अजित कारखानीस
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पराक्रमी इतिहासात डोकावले तर एक असामान्य महापुरुष म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव डोळ्यांसमोर येते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अहिंसात्मक मार्ग न स्वीकारता सशस्त्र लढा देऊनच देशाला स्वातंत्र्य मिळेल हे जाणून त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि देशाला स्वातंत्र्य देण्यात हातभार लावला. अशा या महानायकाची जयंती २३ जानेवारीला देशभरात सर्वत्र साजरी होत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिसा या राज्यात कटक या गावी झाला होता. जानकीनाथ बोस आणि प्रभावती दत्त हे त्यांचे माता-पिता. त्यांचे वडील हे सुप्रसिद्ध वकील होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे लहाणपणापासूनच एक कट्टर देशभक्त होते. त्यांच्या नसानसांत देशभक्ती भिनली होती. पारतंत्र्याच्या काळात “तुम मुझे खुन दो, मै तुम्हे आझादी दुंगा” हे त्यांनी भारतीयांना केलेले आवाहन खूपच उपयुक्त ठरले. लहानपणी, नेताजी सुभाषचंद्र बोस कटकमध्ये रॅवेन्शॉ कॉलेजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली. वयाच्या १५व्या वर्षी, नेताजी सुभाषचंद्र बोस गुरूच्या शोधात हिमालयात गेले होते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांचे शिष्य बनले. महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती प्रखर झाली. कोलकाता येथे प्रेसिडेन्सी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाष यांनी महाविद्यालयात संप पुकारला होता. इंग्लंडमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये राहून इंग्रज सरकारची नोकरी करण्यास नकार दिला व ते मायदेशी परतले.
आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये सुभाषबाबूंना एकूण ११ वेळा कारावास भोगावा लागला. १९२१ मध्ये त्यांनी ६ महिन्यांचा कारावास भोगला. सुभाषबाबूंचे अनेक क्रांतिकारकांबरोबर मैत्रिपूर्ण संबंध होते आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांना क्रांतिकारकांची मदत होती. त्यामुळे ते क्रांतिकारकांचे स्फुर्तिस्थान आहेत असे ठरवून इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना त्यांच्यावर कोणताही खटला न चालवता अनिश्चित कालखंडासाठी मंडालेच्या कारगृहात बंदिस्त केले. मंडाले कारागृहात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली, त्यांना क्षयरोगाने ग्रासले; परंतु इंग्रज सरकारने त्यांची सुटका करण्यास नकार दिला; परंतु नंतर तुरुंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू होईल असे वाटल्याने त्यांची कारागृहातून सुटका केली. तुरुंगात असतानाच सुभाषबाबूंची कोलकाताचे महापौर म्हणून निवड झाल्याने सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले. वरील प्रकृती अस्वस्थेनंतर त्यांनी युरोपमध्ये जाऊन उपचार घेण्याचे ठरविले. १९३३-१९३६ या काळात युरोपमध्ये त्यांचे वास्तव्य होते. युरोपमधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी स्वत:च्या तब्येतीची काळजी घेत असतानाच देशकार्यही सुरूच ठेवले. या वास्तव्यात त्यांनी इटलीचे नेते मुसोलिनी यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनी यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यास सर्व सहकार्य देण्याचे वचन दिले. याच काळात आयर्लंडचे नेते व्हॅलेरा सुभाषबाबूंचे मित्र बनले आणि त्यांनीही स्वातंत्र्य लढ्यास पाठिंबा दिला.
भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या प्रयत्नांबाबत सुभाषबाबूंचे महात्मा गांधी आणि पं. जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर मतभेद होते. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील अपयशानंतर ब्रिटिशांनी देशभर ब्रिटिश राज घोषित करून सर्व यंत्रणांचा ताबा घेतला होता. स्वातंत्र्यासाठी होणारी सर्व आंदोलने मोडून काढण्यासाठी ठिकठिकाणी गोळीबाराचा वापर केला आणि त्यात असंख्य देशभक्तांना जीव गमवावा लागला. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या प्रयत्नांना यश येणार नाही. स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढाच द्यावा लागेल. हे जाणणारा एकच दृष्टा, देशभक्त, नेता आणि सेनानी, देशभक्त सुभाषचंद्र बोस यांनी ओळखले होते. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आणि ३ मे १९३९ रोजी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि सैन्यातून निवृत्त झालेले सैनिक आणि पोलीस अधिकारी यांना एकत्र करून त्यांनी ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना केली आणि ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून ब्रिटिशांवर दबाव आणण्यासाठी त्यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना पराभूत करणाऱ्या जपान आणि जर्मनी या दोन देशांशी संधान बांधले आणि त्यांचा चळवळीस पाठिंबा मिळवला. त्यांच्या मदतीने स्वराज्याची क्रांतिकारी चळवळ प्रखर केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इतर राष्ट्रांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची आझाद हिंद सेना अखेर ब्रह्मदेशातून आसामच्या सीमेवर उभी ठाकली. त्यानंतर ब्रिटिशांनी भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला आणि स्वतंत्र्य भारतीय प्रजासत्ताक लवकरच अस्तित्वात आले. नेताजींचे स्वातंत्र्य लढ्यातील अतुलनीय योगदान पाहता ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे खरेखुरे महानायक होते असेच म्हणावे लागेल. अशा या महानायकाला कोटी कोटी प्रणाम.