श्रीमद्भागवत पुराणानुसार श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ स्त्रिया होत्या. त्यात रुक्मिणी, जांबवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, नाग्नजिती (सत्या) भद्रा, लक्ष्मणा या प्रमुख असून भौमासुराच्या कैदेत असलेल्या १६१०० स्त्रियांचाही समावेश यात आहे. भगवान श्रीकृष्णांनी या १६१०० राजकन्यांशी विवाह करून त्यांचा उद्धार केला असे पुराणात म्हटले आहे. रुक्मिणी : रुक्मिणी ही विदर्भ कन्या असून कुंडीनपूरच्या (सध्याचे कौंडण्यपूर) विदर्भ नरेश भीष्मकाची मुलगी होती. तिचा भाऊ रुक्मी याने तिचा विवाह चेदी नरेश शिशुपालाशी लावण्याचा घाट रचला होता. मात्र रुक्मिणीला हे मान्य नव्हते. तिने श्रीकृष्णाला मनाने वर मानले होते. तसा रुक्मिणीने कृष्णाला निरोपही पाठविला होता. भगवान श्रीकृष्णालाही रुक्मिणीशी लग्न करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी लग्नाच्या दिवशी देवदर्शनाला गेलेल्या रुक्मिणीचे हरण करून तिच्याशी विवाह केला. जांबवती : सत्रजिताजवळ स्यामंतक नावाचा सोने देणारा मणी होता. त्याच्या चोरीचा आळ कृष्णावर आला. त्यामुळे कृष्ण त्या मण्याच्या शोधात जांबुवंताच्या गुहेत गेले. तेथे २८ दिवस जांबुवंताशी युद्ध करून त्याला परास्त केले. तेव्हा जांबवंताने मणी कृष्णाला दिला व सोबत आपल्या कन्येचा जांबवतीचा विवाहही कृष्णासोबत लाऊन दिला. कृष्णाने मणी सत्रजिताला परत दिला. सत्यभामा : आपण विनाकारण मण्याच्या चोरीचा आळ श्रीकृष्णावर घेतला. याचा सत्रजिताला अत्यंत पश्चाताप झाला. त्यामुळे त्याने कृष्णाची क्षमा मागून तो मणी व आपली मुलगी सत्यभामा श्रीकृष्णाला अर्पण केली.
कालिंदी : भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरला असताना एकदा अर्जुनासह वनात गेले असता तहान लागल्याने यमुना नदीवर गेले. तेथे एक सुंदर कन्या तपश्चर्या करीत बसलेली त्यांना दिसली. अर्जुनाने तिची चौकशी केली असता आपण सूर्य देवाची कन्या असून कालिंदी नाव असल्याचे सांगितले. भगवान विष्णू आपल्याला पती मिळावेत यासाठी कठोर तपश्चर्या करीत असल्याचे तिने सांगितले. हा सर्व वृत्तांत अर्जुनाने श्रीकृष्णाला कथन केला. त्रिकाल ज्ञानी भगवंताला हे पूर्वीच माहिती होते. भगवंतांनी तिला द्वारकेला नेऊन तिच्याशी योग्य ऋतू व मुहूर्तावर विवाह केला.
मित्रविंदा : श्रीकृष्णाची आत्या राजाधिदेवीची मित्रविंदा कन्या होती. मित्रविंदाचे बंधू अवंती नगरीचे राजे विंद व अनुविंद हे दुर्योधनाचे मित्र होते. मित्रविंदाची श्रीकृष्णाशी विवाह करण्याची इच्छा होती; परंतु हे तिच्या भावांना मान्य नव्हते. तेव्हा श्रीकृष्णाने भर सभेतून तिला पळून नेऊन तिच्याशी विवाह केल्याचा उल्लेख आहे. सत्या : कोसलदेशचा राजा नग्नजिताची सत्या ही कन्या. नग्नजिताची कन्या म्हणून ती नागनजीती म्हणूनही ओळखली जात होती. नग्नजित राजाकडे असणाऱ्या तीक्ष्ण शिंगाच्या अजिंक्य, वीरांचा वासही सहन न करणाऱ्या व दुष्ट अशा सात बैलावर विजय मिळविणाऱ्याशीच तिचा विवाह करू अशी राजाची अट होती. हे सात बैल माजलेले असून कोणालाही न आवरणारे होते. पुष्कळशा राजकुमारांना यांनी घायाळ करून त्यांचा पराभव केला होता. सत्यानेही आपला विवाह श्रीकृष्णशीच व्हावा, अशी मनोमन प्रार्थना केली. त्याप्रमाणे कृष्णाने सात रूप घेऊन त्या सात बैलांची मस्ती जिरविली व सत्याशी विवाह केला. भद्रा : केकय देशातील श्रीकृष्णाची आत्या श्रुतकीर्तीची भद्रा ही कन्या. तिच्या भावांनी स्वेच्छेनेच भद्राचा विवाह श्रीकृष्णाशी लाऊन दिला. लक्ष्मणा : मद्र देशाची ही राजकन्या अत्यंत सुलक्षणी होती. श्रीकृष्णाने तिचे हरण करून तिच्याशी विवाह केला. श्रीकृष्णाने प्राग्ज्योतिष्यपूरचा (सध्याचे आसाम) राजा भौमासुराचा वध करून त्याच्या कैदेत असणाऱ्या १६ हजार १०० राजकन्यांची मुक्तता केली.या स्वारीत सत्यभामा श्रीकृष्णासोबत असल्याचा उल्लेखही भागवतात आहे. त्या राजकन्यांनी श्रीकृष्णाला पाहून हाच पती मिळावा, अशी भगवंताजवळ मनोमन इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनीही त्या सर्वांना द्वारकेला नेऊन एकाच मुहूर्तावर एकाच वेळी वेगवेगळी रूपे धारण करून शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचे पाणीग्रहण केले.