लता गुठे
कालचीच गोष्ट, मकरसंक्रांतीच्या दिवशी मैत्रिणीने मुलीचे पहिले हळदीकुंकू मोठ्या थाटात ठेवले. मैत्रिणीचे हळदीकुंकवाचे निमंत्रण मिळताच ग्रुपवर चर्चा सुरू झाली, “आज कोणती साडी घालायची?” सर्वांनी शिक्कामोर्तब केलं पैठणी साडीवर. सगळ्या नटून थटून पैठणी साड्या घालून, हळदीकुंकवाला आल्या. हिरवी, पिवळी, जांभळी, काळी, मोरपिशी, राणी आणि नववधूच्या अंगावर काळी पैठणी आणि तिला हिरव्या रंगाचे सोनेरी काठ अन् पदरावर नाचरा मोर आणि त्यावर घातलेले हलव्याचे दागिने. यामुळे ती किती सुंदर दिसत होती म्हणून सांगू? अशा विविध रंगांच्या साड्यांनी सर्वांचे लक्ष आकर्षित केले. सोनेरी पदरावर काहींच्या मोर तर काहींच्या पोपट आणि त्यातही पैठणीचे नव्याने आलेले विविध प्रकार. मग सुरू झाला उखाण्याचा कार्यक्रम. मी उखाणा घेतला… “मला बाई नटण्याची हाऊस भारी, नवऱ्याने आणली पैठणी भरजरी
पैठणीचा रंग हिरवागार, पदरावर मोर अन् सोनेरी किनार त्यावर घातला रत्नहार, रत्नहाराला मोत्याचे झुबे, मोत्याचीच नथ घातली नाकात… या उखाण्यामध्ये सर्व दागिन्यांची मैफल जमली होती. लांबलचक उखाणा घेतांना मैत्रिणी आश्चर्याने बघत होत्या. खास पैठणी नेसून समारंभात हा उखाणा घेताना एक वेगळंच आकर्षण निर्माण होतं.
फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतभर या पैठणीचे वेड प्रत्येक स्त्रीला आहे. पैठणी म्हटलं की आठवते, शांता शेळके यांची ‘आजीची पैठणी’ ही कविता. तशीच माझ्याही आजीची रेशमी राणी रंगाची पैठणी होती. त्या काळातील पैठणी मला आजही आठवते. प्रत्येक गुढीपाडव्याला ती पैठणी गुढीला नेसवली जायची. अशा या पैठणीचा थोडक्यात इतिहास आज मी सांगणार आहे. माझं गाव पैठणच्या जवळच असल्यामुळे मला या पैठणीचे विशेष कौतुक आहे. पैठणी या साडीचे काही वैशिष्ट्ये आहेत. रेशमी धाग्यांनी हातमागावर विणलेल्या पैठणीचा पोत तलम असल्यामुळे ती वजनाला हलकी असते. नंतर यावर नक्षीकाम केले जाते. पूर्वीच्या काळी यासाठी सोनं आणि चांदीच्या तारा वापरल्या जात असत असं म्हटलं जातं. लहानपणी हातमागाच्या कारखान्यामध्ये पैठणी तयार करताना मी पाहिली आहे. ही पैठणी बनवण्यास अत्यंत अवघड असते. पैठणीवरील विणकाम एकदम नाजूक असते. त्यामुळे भारतातच नव्हे तर विदेशातूनही पैठणीला खूप मागणी असते. या पैठणीची किंमत जास्त असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना ती घेणे परवडत नव्हते.
आता येवल्यालाही पैठण्या बनवत आहेत. पूर्वीपेक्षा बऱ्याच वेगळ्या पद्धतीने आणि मशीनवरही आता पैठण्या बनवू लागल्यामुळे पैठणी या प्रकारात बरेच बदल झाले आहेत. खास पैठणी घेण्यासाठी येवल्याला गेले होते तेव्हा तेथील कारखान्यातील कारागिराला पैठणीविषयी माहिती विचारली असता, तो मोठ्या उत्साहाने पैठण्यांची माहिती सांगू लागला, “ही पाहा (मोरबांगडी पैठणी) मोरबांगडी म्हणजे बांगड्यांच्या आकारातील मोर. म्हणून हिला मोर बांगडी असे नाव आहे. यावर एकच नृत्य करणारा मोर डिझाईन केलेला आहे. हा खास नवरीचा शालू आहे आणि याबरोबरच हे डिझायनर ब्लाऊज आणि मुलांच्या अंगावरील हा याच डिझाईनचा शेला यामुळे याचे आकर्षण वेगळे आहे. ही पाहा मुनिया ब्रोकेट नवीन डिझाईन केलेली साडी. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि तो पुढे म्हणाला, मुनिया म्हणजे पोपट. हे पल्लूवरील पोपट नेहमी हिरव्या रंगात असतात. रेशीममधील या पोपटाच्या जोडीला तोता-मैना असेही म्हणतात. त्याचं बोलणं संपायच्या आधी समोर लावलेल्या साडीकडे बोट दाखवत मी म्हणाले, ती साडी पैठणीच आहे ना?…” हो… ती आहे कमळ ब्रोकेड साडी. अनेक प्रांतांमध्ये या साडीचे विशेष आकर्षण असल्यामुळे याच्या ऑर्डर आम्हाला जास्त येतात. सात-आठ रंगांमध्ये ही साडी तुम्हाला पाहायला मिळेल. कमळ हे लक्ष्मीचं आवडतं असल्यामुळे पदरावर सोनेरी रंगांमध्ये आणि त्यामध्ये लाल, हिरवा रंग वापरल्यामुळे ते अधिक आकर्षक दिसत आहे. अशा प्रकारच्या आणखी चार-पाच साड्यांचे त्यांनी खूप छान वर्णन केले आणि शेवटी म्हणाला, तुम्हाला कोणती साडी पाहिजे? खरंतर मला त्यातील प्रत्येकच साडी आवडली होती. त्यामुळे ही घेऊ की, ती. असा मनात संभ्रम निर्माण झाला. दुकानातील मालक पुढे होऊन म्हणाला, “मॅडम तुम्हाला ही कडियाल बॉर्डर साडी छान दिसेल. पारंपरिक पैठणी तर तुमच्याकडे असेलच. ही वेगळी आहे, हीच घ्या. कडियाल म्हणजे इंटरलॉकिंग. रेशमी पट्टे समान रंगाचे असल्यामुळे ती साडी खरंच खूप वेगळी दिसत आहे.” त्याने भराभर चार-पाच रंगांच्या साड्या उलगडून दाखवल्या आणि मी त्यातलीच एक सिलेक्ट केली आणि बाहेर पडता पडता एका साडीवर सहज लक्ष गेले आणि मी आणखी एक काळी चंद्रकला साडी घेतली. लाल किनार असलेली काळी साडी. अनेक गाण्यांमध्ये या साडीचे विशेष कौतुक ऐकायला मिळते.
“काळी चंद्रकला सोनेरी काठ बाजाराच्या वाटं बाई, गोंडा लटपट हे मी कित्येकदा ऐकलेलं गाणं. यामुळे ही साडी हातात घेऊन पाहतच राहावं असं नेहमी वाटतं. पैठणी विणण्यासाठी उच्चप्रतीच्या कापसाचा एक धागा व रेशीम एक धागा यांच्यापासून हातमागावर विणलेली एक विशिष्ट प्रकारची नक्षी असलेली साडी असते. उभा धागा एका रंगाचा आणि आडवा धागा वेगळ्या रंगाचा वापरल्यामुळे पैठणीला ‘धुपछाव’ इफेक्ट दिला जातो. पैठणी साडीवर, सोनेरी बुट्टी असते तर पदरावर कोयरी, आंबा, अश्रफी, बांगडीमधील मोर, अमरवेल, नारळ, पारवा, पोपट अशी नक्षी आढळते. अगदी प्राचीन काळापासून पैठणी साडी जगभर निर्यात केली जाते. आता नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या पैठणीला विशेष मागणी असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पैठणीला जगभरात विशेष मागणी असल्यामुळे पैठणी साडी दिवसेंदिवस जास्त प्रसिद्ध होतं आहे. यामध्ये सहावारी तसेच नऊवारीही साडी उपलब्ध असते. काळ कोणताही असो आजही मुली म्हणतात…
“जरतारीच्या साडीवरती मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा…”
वर्षानुवर्षापासून आईकडे हट्ट धरणारी मुलगी जरतारी पैठणी साडीवरील नाचऱ्या मोराकडे कायमच आकर्षित झालेली आहे आणि आई आपल्या लाडकीचा हट्ट पैठणी साडी नेसवून पुरविते. आता आपण थोडक्यात पैठणीच्या इतिहासाकडे वळूया…
पैठण ही पुरातन काळी महाराष्ट्राची राजधानी होती. शालिवाहन राजापासून विशेष रेशमी वस्त्र महत्त्वाचे होते असे इतिहासात अनेक दाखले मिळतात. त्याही आधीपासून दुसऱ्या शतकापासून राजघराण्यातील स्त्री-पुरुष मलमल रेशीम अशी तलम वस्त्र वापरत असत. पैठणी या महावस्त्राच्या इतिहासाला २००० वर्षांची पंरपरा आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पैठण या ऐतिहासिक नगरीत पैठणी या साडीच्या निर्मितीला सुरुवात झाली म्हणून तिचं नाव पैठणी असं पडलं. शालिवाहन राजाच्या कारकीर्दीपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातून कापड निर्यातीला सुरुवात झाली. गौतमीपुत्र सातकर्णी याने सातवाहन काळात पैठणी निर्मिती उद्योगाला नवी ओळख करुन दिली. या काळात हा उद्योग प्रगतीच्या उच्चशिखरावर होता. रोम, इटली या देशात पैठणी वस्त्र मोठ्या प्रमाणात निर्यात होत. पैठणमध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण शिवकालीन साडी म्हणजे ‘पैठणी’ साडी भारतातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक आजही समजली जाते. त्यामुळे सण समारंभामध्ये नेसली जाणारी ही साड्यांची राणी सर्वच स्त्रियांचे आकर्षण ठरली आहे.