घरी. प्रत्येक महिलेने महिलेचा सन्मान करायला हवा. स्त्री शक्तीला वंदन करायला हवे. पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचीच शत्रू असते. टीका करते, अपमानित करते, छळ करते. हे कुठेतरी आता थांबायला हवं. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, दुर्बल महिलांचा मानसिक, शारीरिक शोषण, छळ थांबवायला हवा. महिलांविषयक ही सामाजिक बांधिलकी जपायला हवी. या समाजात कौटुंबिक स्तरावर भावनिक नाती अशीच असतात. चार माणसं अशी, चार माणसे तशी प्रत्येकाचा स्वभाव, गुण, लक्षणे वेगळीच असतात.