‘समा है सुहाना सुहाना…’

Share

श्रीनिवास बेलसरे

थोडे निरीक्षण केले तरी लक्षात येते की, पूर्वीच्या सिनेमात किती वेगवेगळ्या प्रसंगावर किती सुंदर गाणी होती. शिवाय संगीत असे असायचे की, गाण्यातल्या आशयाप्रमाणे आपोपाप श्रोत्यांचाही मूड बनून जायचा. नुसते आजूबाजूचे वातावरण प्रसन्न वाटते आहे म्हणून त्या क्षणावर लिहिलेली गाणी आहेत. तशी कधी गाणारे पात्र कुणी तरुण असेल, तर त्याच्या वयातील स्वाभाविक भावना, त्याला उत्साहित करणारे वातावरण यावरून सुचलेलेही गाणे असायचे. कधी एखादी मिलनोत्सुक तरुणी एकटीच आहे पण तिला प्रियकराच्या भेटीच्या नुसत्या ओढीने निर्माण झालेल्या प्रसन्न मुडचे वर्णन करणारे गाणे असे. त्याकाळी हजार गाण्यात ९९९ गाणी अर्थपूर्ण आणि सुंदरच असत. सिनेमा होता १९७० चा बलराज सहानी, निरूप रॉय, राकेश रोशन, नीतू सिंग, ओम प्रकाश यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘घर घर की कहानी.’ कॉलेजची मुले बागेत खेळत असताना चुकून भारती आणि राकेश रोशनची टक्कर होते. दोघेही गोंधळतात. नकळत एकमेकांचा विचार करू लागतात. या पार्श्वभूमीवर एक गाणे सुरू होते. संगीत होते कल्याणजी आनंदजी यांचे. किशोरदांच्या आवाजातल्या हसरत जयपुरी यांच्या त्या मस्त गाण्याचे शब्द होते –
‘समा है सुहाना सुहाना, नशे में जहां है,
किसी को किसी की खबरही कहाँ है?
हर दिल में देखो, मोहब्बत जवां है.’

नुकताच तारुण्यात प्रवेश केलेल्या व्यक्तीची मन:स्थितीच अशी असते की, तिला वाटते जणू आपणच जगाचे केंद्र आहोत, आपल्या मनात जे आहे तेच आसमंतात पसरले आहे. हे सुंदर वातावरण सर्वांनाच बेधुंद करून टाकते आहे. जसे माझ्या मनात प्रथमच कुणाविषयी अनावर आकर्षण, प्रेम निर्माण झाले आहे, मन थाऱ्यावर नाही, कुठे आहोत, कुठे चाललो त्याचेही भान नाही म्हणजे सगळ्यांचेही तसेच सुरू आहे असे निरागसपणे वाटण्याचे ते दिवस! म्हणून शब्द येतात ‘हर दिलमे देखो, मुहब्बत जवां हैं.’ तिच्या प्रेमासाठी आतुर झालेल्या त्या भावी प्रियकराला वाटू लागते तिने आपल्याकडे नुसता कटाक्ष टाकला तरी तिला काहीतरी म्हणायचे आहे. आपल्या उपस्थितीचा तिच्यावर केवढा प्रभाव पडला आहे! तो फक्त दोघांनाच समजू शकतो. मनाची ही दुनिया किती विचित्र असते पाहा की आमचे हृदय मौन आहे आणि नुसत्या डोळ्यांनीच केवढा संवाद सुरू आहे!
‘कह रही है नजर,
नजरसे अफसाने,
हो रहा है असरके जिसको दिल जाने,
देखो ये दिलकी अजब
दास्ताँ है,
नजर बोलती है,
दिल बेजुबां है.
समां है सुहाना सुहाना…’

एकतर्फीच तो ठरवून टाकतो की, आपले बेधुंद मनोमिलन झाले आहे. आता मला तर तिचे वेडच लागले आहे. जिथे माझी प्रिया आहे तिथेच मन रेंगाळते आहे. आमच्यात प्रत्यक्ष संवाद झाला नसला तरी ज्याला प्रेम म्हणतात ते तर आता किती जवळ आहे!
‘हो गया है मिलन,
दिलों का मस्ताना,
हो गया है कोई
किसीका दीवाना,
जहाँ दिलरुबा है,
दिल भी वहाँ है,
जिसे प्यार कहिये, वही दरमियाँ है.
समां है सुहाना सुहाना…’

अशाच मूडमधले एक गाणे लिहिले होते आनंद बक्षीसाहेबांनी. सिनेमा होता १९६५ चा ‘जब जब फुल खिले!’ शशीकपूर, नंदा, कमल कपूर, आगा आणि टूनटून. श्रीमंत सेठ राजा बहादूर खन्नांची एकुलती एक मुलगी रिता सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या नोकराणीला घेऊन कश्मीरला जाते. तिथे ती एक हाऊसबोट भाड्याने घेते. तिची ती बोट चालवणाऱ्या राजाशी मैत्री होते. तो हळूहळू तिच्या प्रेमातच पडतो अशी कथा होती. सिनेमा भारतात गाजलाच पण अल्जीरियामध्ये तो इतका लोकप्रिय झाला होता की अनेक चित्रपटगृहात तो तब्बल दोन वर्षे सतत दाखवला जात होता. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी आणि त्यांना मदत केली होती लक्ष्मी-प्यारेंनी. शशीकपूरला मोहात पाडणाऱ्या लोभस स्लिमट्रिम नंदासाठी ते मुग्धमधुर गाणे गायले होते लतादीदीने. शब्द होते-
‘ये समां, समां है ये प्यार का,
किसी के इंतजार का,
दिल ना चुरा ले कहीं मेरा,
मौसम बहार का.’

नंदा पूर्ण हाऊसबोट एकटीच भाड्याने घेऊन दल लेकमध्ये विहार करते आहे. काश्मीरच्या रंगीबेरंगी वसंत ऋतूचा आस्वाद घेते आहे. ती एकटी आहे, तरुण आहे. तिच्या मनात स्वाभाविकच तारुण्यसुलभ भावना उमलत जातात. तिला वाटते हे क्षण तर कुणाची तरी वाट पाहण्याचे, प्रेमात बुडून जायचे. देवा, या असल्या वातावरणात माझे हृदय कुठे हरवून नको जायला!
माझ्या नकळत माझ्या मनात किती स्वप्ने तरळत आहेत. सतत असे वाटते आहे की, कुणीतरी मला एकटक न्याहळते आहे, बोलावते आहे. ही घडी तर अशा प्रेमिकाशी भेटण्याची, त्याला डोळे भरून पाहण्याचीच आहे ना!
‘बसने लगे आँखों में, कुछ ऐसे सपने,
कोई बुलाये जैसे, नैनों से अपने,
ये समां, समां है दीदारका,
किसीके इंतजार का…’

सगळीकडे पसरलेल्या रंगीबेरंगी वसंत ऋतूतील या वातावरणाची अशी मोहिनी पडली आहे की मी मनातल्या मनात आपल्या प्रियकराला भेटूनही आले आणि देवा शपथ, तेव्हापासून माझी झोपच उडाली!
‘मिल के खयालों में ही, अपने बलमसे,
नींद गंवाई अपनी, मैंने कसम से.
ये समां, समां है खुमार का,
किसीके इंतजारका…’

माझ्या मनातल्या कहाणीत मी माझ्या राजाची राणी आहे. देव करो आणि ही कहाणी खरी न ठरो, पण इथले असे धुंद वातावरण तर सुचवते आहे की हा क्षण तर प्रेमाचा स्वीकार करण्याचा आहे. आसुसून कुणाची तरी वाट पाहण्याचा आहे –
‘मैं तो हूँ सपनोंके
राजाकी रानी,
सच हो न जाये ये
झूठी कहाणी.
ये समां, समां है इकरारका,
किसीके इंतजारका…’

भारतीय माणसाचे भावविश्व, समजावून घेऊन लिहिलेली अशी गाणी एकेक ‘समा बांधणारी’च ठरते. ती ऐकली तर कोणत्याही मन:स्थितीत मूड प्रसन्न होतो असा अनेकांचा, अगदी ५९ वर्षांनंतर आज ती ऐकणाऱ्या तरुणाईचाही, अनुभव आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

4 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

5 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

7 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago