Saturday, February 8, 2025
Homeसाप्ताहिककोलाजसमाजसेवेत रंगलेय तरडे कुटुंब...

समाजसेवेत रंगलेय तरडे कुटुंब…

श्रद्धा बेलसरे खारकर

सिंहगडजवळ झाळनघर नावाचा एक भाग आहे. मी तिथल्या ‘विसावा फाऊंडेशनच्या’ स्वाती तरडेंना मुद्दाम भेटायला गेले. तिथे एक आगळा वृद्धाश्रम चालविला जातो असे मी एकले होते. खरे तर बहुतेक वृद्धाश्रमाची भेट मनाला विषण्ण करणारीच असते. तिथले एकंदर चित्र आणि विशेषत: तेथील सदस्यांच्या चेहऱ्यावरील विषण्णता पाहून मनाला खूप वाईट वाटते. आजारी, अधू, घरच्यांनी टाकलेले लोक सर्वसाधारण वृद्धाश्रमात आयुष्याची संध्याकाळ कशीबशी ढकलत असतात. अशा भेटीनंतर सहसा मनाला एक खिन्नता येते. झालनघर इथे मात्र विलक्षण अनुभव आला. ‘विसावा’मध्ये सध्या २० लोक आहेत. तळ मजल्यावर पुरुष आणि पहिल्या मजल्यावर स्त्रिया. आम्ही आधी वरच्या मजल्यावर गेलो. ही संस्था उभी करणाऱ्या स्वातीताई कामासाठी बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या १६/१७ वर्षांच्या मुलीने आमचे स्वागत केले. थोड्या वेळात गोरीपान हसऱ्या चेहऱ्याच्या आई आणि सतत कामात असणारे स्वातीचे बाबा समोर आले. आईचा चेहरा तर इतका प्रसन्न आहे की, त्या साक्षात अन्नपूर्णा वाटतात. त्या स्वत: सर्व २५ माणसांचा तीन वेळचा स्वयंपाक अतिशय आनंदाने करतात. थोड्या वेळाने स्वातीताई आल्या. उंच, लख्ख गौरवर्णीय, दाट केस कसेबसे बांधलेले, आनंदी आणि शोधक डोळे असलेल्या या मुलीचा साधेपणा उठून दिसतो. साधा सुती पंजाबी ड्रेस घातलेला. चेहऱ्यावर प्रसन्नपणे करारी भाव. बघताक्षणी स्वातीताई मला आवडल्या.

स्वाती तरडे ही मुळात एक परिचारिका. बाहेर कामे करायची. पैशांची गरज असल्याने रात्रपाळी करून वर दिवसपाळीही करायची. पण त्यात काही भागायचं नाही. मग हळूहळू त्या काम करत होत्या. त्या दवाखान्यात तर २४ तास काम सुरू झाले. स्वातीच्या हे लक्षात आले की, इथे आपण एका पेशंटला २४ तास वेळ देतो. त्याऐवजी ४ पेशंट असतील तरीही आपण एकट्या त्यांना संभाळू शकतो. मग या मुलीने थोडी पैशांची जुळवाजुळव केली आणि स्वत:चा वृद्धाश्रम सुरू केला. जवळ पैसा नाही, इमारत नाही, पण काम करण्याची अदम्य इच्छाशक्ती या एकाच भांडवलावर ‘विसावा फाऊंडेशन’ उभे राहिले. आज तिच्याकडे २० लोकं आहेत. पण सगळा मामला धर्मार्थ. काही लोक पैसे देतात पण अनेकांची परिस्थितीच पैसे देण्यासारखी नाही! त्यांना मोफत ठेवावे लागते. स्वातीकडे चांगली काळजी घेतली जाते असे समजल्यावर दुरून दुरून पेशंट येतात. त्यात काही आजारी असतात, काही मनोरुग्ण असतात. सगळ्यात वाईट म्हणजे पेशंट पूर्ण बरा झाल्यावरही त्यांचे नातेवाईक त्यांना घरी नेत नाहीत. इतकेच काय वारंवार विनंती करूनही भेटायला येत नाहीत. इथे असणारे काहीजण वृद्ध आहेतच पण अनेकांना गंभीर आजार आहेत. त्यांचे सगळे अंथरुणात करावे लागते. त्यांना सुश्रूषेबरोबर स्वत:च्या हाताने जेऊखाऊही घालावे लागते. कारण त्यांना जेवताही येत नाही. माझी एका ७५ वर्षांच्या बाईंशी भेट झाली. त्या खूप थकलेल्या होत्या. अंथरुणात जेमतेम उठून बसू शकतात. त्यांच्याजवळ एक जीर्ण झालेली बाहुली आहे. ‘हे काय आहे?’ असे विचारल्यावर त्या सांगतात, ‘हा माझा मोहन आहे. सारखा बाहेर जात-येत असतो. बाहेरचे लोक त्याला सारखे खाली घेऊन जातात. आता तो जेवला आहे. मी नंतर त्याचे जेवण झाल्यावरच जेवते.’ त्यांची कथा हेलावून टाकणारी होती. जेमतेम तिशीत त्यांचा एकुलता एक मुलगा अपघातात गेला. तो धक्का बाई पचवू शकल्या नाहीत. त्या घटनेनंतर त्यांचा मानसिक तोल गेला तो गेलाच! तेव्हापासून त्या आपल्याकडच्या एका बाहुलीलाच मुलगा समजून आयुष्य ढकलत आहेत. इथे एकदा आणून सोडल्यानंतर त्यांच्या घरचे लोक इकडे फिरकलेही नाहीत आणि पैसेही पाठवत नाहीत.

खडकवासल्याच्या एक आजी फार उत्साही आहेत. सरस्वतीबाई त्यांचे नाव. अर्धांगवायूमुळे त्यांचा कमरेखालचा भाग पूर्ण गेला आहे. हातही उचलता येत नाही. पण कुणी आले-गेले की त्या आनंदाने बोलत असतात. पाचवीपर्यंत शिकलेल्या सरस्वती आजींना खूप कविता पाठ आहेत. संत तुकडोजी महाराजांची ‘या झोपडीत माझ्या’ ही कविता त्यांनी सुरेल आवाजात म्हणून दाखवली. त्या लांब लांब उखाणे घेतात. आहे त्या स्थितीत आनंदाने जगण्याची ही दुर्दम्य इच्छाशक्ती, ही ऊर्जा कुठून येत असेल, असा प्रश्न पडतो. एका आजीला इथे आणले त्यावेळी त्या घरी संडासच्या कमोडमध्ये अडकल्या होत्या. कमोड फोडावे लागले होते. आता त्यांच्या पूर्ण जखमा बऱ्या झाल्यात पण घरचे लोक परत घरी न्यायला तयार नाहीत. एका आजोबांची सर्व संपत्ती सुनेने बळकावली, ते शेवटी इथे आले. पण त्यांच्या मनात सुनेची इतकी दहशत बसली आहे की, ती इथेही येऊन आपल्याला इथूनही हाकलेल अशी भीती त्यांना वाटत राहते. अब्बू शेख हे ८५ वर्षांचे गृहस्थ अंध झाले आहेत. त्यांच्या घरचे गायब झाले आहेत. कधीही त्यांना भेटायला तर येत नाहीतच पण संस्थेचा फोनही उचलत नाहीत.

हा आश्रम नव्याने सुरू केला असल्यामुळे स्वातीला सरकार किंवा इतर संस्थाची कुठलीही आर्थिक मदत मिळत नाही. पण एक मात्र आहे की, तिचे सर्व कुटुंब तिच्या या कामात तिच्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत. तिचे पती एका खासगी कंपनीत काम करतात. संध्याकाळी घरी आल्यावर रात्री सर्वांना तेच जेवण भरवतात. जेवणानंतर सगळी भांडी तेच साफ करतात. पत्नी ‘लष्कराच्या भाकऱ्या भाजायला लागली’ तर घरचे लोक किती नाराज होतात हे आपण नेहमीच बघत असतो. पण स्वातीचे पती मात्र कुठलाही संकोच न ठेवता मनापासून मदत करतात याचे फार कौतुक वाटले. स्वातीच्या आई इथे पूर्णपणे सामावून गेल्या आहेत. इतक्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक त्या आनंदाने करतात. सत्तरीच्या घरात पोहोचलेले वडील कायम अलर्ट मोडवर असतात. त्यांना यापूर्वी लकवा झाला होता. स्वातीने खूप सेवा आणि विविध उपचार करून त्यांना बरे केले आहे. चालताना थोडा त्रास होतो. स्वातीची मुलगीही सेवेत आहेच. इतकेच काय तर तिची सख्खी बहीण दररोज आपले घरचे काम आटपून ११ वाजता संस्थेत हजर होते आणि पडेल ते काम करते. असे सर्व कुटुंबाने एकोप्याने समाजसेवा करणे हे फार दुर्मीळ उदाहरण आहे. ‘इथे आलेल्या सर्व लोकांना मी पूर्ण स्वातंत्र्य देते. त्यांना हवे ते काम करण्याची मुभा आहे. अौषधोपचाराबरोबर त्यांचे मानसिक आरोग्य सांभाळावे लागते. पण आम्ही सगळे एक कुटुंब म्हणून राहतो. इथे सर्वांसाठी एकच जेवण बनते.’ असे स्वाती मोठ्या अभिमानाने सांगते. मला सर्वांत भावलेली गोष्ट म्हणजे सगळेजण खूप आनंदात दिसत होते. इतक्या सगळ्या शारीरिक व्यथा सहन करूनही ते आनंदात होते याचे फार अप्रूप वाटले. संस्थेचा व्याप वाढतोय, काम वाढतेय मग काही कर्मचारी का ठेवत नाहीत, असे विचारले असता त्या म्हणाल्या, ‘अहो, आताच कसेबसे चालवत आहोत. पैशाअभावी नोकर ठेवणे शक्यच नाही. आम्ही घरचेच सगळे मिळून सेवा देतो.’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -