Friday, February 14, 2025
Homeदेशमहाकुंभात सिलेंडर स्फोटामुळे लागलेली आग नियंत्रणात

महाकुंभात सिलेंडर स्फोटामुळे लागलेली आग नियंत्रणात

प्रयागराज (उत्तर प्रदेश) : महाकुंभमेळ्यात सिलेंडर स्फोटामुळे लागलेली आग नियंत्रणात आली आहे. या आगीमुळे सुमारे २०० तंबू जळून खाक झाले. तंबूंमध्ये असलेल्या मालमत्तेची हानी झाली. महाकुंभमेळ्यासाठी नियुक्त केलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने आग नियंत्रणात आणली आहे.

सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्याला पोलीस कोठडी

सेक्टर १९ मधील शास्त्री पूल ते रेल्वे पूल दरम्यानच्या परिसरातील एका तंबूत झालेल्या सिलेंडर स्फोटामुळे आग लागली होती. अग्निशमन दलाचे पथक तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांनी संयुक्त कारवाई करुन आग नियंत्रणात आणली.

HSC-SSC Exam Update : वाद झाल्यानंतर हॉलतिकिटांवरून काढून टाकले जातीचे उल्लेख!

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तातडीने घटनास्थळाच्या दिशेने निघाले आहेत. ते पाहणी करुन आणि परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला पुढील आवश्यक कामांसाठी सूचना करणार असल्याचे समजते. पंतप्रधान मोदी यांनी घटनेची माहिती मिळताच लगेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना घटनेबाबत थोडक्यात माहिती दिली आहे. सविस्तर माहिती पाहणीनंतर दिली जाईल. आग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

महाकुंभमेळ्यात तंबू असलेल्या परिसरात आग लागल्याची माहिती संध्याकाळी चारच्या सुमारास मिळाली. यानंतर तातडीने वीस बंब गाड्यांच्या मदतीने अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्यामुळे जीवितहानी झालेली नाही पण वित्तहानी झाल्याचे समजते. नेमके किती नुकसान झाले याची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.

महाकुंभ मेळ्यात सोमवार १३ जानेवारी २०२५ रोजी पौष पौर्णिमेचे सामान्य स्नान तसेच मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी मकरसंक्रांतीचे शाही स्नान झाले आहे. या व्यतिरिक्त दररोज लाखो भाविक गंगा नदीवर पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. आता बुधवार २९ जानेवारी २०२५ रोजी मौनी अमावस्येनिमित्त आणि सोमवार ३ फेब्रुवारी २०२५ रोजी बसंत पंचमी अर्थात वसंत पंचमीनिमित्त महाकुंभमेळ्यात शाही स्नान होणार आहे. या व्यतिरिक्त बुधवार १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमेनिमित्त आणि बुधवार २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभमेळ्यात सामान्य स्नान होणार आहे.

भारतात चार महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहेत. या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. मध्य प्रदेश येथे उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या पात्रात कुंभमेळा होतो. उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे संगमावर तसेच हरिद्वार येथे गंगा नदीच्या पात्रात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीच्या पात्रात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. प्रत्येकवेळी ४५ दिवसांसाठी कुंभमेळ्याचे आयोजन करतात. कुंभमेळ्याच्या निमित्ताने धार्मिक प्रदर्शनांचे तसेच धार्मिक चर्चासत्रांचे आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते. वेद, चरक संहिता, पुराण आणि ज्योतिषशास्त्र या विषयांशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -