ॲड. रिया करंजकर
स्त्री ही सर्व शक्तीनिशी बनलेली अशी निसर्गाची एक वेगळी किमयाच आहे. मुलगी, बहीण, बायको, वहिनी, काकी, आई अशा सगळ्या भूमिका ती उत्तमरीत्या बजावते. जेव्हा एखाद्या स्त्रीचा पती हे जग सोडून जातो तेव्हा ती स्त्री आपल्या पतीच्या मागे आपल्या मुलाबाळांचा सांभाळ एकट्याच्या हिमतीवर करते. एवढेच नाही तर मुलांना चांगल्या मार्गालाही लावते. काही स्त्रिया अपवाद असतात, ज्या पुनर्विवाह करून पुन्हा आपले आयुष्य नव्याने सुरुवात करतात. पण पुरुष मात्र आपल्या पत्नीने साथ सोडली, तर लगेचच दुसरा विवाह करून मोकळे होतात. कारण पुरुषांना घर आणि नोकरी सांभाळणं हे त्यांच्या स्वभावातच नसतं. श्रीधर याला दोन मोठी मुलं असताना त्याच्या पत्नीचे निधन झालं. दोन मुलांचा सांभाळ करून कामधंदा कसा करायचा म्हणून पत्नी गेल्यानंतर काहीच महिन्यांमध्ये श्रीधर यांनी पुनर्विवाह केला. सविता ही साधारण घरातली मुलगी होती. तिचं हे पहिलचं लग्न होतं. शिक्षण कमी असल्यामुळे तिचं लग्न होत नव्हतं आणि घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तीही या लग्नाला तयार झाली. जेणेकरून तिला दोन वेळेचे व्यवस्थित अन्न आणि राहायला हक्काचे घर मिळेल. वय झालं असल्यामुळे आता मुलं होणं शक्य नव्हतं. नवऱ्याची मुलं आपली मानून त्यांना वाढवयाचे असं तिने ठरवलं होतं. लग्नानंतर सविता श्रीधर बरोबर मुंबईसारख्या शहरात आली. मुलं तोपर्यंत शिक्षण घेत होती. हिने सावत्र आई आहोत हे कधी दाखवलं नाही. आपण त्यांच्याच आई आहोत असं त्यांचं सर्व ती करत होती. मुलेही त्यावेळी तिच्याशी सख्ख्या आईप्रमाणेच वागत होती. जशी मुलं मोठी होत गेली त्या दोन्ही मुलांचं श्रीधरनी लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसांत मुलं वेगळी राहू लागली. श्रीधर आणि सविता हे आता एकटेच राहिले होते. श्रीधर छोटी मोठी कामं करून आपला आणि सविताचा खर्च भागवत होता. मुलं मात्र आपापल्या संसारामध्ये रममाण झाली होती.
सविता श्रीधरशी लग्न करताना श्रीधर हा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने वयस्कर होता कारण त्याचे अगोदरही लग्न झालेलं होतं, त्यामुळे आता श्रीधर थकलेला होता. सविता जरी त्याची दुसरी बायको असली तरी आपल्या पतीमुळे आपल्याला राहायला घर मिळाले, मुलांचे प्रेम मिळालं आणि दोन वेळेला व्यवस्थित जेवण मिळत आहे यामुळे ती मनोभावाने श्रीधरचं सर्व काही करत होती. मुलं मात्र आपल्या संसारात रममाण होती आणि अचानक एक दिवस मोठा मुलगा घरी आला आणि बेडरूममध्ये जाऊन लपला. तो असं का करतोय हे सविता आणि श्रीधरला काहीच कळत नव्हतं आणि काही वेळाने काही माणसं रात्री दीड वाजता तिथे आली आणि त्यांचा दरवाजा वाजवू लागली. तो मुलगा दरवाजा उघडू नका म्हणून सांगत होता. पण रात्र झाल्यामुळे सविताने दरवाजा उघडला आणि चार-पाच माणसं घरात घुसली आणि तुमचा मुलगा कुठे आहे असे विचारू लागली. श्रीधरला काहीच कळेना. त्यांनी घर शोधल्यावर मुलगा बेडरूममध्ये सापडला. त्याला त्या लोकांनी बेदम मारला आणि पैसे कधी देतो असे विचारलं. त्यांनी लवकरच पैसे देतो असं सांगितल्यावर ती माणसं निघून गेली. श्रीधर आणि सविता त्याला आपण पोलिसांकडे तक्रार करूया असे सांगू लागली. पण मुलाची चूक असल्याने तो तयार होईना. ह्या लोकांना त्याने दोन ते तीन करोडला फसवलेलं होतं आणि ती लोकं आता त्याच्या मागे लागलेली होती. श्रीधरने दिलेले घर विकून ते पैसे या लोकांना दिले आहेत. आता माझ्याकडे घर नाही, मी भाड्याच्या घरात राहतो असे मुलाने सांगितले. या लोकांपासून वाचण्यासाठी वडिलांचे राहते घर तो विकायला सांगू लागला आणि एवढेच नाही तर दुसऱ्या भावाला दिलेलं घरही विका आणि मला पैसे द्या असा तगादा त्याने आपल्या वडिलांच्या मागे लावला.
तो दररोज घरी यायचा आणि सकाळ-संध्याकाळ सविता आणि श्रीधर यांच्याशी भांडण करत होता. एका मोठ्या भांडणामध्ये सविताने मुलाला विचारलं की, तू घर विकशील आणि आम्ही कुठे राहायचं? तर त्याने सरळं सांगितलं, मी माझ्या बापाला आश्रमामध्ये ठेवीन. तू सावत्र आई आहेस तुला कुठे जायचे तिकडे जा. माझी आई असती तर आश्रमात ठेवलं असतं. पण मला खर्च झेपणार नाही. त्यामुळे तुझं तू बघ. सविता त्यावेळी भांडणात बोलली की तुझी आई गेली आणि मी सगळं सांभाळलं, तुम्हाला मोठं केलं, तुझ्या वडिलांना सांभाळलं. त्यांने सरळ उत्तर दिलं माझी आई मेली त्याला मी काय करू. माझ्या बापाबरोबर लग्न करायचं नव्हतं. तिने आपल्या नवऱ्याकडे याबद्दल विचारलं की तुम्ही माझ्याशी लग्न केलं, माझ्यासाठी तुम्ही काय केलं? फक्त मुलांसाठी आणि तुमच्यासाठी एक नोकरांणी म्हणून आणलेत का? आज जर हे घर विकलं तर मी कुठे जाणार? तुझं तू बघ माझी मुलं मला बघतील. माझ्या सुना आणि मुलं तुला बघणार नाहीत. तुला तुझा मार्ग मोकळा आहे, असे श्रीधरने यावर उत्तर दिले. घर विकून तुमचा मुलगा तरी तुम्हाला बघणार कुठे आहे तोही तुम्हाला आश्रमामध्ये नेऊन ठेवणार आहे. तुमच्यासोबत मलाही त्याला ठेवायला काय झालं, असे सविताने श्रीधरला विचारले. माझा मुलगा माझाच खर्च करतोय ना तीच मेहरबानी समज, असे श्रीधरने तिला सांगितले.
सविताने आपल्या भावाला आणि बहिणीला या संदर्भात सांगितलं. याबाबत ती लोकं श्रीधरला भेटायला आली त्यावेळेस त्यांनी सरळ सांगितले की, हे जे घर आहे माझ्यानंतर माझ्या मुलांचं होणार आहे. मग आमच्या बहिणीचे काय असे सविताच्या भावाने विचारले. तिला मी एवढे दिवस पोसले, सर्व तिचं बघितलं हेच खूप आहे असं श्रीधरने सरळ उत्तर दिलं. तुमची बहीण तुम्ही घेऊन जा. नवऱ्यानंतर हे घर त्याच्या पत्नीचे व्हायला हवे. ते मुलाचं कसं काय तुम्ही करून देता, असा सवालही सविताच्या भावाने विचारला. माझ्या मुलाच्या अंगावर कर्ज झालेले आहे म्हणून मी घर विकतोय, असे श्रीधरने सांगितले. घर विकत असाल तर थोडी रक्कम सविताच्या नावावर ठेवा असेही सविताच्या घरच्यांनी श्रीधरला समजावले. तेही तो द्यायला तयार नव्हता. माझ्या मुलाचे कर्ज फेडण्यासाठी घर विकतोय हिला जर पैसे दिले तर त्याला कमी पडतील आणि तसेही ही त्यांची सख्खी आई थोडीच आहे, माझी दुसरी बायको आहे. त्यामुळे हिला कुठल्याही गोष्टीचा अधिकार नाही, असेच श्रीधर म्हणत राहिला.
सविताने लग्न करून आल्यानंतर कधीही त्या मुलांची सावत्र आई आहे असे भासू दिले नाही. नवऱ्याला आपण दुसरी पत्नी आहोत याची जाणीव करून दिली नाही. एवढ्या वर्षांनंतर तिला सावत्र हा शब्द ऐकायला मिळाला आणि एवढं करूनही तिचा अधिकार मात्र शून्य या गोष्टीचा तिला धक्का बसला. आज तिचं जर मूल असतं तर तिला वाऱ्यावर सोडलं असतं का? या मुलांसाठी सख्ख्या मुलांचा विचार केला नाही. म्हणून आपल्या नवऱ्याविरुद्ध आणि सावत्र मुलांविरुद्ध तिने पोलिसात तक्रार केली आणि न्यायासाठी न्यायालयात जाण्याची तयारी तिने आपल्या भावंडांच्या साथीने केली. ज्या नवऱ्याला ती म्हातारपणात साथ देत होती तोच नवरा तिला आता साथ देत नव्हता याचं दुःख तिला होत होतं.
(सत्यघटनेवर आधारित)