Saturday, February 15, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकाव्यरंग : हृदय मंदिरी

काव्यरंग : हृदय मंदिरी

आतुरलेल्या नजरेस जेव्हा
तुझी नजर भिडते
गहिवरलेल्या मनात तेव्हा
फुलबाग मोहरते
स्वप्नांची ती अधीर चळवळ
क्षणात एकवटते
अन् प्रेमाच्या ऋतूत सख्या
गीत तुझेच सजते… १

तू येताना सोबत येतो
मंद धुंद केवडा
अन् धुंदीची अपार सीमा
तुलाच आळवते
केश कुंतले विखरून पवनी
तुलाच बिलगते
भाव तुझ्या प्रेमळ स्पर्शाचे
मनी गुंजन करते… २

दूर उसळती लाटा अवचित
शांत निळ्या सागरी
तू येण्याची चाहूल किंचित
त्यालाही कळते
रोज असा लपंडाव सख्या
चाले कसा हळवा
पायाखाली वाळू ओली
नकळत सरावते… ३

सांग साजणा या वेडीची
प्रीती तुला कळते
वेड लावून ते स्वप्नांचे भान
कसे हरपते
अशीच राहावी प्रीत साजणा
जन्मोजन्मी वाटते
हीच कामना हृदय मंदिरी
युगानुयुगे जपते… ४

कवयित्री – डॉ. राजश्री बोहरा

पहिलीच भेट झाली…

पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा
माझी न रहिले मी, किमया अशी कुणाची?

डोळे मिटून घेता दिसतेस तू समोर
फुलवून पंख स्वप्न अन्‌ नाचतात मोर
झाली फुले सुगंधी माझ्याही भावनांची

लाजून वाजती या अंगातूनी सतारी
ऐश्वर्य घेउनी हे ये दैव आज दारी
मी लागले बघाया स्वप्नेही मीलनाची

वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
ताऱ्यात वाचतो अन्‌ या प्रीतिची कहाणी
पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

गीत : मंगेश पाडगांवकर
स्वर : अरुण दाते, सुमन कल्याणपूर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -