पल्लवी अष्टेकर
पहाटेची वेळ. ……पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी लोक रांग लाऊन उभे होते. अगदी रात्री तीन-साडेतीन वाजल्यापासून विठोबाच्या दर्शनासाठी मोठी रांग लागलेली होती. बऱ्यापैकी थंडी होती. भक्तांचा विठुरायाला भेटण्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. आम्ही देखील पहाटे ४ च्या सुमारास तेथे पोहोचलो. आमच्या पुढील रांग लक्षात घेता, आम्हाला विठुरायाचे दर्शन घेण्यास अंदाजे चार-पाच तास रांगेत उभे राहावे लागणार हे लक्षात आले. आमच्या मागील गर्दी देखील क्षणाक्षणाने वाढत चालली होती. इतक्यात आमच्या मागील बायकांनी मधूर-भावपूर्ण आवाजात विठोबा-रखुमाईच्या ओव्या, भजने गायला सुरुवात केली. म्हटले तर, आजूबाजूच्या गावातून आलेल्या या सर्वसाधारण स्त्रिया. पण त्यांनी गायलेल्या गाण्यांतून त्यांच्यातील बुद्धिमत्तेची चमक दिसून येत होती. पहाटे ५.३० ते ६ च्या दरम्यान विठोबाचे देवालय उघडते. हे क्षेत्र वारकऱ्यांचे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. पंढरपूरच्या देवळाचा गाभारा, अंतराळ व सभामंडप हे मुख्य घटक आहेत. सभामंडपाच्या १६ खांबांपैकी एकावर चांदीचं आवरण बसवलं आहे. तोच गरूडस्तंभ म्हणून ओळखला जातो. असे म्हणतात की, सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती, पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली. स्थापत्य शास्त्रानुसार विचार केला तर, जीर्णोद्धार करण्यात आलेलं विठ्ठलाचं मंदिर हे १६-१७ व १८ व्या शतकातलं बांधकाम असावं. मूळ मंदिराचे बाराव्या शतकातले अवशेष अजूनही तिथे आढळतात. या देवळाच्या दक्षिणेला खंडोबा, व्यंकटेश या देवतांची लहान देवळंही आहेत. आषाढी-कार्तिकी एकादशीला अनेक भाविक चालत पंढरपूरला येतात. पंढरपूरला चंद्रभागा नदी आहे. भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा, इंद्रायणी, भामा-नीरा यांना सामावत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णू पद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन-वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिचे नाव चंद्रभागा असे ठेवले.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला संत नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. आम्ही मंदिरातून पुढे जात असताना वाटेतल्या भिंतीवर विविध संतांची नावे व त्यांचे कार्य चित्रांसह लिहिण्यात आले आहे. यातील काही संत व त्यांची माहिती – नाथ संप्रदाय, वारकरी, वैष्णव संप्रदाय यांचे अग्रणी संत ज्ञानेश्वर यांचा जन्म २२ ऑगस्ट शके ११९७ मध्ये महाराष्ट्रातील पैठण येथे झाला. त्यांचे उपास्य दैवत विठ्ठल होते. संत ज्ञानेश्वरांनी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर भर दिला. त्यांनी अध्यात्मिक समतेवर आधारित वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. वारकरी संप्रदायाला जन्म देणाऱ्या संत ज्ञानेश्वरांची ओळख ‘माऊली’ अशी आहे. आपल्या पसायदानात “जो जे वांछिल, तो ते लाभो प्राणिजात” असा विश्वव्यापी संदेश त्यांनी दिला. त्यांच्या साहित्य रचनेत ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अभंग व हरीपाठ यांचा समावेश आहे.
‘‘ जे का रंजले गांजले |
त्यासी म्हणे जो आपुले |
तोचि साधू ओळखावा |
देव तेथेचि जाणावा ||’’
अशी संत तुकाराम यांची अभंग रचना आहे. पंढरपूरचा विठोबा हे संत तुकारामांचे आराध्य दैवत आहे. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य केले. त्यांचा परंपरागत व्यवसाय सावकारीचा होता; परंतु एकदा दुष्काळ पडलेला असता, त्यांनी सर्व कुळांना सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे त्यांनी इंद्रायणी नदीत टाकून दिली. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा संत धन्य होय. संत तुकाराम महाराज समाजातील दांभिकपणावर प्रहार करणारे होते. संत सावता माळी यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण या गावी झाला. त्यांचा पारंपरिक व्यवसाय फुले, फळे, भाज्या इ. पिके काढण्याचा होता. ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करत असतानाच काया-वाचा-मने ईश्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे असे सावता माळी यांचे म्हणणे होते. त्यांचे लग्न भेंड गावातील जनाई यांच्याशी झाले. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये होती. ते कर्ममार्गी संत होते. सावता माळींचा हा अभंग खूप प्रसिद्ध आहे.
कांदा-मुळा भाजी |
अवघी विठाई माझी ||१||
लसूण-मिरची कोथंबिरी |
अवघा झाला माझा हरी ||२||
ऊस-गाजर-रताळू|
अवघा झालासे गोपाळू ||३||
मोट-नाडा-विहीर-दोरी |
अवघी व्यापिली पंढरी ||४||
सावता म्हणे केला मळा |
विठ्ठला पायी गोविला गळा ||५ ||
सावता माळींची विठ्ठलाप्रतीची भक्ती या ओळीतून व्यक्त होते. संत नामदेव हे भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला. ते मराठी भाषांतील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेवांची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहेत. संत नामदेवांनी साधू-संतांच्या चरणधुळीचा व भगवद्भक्तांचा स्पर्श व्हावा, म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी “पायरीचा दगड” होण्यात धन्यता मानली.
तिथे विठोबा-रखुमाईचे दर्शन घेण्याअगोदर संत कान्होपात्रेची एक मूर्ती पाहायला मिळते. संत कान्होपात्रा यांची विठ्ठलावर अपार श्रद्धा, भक्ती होती. महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या जवळील मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते. कान्होपात्राची आई शामा ही एक गणिका होती. कान्होपात्राची बालपणीची मैत्रीण व त्यांच्या घरी कामाला असणारी हौसा विठ्ठलाचे निरनिराळे अभंग गायची. कान्होपात्राला ते अभंग ऐकायला खूप आवडायचे. अनेक वारकरी टाळ, मृदंग वाजवत तिथून पंढरपूरला जायचे. कान्होपात्रा व हौसाने या वारकऱ्यांसोबत जायचे ठरविले. त्या पंढरपूरला पोहोचल्या. कान्होपात्राने विठ्ठलाच्या चरणी भक्तिभावाने डोके टेकविले. मंगळवेढ्यातील सदाशिव मालगुजर याने बिदरच्या राजाला कान्होपात्राच्या सौंदर्यांचे वर्णन केले व तिला आपल्या दरबारात नर्तकी म्हणून ठेवून घेण्याविषयी सुचविले. तेव्हा बिदरच्या राजाने आपल्या सैन्याची एक तुकडी कान्होपात्राला कैद करण्यासाठी पाठविली. हे समजल्यावर कान्होपात्राने विठ्ठलाला आर्त आळवणी केली. ती विठ्ठलाला म्हणाली, “भगवंत, मला या भौतिक जगात पुन्हा लोटू नका.’’
“नको देवराया अंत आता पाहू,
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ||१ ||
हरिणीचें पाडस व्याघ्रे धरियेले
मजलागी जाहले तैसै देवा ||२||
तुजवीण ठाव न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई ||३||
मोकलुनी आस जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात ||४||
कान्होपात्राने विठ्ठलाकडे अशी आर्त शब्दांत आळवणी केली. भगवंताच्या चरणी तिचा देह विलीन झाला. असे म्हणतात की, संत कान्होपात्राच्या समाधी स्थानी दुसऱ्या दिवशी रोपटे उगवले. त्याचा आज वृक्ष झाला आहे. तो वृक्ष कान्होपात्राचा वृक्षं म्हणून प्रसिद्ध आहे. ‘पंढरपूर’ पृथ्वीवरील वैकुंठ म्हणून प्रसिद्ध आहे. विठोबा मंदिराला हजारो भक्त भेट देत असतात. तेथून जाताना उजवीकडील घरांच्या छपरावर प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, चंची यांचा ढीग जमा झाल्याचे चित्रं पावलोपावली आढळते. लोकांनी जाणीवपूर्वक, देवळाच्या आजूबाजूच्या परिसरात कचरा, पाण्याच्या बाटल्या टाकणे टाळावे. शासनाने सुद्धा जागोजागी कचऱ्याचे डबे लावावेत व स्वच्छतेची मोहीम राबवावी.
पंढरपूर हे महाराष्ट्रासाठी, भारतासाठी व जगासाठी लाभलेले वरदान आहे. सर्व संतांची आठवण काढत, विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेऊन ८.३० सुमारास, एक वेगळी अनुभूती घेऊन देवळातून बाहेर पडलो.